‘भवानी मातेशी वैर म्हणजे..’, ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘प्रश्न हिंदुत्वाचा नसून..’

Hindu And Bhavani Song: उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ या दोन शब्दांवर आक्षेप घेऊन प्रचार गीतातून ‘जय भवानी’ शब्द हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. याला ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपावर ‘सामना’मधून निशाणा साधला आहे. “देशाचा निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही व सध्याच्या सत्ताधाऱ्यांची तळी उचलून धरण्यातच स्वतःला धन्य धन्य मानीत आहे. शिवसेनेच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ या दोन शब्दांवर आक्षेप घेऊन प्रचार गीतातून त्यांनी ‘जय भवानी’ शब्द हटवण्याचे फर्मान सोडले आहे. एका बाजूला भयग्रस्त भाजप पराभवाच्या भीतीने सर्वच देवदेवतांना प्रचारात उतरवीत आहे. स्वतः नरेंद्र मोदी हे ‘राम राम’ करत प्रचार करीत फिरत आहेत. रामलल्लाच्या फुकट दर्शनाची लालूच मतदारांना अमित शहा दाखवीत आहेत. पश्चिम बंगालसारख्या राज्यात भाजपचे नेते सरळ सरळ हिंदुत्वाचा प्रचार करीत असताना भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगास शिवसेनेच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’, ‘हिंदुत्व’ शब्दांची अडचण व्हावी यास काय म्हणावे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा :  'केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या, मात्र...'; 'शहाणपणानं वागावं' म्हणत राऊतांचा 'मनसे'ला टोला

भवानी मातेशी वैर करणे म्हणजे…

“भवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे व भवानीस कौल लावल्याशिवाय महाराष्ट्र कोणताही निर्णय घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीस भवानी तलवार म्हणतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी मातेने दिली, असे इतिहासातील कथेत स्पष्ट आहे. दुसरे असे की, तुळजाभवानीचे स्थान हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे. भवानी मातेशी वैर करणे म्हणजे स्वतःच्या गवऱ्या स्मशानात वेचून येण्यासारखे आहे,” असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मशाल चिन्ह मिळाल्याने नवीन गीत

“मोदी यांच्या निवडणूक आयोगाने भवानी मातेशी राजकीय पंगा घेतला व भवानी मातेवरच बंदी घातली. याचा फटका मोदी-शहांना बसल्याशिवाय राहणार नाही. कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल पुंकर नामक राक्षसाला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली. तिने त्या राक्षसाचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती ‘त्वरिता’ किंवा मराठीत ‘तुळजा’ असे या आई तुळजाभवानीचे महत्त्व हिंदू संस्कृतीत व धर्मात मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. महाराजांनी कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्राची चार दैवते आहेत. त्यात महालक्ष्मी, खंडोबा, भवानी आणि विठोबा आहेत. अशा भवानी मातेचा जागर महाराष्ट्रात रोज होतो, पण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीस ‘अटकाव’ करण्याचे पाप भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाने केले. शिवसेनेचे परंपरागत धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने मिंधे गटास दिले व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस मशाल चिन्ह मिळाले. त्या मशालीच्या प्रचारासाठी एक गीत रचले व संगीतबद्ध केले,” असं म्हणत ठाकरे गटाने आपली बाजू या लेखातून मांडली आहे.

हेही वाचा :  वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

आचारसंहिता आडवी आली कोठे?

“या ‘मशाल गीता’मुळे भाजप व त्यांच्या मिंध्यांची बोलती बंद झाली, पण निवडणूक आयोगाला पुढे करून त्यांनी ‘जय भवानी’ व ‘हिंदू हा तुझा धर्म’ या ओळींवर आक्षेप घेतला. त्यामुळे धार्मिक प्रचार होतो, असे भाजपचा निर्वाचन आयोग म्हणतो. खरे तर या गीतात फक्त भवानी मातेचा उद्घोष केला आहे. शिवसेनेस मते द्या, असे सांगितले नाही. त्यामुळे आचारसंहिता आडवी आली कोठे?” असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

उद्या हे लोक ‘शिवाजी’ शब्दावर आक्षेप घेतील

“अमित शहा रामलल्लाच्या मंदिरावर मते मागतात. भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिराचा उल्लेख वारंवार आहे. भाजपला मते द्या, रामलल्लाचे फुकट दर्शन घडवू, असे जाहीर सभांतून भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. यावर निवडणूक आयोगाचा आक्षेप नाही. आता निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे, पण मग पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म व राख लावून प्रचार करीत आहेत हे काय निवडणूक आयोगास दिसत नाही? भवानी मातेचे नाव शिवसेनेच्या ‘मशाल गीता’तून काढणे हा छत्रपती शिवरायांचा, महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. त्यामुळे भवानी माता व तिचा उल्लेख ‘मशाल गीता’तून काढणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. उद्या हे लोक ‘शिवाजी’ शब्दावर आक्षेप घेतील. प्रश्न फक्त हिंदुत्वाचा नसून महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  श्रावण पाळणारा सिंह? झाडाची पानं खाणाऱ्या सिंहाचा Video चर्चेत; खरं कारणही आलं समोर

कारस्थान हाणून पाडले पाहिजे

“मोदी यांनी कर्नाटकच्या निवडणुकीत ‘बजरंगबली’च्या घोषणा दिल्या व बजरंगबलीचे नाव घेऊन भाजपचे बटण दाबा, असे सांगितले. श्रीराम, बजरंगबली यांच्या नावाने मते मागणे हा अपराध आहे, पण हे अपराध पोटात घालून भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या प्रचार गीतातील ‘हिंदुत्व’ आणि ‘भवानी माते’वर आक्षेप घेतला. भाजपच्या नकली हिंदुत्वाचा हा पराभव आहे. ‘हिंदू हा तुझा धर्म’ म्हणण्यात गैर काय? भाजपने याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. भवानी माता ही राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. भवानी माता ही छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आहे. भवानी मातेने देशाच्या शत्रूंचे निर्दालन करण्यासाठी शिवरायांच्या हाती तलवार दिली. या तलवारीशी सामना करणे भाजपला जमणार नाही. त्यामुळे भवानी मातेवर बंदी घालण्याचे नीच कारस्थान हाणून पाडले पाहिजे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …