भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. यानंतर आरोपांचं हे सत्र सुरु राहिलं आणि अखेर भारतातूनही कॅनडाचा विरोध उच्चस्तरिय कारवायांनी केला गेला. मुळात या प्रकरणामध्ये सातत्यानं समोर येणारा खलिस्तान हा शब्द नेमका कशाशी संबंधित आहे, हे खलिस्तान अस्तित्वात आहे का? त्याचा दहशतवादाशी काय संबंध हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं.

खलिस्तान म्हणजे काय?

खलिस्तान म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बरंच मागे जावं लागणार आहे. हा विषय सुरु झाला साधारण 31 डिसेंबर 1929 पासून. ज्यावेळी लाहोरमध्ये एक अधिवेशन झालं, जिथं मोतीलाल नेहरु यांनी ‘संपूर्ण स्वराज्य’ ही मागणी उचलून धरली. काँग्रेसच्या या मागणीला तीन समुदायांनी कडाडून विरोध केला. एक म्हणजे मोहम्मद अली जिन्ना यांची मुस्लिम लीग, दुसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाची दलित समुदाय आणि तिसरा मास्टर तारा सिंग शिरोमणी अकाली दल. याच तारा सिंग यांनी शीख समुदायासाठी एका वेगळ्या राज्याची मागणी केली होती.

हेही वाचा :  इंग्लंडच्या विजयानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शन्स, सोशल मीडियावर मीम्म्सचा पाऊस 

भारत स्वतंत्र झाला, देशाची फाळणी झाली आणि पंजाबही दोन भागांमध्ये विभागलं गेलं. ज्याचा एक भाग भारतात आणि एक पाकिस्तानात गेला. यानंतरच खलिस्तानची मागणी आणखी जोर धरू लागली आणि 1947 मध्ये ‘पंजाबी सूबा आंदोलन’ सुरु झालं. 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी ही मागणी मान्यही केली, त्यांनी पंजाबला तीन भागांमध्ये विभागलं. शीख समुदायासाठी पंजाब, हिंदी भाषिकांसाठी हरियाणा आणि तिसरा भाग ठरला चंदीगढ. याच चंदीगढवरून आजही वाद सुरुच आहेत.

… आणि संघर्षात आणखी एक ठिणगी, जर्नेलसिंग भिंद्रनवालेची एंट्री

80 च्या दशकात हा संघर्ष आणखी पेटला आणि खलिस्तान आंदोलन विकोपास गेलं. त्यावेळी दमदमी टकसाळचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेनं या आंदोलनात आणखी एक ठिणगी टाकली. त्यातच 1981 ला पंजाब केसरी वृत्तपत्राच्या संपादकांची हत्या करण्यात आली. यानंतर 1983 मध्ये खलिस्तान समर्थकांनी अमृतसर येथे असणाऱ्या सुवर्णमंदिरात पंजाबचे डिआयजी एएस अटवाल यांची हत्या केली. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची विस्कटलेली ही घडी पाहून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

वाद दर दिवसागणिक धुमसत रहिला आणि जर्नेलसिंग भिंद्रनवालेच्या नेतृत्त्वाखाली खलिस्तान समर्थकांनी शस्त्रसाठा एकत्र करत सुवर्णमंदिरात शरण घेतली. त्यांना या मंदिरातून हटवण्यासाठी 1 जून 1984 ला केंद्र शासनानं ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरु केलं. हे भारताच्या इतिहासातील एक रक्तरंजित पान, जिथं 83 जवान आणि जवळपास 492 नागरिकांचा मृत्यू ओढावला होता. हा तोच क्षण होता जेव्हा जगभरातील शीख समुदायाच्या मनात इंदिरा गांधी या शीखविरोधी भूमिका असणाऱ्या पंतप्रधान असल्याची प्रतिमा तयार झाली आणि त्यानंतर त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी पाच महिन्यांमध्येच इंदिरा गांधी यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांची हत्या केली होती.

हेही वाचा :  'अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू', फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, '6 महिन्यात...'

 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 1984 च्या ऑपरेशन ब्लू स्टारपूर्वी आणि ऑपरेशन ब्लॅक थंडरनंतर खलिस्तान आंदोलनाची लाट ओसरताना दिसली होती. पण, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इथं असणाऱ्या शीख समुदायानं ही मोहिम जीवंत ठेवत तिथून आंदोलनानं पुन्हा डोकं वर काढलं.

आजच्या घडीला खलिस्तान चळवळ फारशी सक्रिय नसली तरीही पंजाबच्या काही भागात आजही त्याची चर्चा होताना दिसते. परदेशात असणाऱ्या शीख समुदायाकडून या चळवळीला आजही खतपणी मिळतं. किंबहुना काही अनिवासी भारतीय शीखांकडून या चळवळीला आर्थिक आणि वैचारिक पाठबळ मिळत असल्याचंही वृत्त आहे. पाकिस्तानातून आयएसआयकडून या चळवळीला पुन्हा पेटवण्यासाठी पैसा आणि बळाचा वापर होताना दिसत असून कॅनडामध्ये ही चळवळ स्फोटक रुप धारण करताना दिसत आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …