महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपा नेते गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अभिनेते नाना पाटेकरदेखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणादरम्यान राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले. आम्ही मत दिलं असल्याने आमची कामं करावीच लागणार आहेत अशा शब्दांत त्यांनी परखड मत मांडलं. यावेळी त्यांनी महराजांचे नुसते पुतळे उभारु नका तर त्यांचे विचारही आत्मसात करा असा सल्ला दिला.
मी गिरीश बापट यांना एकेरी हाक मारतो सांगताना नाना पाटेकर यांनी हा दादा तो दादा, शरदराव, उद्धवराव हे सगळेच माझे आहेत. आता तुम्ही सर्वांनी वेगळे पक्ष स्थापन केले त्याला मी काय करायचं अशी मिश्कील टिप्पणी केली.
‘…म्हणून जाहीर टीका करणं टाळतो’
“नाम संस्थेची स्थापना झाली तेव्हा कोणावरही टीका करण्याचं मी टाळतो. वैयक्तिक भेट झाल्यावर आवडलं नाही असं सांगतो. कारण ‘नाम’च्या माध्यमातून करता आलं तेवढं काम मला कधीच करता आलं नाही. ५० वर्षांपासून मी चित्रपट, नाट्यसृष्टीत आहे पण गेल्या सात वर्षात ‘नाम’च्या माध्यमातून काम करताना नट म्हणून जे सन्मान मिळाले त्यापेक्षा ‘नाम’च्या कामातून मिळालेलं समाधान मोठं आहे. त्यामुळे मी कोणावरही जाहीर टीका करत नाही,” असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.
“महाराजांचे पुतळे उभारणं सोपं आहे”
“महाराजांचे पुतळे उभारणं सोपं आहे. त्यांची विचारसरणी, विचारांचं अनुकरण करण्यासाठी एक पाऊल जरी टाकता आलं तरी मोठं आहे. जय भवानी, जय शिवाजी बोलणं खूप सोपं आहे. महाराजांनी सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं. प्रत्येकाला सामावून घेण्याची त्यांची ताकद होती. योग्यतेपेक्षा फार मोठं त्यांनी प्रत्येकाच्या पदरात टाकलं,” असं नाना पाटेकर म्हणाले.
“महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे”
पुढे बोलताना त्यांनी आपण सर्व दैवतं वाटून घेतल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “आपण सर्वांनी दैवतं वाटून घेतल्याचं फार वाईट वाटतं. महाराज, आंबेडकर, टिळक माझेच आहेत. इतिहासाचा चांगला भाग घ्यावा आणि इतर काढून टाका. ब्राह्मण, ब्राह्मणेतर हा वाद आता नको. माणूस म्हणून एकमेकांना ओळखू तेव्हाच या पुतळ्याचा आदर होईल. येता जाता रस्त्यात कुठलाही पुतळा उभा आहे असं नाही. ते महाराज आहेत. महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे. त्याच्यावरुन वाद का होतात हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे”.
The post “महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचा हे कळायला पाहिजे”, नाना पाटेकरांनी खडसावलं; म्हणाले “ते महाराज…” appeared first on Loksatta.