इंटरमिजिएट इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील ३१६ ईडी आणि ३१६ ईआय या दोन सिरीजचे पेपर बलिया जिल्ह्यात फुटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर २४ जिल्ह्यात परीक्षा रद्द करण्यात आली. आग्रा, मैनपुरी, मथुरा, अलीगढ, गाझियाबाद, बागपत, बदायूँ, शाहजहांपूर, उन्नाव, सीतापूर, ललितपूर, महोबा, जालौन, चित्रकूट, आंबेडकरनगर, प्रतापगड, गोंडा, गोरखपुरी, आझमगढ, बलिया, वाराणसी, कानपूर, देहात एटा आणि शामली जिल्ह्यांतील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. हे २४ जिल्हे वगळता उत्तर प्रदेशातील अन्य ठिकाणी ही परीक्षा सामान्य झाल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
राज्यात पेपरफुटीची अफवा
कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे दहावीचा विज्ञान-तंत्रज्ञान – २ विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त समोर आले होते. ५०० रुपयांना विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याची माहिती सांगण्यात आली. दरम्यान ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात गेल्यावर्षीचा पेपर आजचा असल्याचे भासवून पाचशे रुपयांना विकण्यात आला होता. पण प्रत्यक्षात परीक्षाकेंद्रावर वेगळा पेपर होता. त्यामुळे पेपर फुटल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप या पेपरफुटीस दुजोरा देण्यात आला नव्हता.