Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम

Khelo India Youth games :  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत पदकसंख्या जरुर वाढवली. मात्र, यजमान मध्य प्रदेशाने त्यांना अनपेक्षित टक्कर देत पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर ढकलले. महाराष्ट्राची (13 सुवर्ण, 17 रौप्य, 13 ब्राँझ) 43 पदके झाली आहेत. मध्य प्रदेशाची (14 सुवर्ण, 7 रौप्य, 4 ब्राँझ) अशी 25 पदके आहेत. मात्र, सुवर्णपदकांच्या संख्येतील आघाडीमुळे त्यांनी पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. 

नाईशाचे रौप्यपदकावर समाधान

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू नाईशा कौरला  पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या एकेरीच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित देविकाने  महाराष्ट्राच्या नाईशाचा १४-२१, २१-१९,२१-१० असा पराभव केला. नाईशाची ही पहिलीच स्पर्धा होती. पदार्पणातील यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

खो-खोमध्ये निर्विवाद वर्चस्वाला धक्का

खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या मुलांनी सलग पाचव्या विजेतेपदाची नोंद केली. मात्र, मुलींना विजेतेपदाचा पंच मारण्यात अपयश आले. मुलींना ओडिशाकडून पराभवाचा सामना करावा लागला. मुलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचे प्रबळ होऊ पाहणारे आव्हान ३८-२८ असे मोडून काढले. महाराष्ट्राला मैदानात दिल्लीच्या खेळाडूंकडून आव्हान मिळत होते. पहिल्या डावानंतर महाराष्ट्राची आघाडी १८-१७ अशी मर्यादित होता. पण, दुसऱ्या डावातही महराष्ट्राने आपले आक्रमण धारदार ठेवत २० गुणांची नोंद केली. दिल्लीच्या आक्रमकांना मात्र दुसऱ्या डावात महाराष्ट्राचा बचाव भेदता आला नाही. महाराष्ट्राचा कर्णधार नरेंद्रचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. त्याने चार गडी बाद करताना १.३० मिनिटे बचाव केला. निखिलनेही चार गडी बाद केले. मुलींच्या अंतिम लढतीत ओडिशाने महाराष्ट्राचा १६-१३ असा तीन गुणांनी पराभव केला. ओडिशाच्या भक्कम बचावाला भेदण्यात महाराष्ट्राच्या मुलींना अपयश आले हे महाराष्ट्राच्या सोनेरी अपयशाचे कारण ठरले. 

हेही वाचा :  Riyan Parag : रणजी ट्रॉफीत रियान परागचा कहर! 28 बॉलमध्ये कुटल्या 78 धावा, 4 विकेट्सही घेतल्या

मुष्टियुद्ध – देविका, उमर, उस्मान, कुणाल अंतिम फेरीत

मुष्टियुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण चौकार लगावण्याची संधी आहे. उमर अन्वर शेख, उस्मान अन्सारी, कुणाल घोरपडे, देविका घोरपडे यांनी आपापल्या वजनी गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. तात्या टोपे क्रीडा नगरीच सुरु असलेल्या स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात उमरने हरियानाच्या विश्वेश कुमारला चुरशीच्या लढतीत पराभूत केले. उस्मानला ५१ किलो वजनी गटात विजयासाठी फारसे झगडावे लागले नाही. कमालीच्या आक्रमकतेने खेळताना उस्मानने घरच्या प्रेक्षकांसमोर मध्य प्रदेशाच्या अनुराग कुमराचा पराभव केला. कुणालनेही ६७ किलो वजन गटातून स्थानिक खेळाडू प्रशंसन कुमारला सहज पराभूत केले. कुणाल हा औरंगाबादमध्ये क्रीडा प्राधिकरणात सराव करता. मुलींच्या गटात जागतिक युवा विजेत्या देविकाने आपला दबदबा कायम राखला. पुण्याच्या देविकाने आंध्र प्रदेशाच्या मेहरुनिस्सा बेगमला नॉक आऊट केले. देविकाच्या आक्रमणापुढे मेहरुन्निसा निष्प्रभ ठरली आणि तिसऱ्याच मिनिटाला पंचांनी लढत थांबवून देविकाला विजयी घोषित केले. 
दरम्यान, साताऱ्याच्या आर्याला ५७ किलो, तर पुण्याच्या वैष्णवीला ६० किलो वजनी गटातून पराभवाचा सामना करावा लागला. आर्या पराभवानंतरही खेळावर समाधानी होती. खेळात हार-जीत व्हायचीच असे ती म्हणाली. आर्याला सेनादलात कारकिर्द घडवायची आहे. 

ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण चौकार

वसईच्या ईशा जाधवने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५५.९५ सेकंद अशी वेळ सोनेरी यश मिळविले. पदार्पणातच मिळालेल्या सुवर्णपदकाने ईशा कमालीची हरखून गेली होती. यापूर्वी राष्ट्रीय युवा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळविले आहे. आशियाई युवा स्पर्धेतील ती रौप्यपदकाची मानकरी आहे. विरार येथे संदीप सिंग लढवाल यांच्याकडे ती सराव करते. कोल्हापूरच्या अनिकेत मानेने उंच उडी प्रकारात ब्राँझपदक मिळविले. त्याने १.९८ मीटर उडी मारली. त्याचे हे स्पर्धेतील तिसरे पदक ठरले. २०२१ मधील स्पर्धेत तो ब्राँझ, तर २०२२ मध्ये तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. या वर्षी फारसा सराव नसल्याने कामगिरी उंचावली नाही, असे तो म्हणाला. भालाफेक प्रकारात शिवम लोहकरेने रौप्यपदक पटकवातना ६७.७२ मीटर भालाफेक केली. तो पुण्यात लष्कराच्या क्रीडा केंद्रात सराव करत आहे. शंभर मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषी देसाईला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १०.६७ सेकंद अशी वेळ दिली. 

हेही वाचा :  भारतानं वर्ल्ड कप जिंकला नाही, पण कोहलीनं रचला इतिहास, यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा नावावर

पूजा, संज्ञा सुसाट

अनुभवी सायकलपटू पूजा दानोळे आणि संज्ञा कोकाटे यांनी सायकलिंगमधील आपला दबदबा कायम राखला. त्यांना सोनेरी यशापासून जरूर वंचित रहावे लागले, पण त्यांची रुपेरी कामगिरीही दोघींचा दर्जा दाखवून देणारी होती. वैयक्तिक परस्यूट प्रकारात पूजा २ मिनिट ३७.१८३ सेकंद वेळ देत रौप्यपदकाची मानकरी ठरली. सुवर्ण विजेत्या हिमांशीने २ मिनिट ३६.३९८ सेकंद अशी वेळ दिली. स्प्रिंट प्रकारात संज्ञाने पश्चिम बंगालच्या सांती बिश्वासला (१२.३४० सेकंद) रोखण्यात दुर्दैवी ठरली. संज्ञाने १२.२७६ सेकंद अशी वेळ नोंदवली. मुलांच्या वैयक्तिक परस्युट प्रकारात विवान सप्रु रौप्यपदकाचा मानकरी ठरला. सायकलिंगमध्ये महाराष्ट्राची आतापर्यंत प्रत्येकी ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य अशी सात पदके झाली आहेत.  

जिम्नॅस्टिक – ऑलराऊंड प्रकारात आर्यनला ब्राँझपदक

जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राच्या आर्यन दवंडेला ऑल राऊंड प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारासाठी महाराष्ट्राचे आर्यन आणि मानस मनकवले हे दोघे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. मात्र, आर्यनच पदकापर्यंत पोचला. आर्यनने फ्लोअर एक्सरसाईज आणि व्हॉल्टवर दमदार कामगिरी केली. आर्यन ६६.६५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. उत्तर प्रदेशाच्या जतिन कनोजियाने ६८.८५, तर मध्य प्रदेशाच्या दिपेश लसकारीने ६६.९० गुणांसह रौप्यपदक पटकावले. जिम्नॅस्टिकमध्ये उद्या सारा राऊळ, रिया केळकर , तर मुलांमध्ये आर्यन आणि मानस वैयक्तिक पदकांसाठी खेळतील. 

हेही वाचा :  IND vs SL 1st ODI Live : भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सामन्याला सुरुवात,सर्व अपडेट्स एका क्लिकवर

योगासन – मुले मुली सर्वसाधारण विजेते

महाराष्ट्राच्या मुलांनी योगासन प्रकारातील अखेरच्या दिवशी कलात्मक दुहेरी प्रकारात १ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावून आपला दबदबा कायम राखला. मुलींमध्ये महाराष्ट्राला एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन खरात-प्रणव साहू सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. निबोध पाटिल-रुपेश सांघे रौप्यपदकाचे मानकरी ठरले. मुलींच्या विभागात वैदेही मयेकर-प्रांजल वन्ना रौप्य, तर तन्वी रेडीज-रुद्राक्षी भावे ब्राँझपदकाच्या मानकरी ठरल्या. योगासन प्रकारात महाराष्ट्राची कामगिरी सर्वोत्तम राहिली. महाराष्ट्राच्या मुलामुलींनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक रवी कुमठेकर यांनी महाराष्ट्राच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. यजमान म्हणून मध्य प्रदेशाच्या खेळाडूंना जरुर झुकते माप मिळाले असले, तरी आपल्या खेळाडूंनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यांनी चांगलेच यश मिळविले. महाराष्ट्राला भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे, असे मत व्यक्त केला. 

नेमबाजी – मिश्र दुहेरीत सुवर्ण

नेमबाजी प्रकारातील 10 मीटर एअर रायफल प्रकारात महाराष्ट्राने मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्र संघात ऐश्वर्या आणि रणवीरचा समावेश होता. त्यांनी पश्चिम बंगालच्या अभिनव आणि स्वाती चौधरीचा पराभव केला.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …