नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांनी २३ फेब्रुवारीपासून पुकारलेल्या दोन दिवसीय संपात मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिकांसह तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी नर्सिगच्या विद्यार्थिनींना परिचारिकेची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे बाह्यस्त्रोत कर्मचारी वाढवून त्यांना चतुर्थश्रेणीच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांत सुमारे तीन हजारच्या जवळपास रुग्णशय्या आहेत. येथे दाखल रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोठय़ा संख्येने परिचारिकांसह तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णालयांतील परिचारिकांसह तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने येथील रुग्णांची सुश्रूषा, स्वच्छता, प्रशासनाशी संबंधित विविध कामे विस्कळीत होण्याचा धोका आहे.
प्रशासनाने नर्सिगच्या विद्यार्थ्यांच्या सेवा विविध वार्डात लावण्यासह त्यांच्या मदतीने अतिदक्षता विभागासह इतरत्र निवासी डॉक्टरांचे नियोजन केले आहे. परंतु सामान्य वार्डात नर्सिगच्या विद्यार्थ्यांसह डॉक्टरांची कमी राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. संपकाळात सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्याही सेवा लावण्यात आल्या आहेत. एकही अत्यवस्थ रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबू नये, याबाबत संबंधित विभागप्रमुखाने काळजी घेण्याची सूचनाही केली आहे. स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवल्यास रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न उद्भवणार आहे.
लिपिकांची कामे ठप्पच राहणार
लिपिकांची कामे कुणालाही देता येत नाही. त्यामुळे बाह्यस्त्रोत लिपिक असलेले विभाग वगळता इतर प्रशासकीय कामे दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. परंतु एकही काम विस्कळीत होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
The post नर्सिगच्या विद्यार्थिनींना परिचारिकेची जबाबदारी ; संपामुळे बाह्यस्त्रोत कर्मचारी वाढवले appeared first on Loksatta.