उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

Devendra Fadanvis : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान (Japan) दौर्‍यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने (Koyasan University) मानद डॉक्टरेट (Doctorate) देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कोयासन विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. कोया-चो इथल्या मेयर योशिया हिरानो हे आपल्या आगामी मुंबई दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करतील.

‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’
महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देण्यात आला होता. विद्यापीठाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले असून, त्यासाठी एक  ‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’ देण्यात आलं. उल्लेखनीय बाब म्हणजे 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून जपान दौर्‍यावर गेले होते, यावेळी त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झालं होतं. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केलं. यावेळी प्रार्थनाही झाली.

हेही वाचा :  'मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?' राऊतांचा शिंदेंना सवाल; फडणवीसांचाही उल्लेख

कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो यांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. भारत-जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

वाकायामा गव्हर्नर यांच्यासमवेत भेट
आजच्या दौर्‍यात कोयासन विद्यापीठात जाण्यापूर्वी पहिली बैठक ही वाकायामा प्रिफिक्चरचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांच्यासमवेत झाली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्नेहभोज आयोजित केलं होतं. यावेळी कोया-चो इथल्या मेयर योशिया हिरानो, कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो, वाकायामाचे परराष्ट्र व्यवहार संचालक योशियो यामाशिता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र आणि जपान संबंधांवरील एक लघुपट यावेळी दाखविण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानसोबत निर्माण केलेल्या संबंधातून महाराष्ट्र आणि वाकायामा या दोघांमधील संबंध आणखी वृद्धिंगत झाले आहेत. संस्कृती, पर्यटन, व्यापार, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात आणखी काम करण्याची आमची इच्छा आहे. जपानमधील कंपनी आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रात यावेत, यासाठी आवश्यक ती सर्वप्रकारची मदत राज्य सरकार करेल. जपानी भाषेचे ज्ञान असलेल्या तज्ञांचा समावेश असलेला एक विशेष कक्ष राज्यात स्थापन करण्यात येईल आणि त्यामाध्यमातून गुंतवणूक वाढीला चालना देण्यात येईल.

हेही वाचा :  Maharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत आभारी आहोत, असं वाकायामा प्रांताचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांनी सांगितलं.  आता दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंती साजरी होते आणि येणारे पर्यटक सुद्धा येथे भेट देतात. महाराष्ट्रातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसोबत काम करण्याची आमची इच्छा आहे. येथील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ घेऊन मी स्वत: महाराष्ट्रात येईन, असंही त्यांनी सांगितलं.

जपानमधील राजदुतांकडून स्वागत
आजचा शेवटचा कार्यक्रम जपानमधील भारतीय राजदूत सिबी जॉर्ज यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सन्मानार्थ आयोजित रात्रीभोज होता. टोकियो क्षेत्रातील शास्त्रज्ञ, सीईओ, कलावंत, व्यावसायिक आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सिबी जॉर्ज यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 2015 मधील जपान भेटीचा उजाळा देत त्यामुळे वाकायामा आणि महाराष्ट्र संबंध कसे वृद्धिंगत झाले, यावर प्रकाश टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपा येथील जापनीज इंडस्ट्रीयल पार्कबाबत माहिती देताना जपानी उद्योजकांना मोठ्या संख्येने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. सांस्कृतिक संबंध या दोन प्रांतांत आहेच, शिवाय यावेळी गणेशोत्सवाच्या काळात आपण नक्की महाराष्ट्रात यावे, असे आग्रही निमंत्रण सुद्धा त्यांना दिले.

हेही वाचा :  OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून 'गायब' झालेला 'तो' कोण?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …