‘काका-पुतण्या भेटी हा साथीचा आजार तर हेलिकॉप्टरने CM शिंदेचं शेतावर जाणं हे…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar Sharad Pawar Meeting: महाराष्ट्रतील राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने भाष्य केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठींचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरु असून या भेटींना ठाकरे गटाने ‘गंमत-जंमत’ म्हटलं आहे. तर दुसरकीडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासगी दौऱ्यासाठी साताऱ्याला गेल्याच्या मुद्द्यावरुनही राज्यातील नेतृत्वबदलाची चर्चा असल्याने मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ वाटत असल्याचा खोचक टोला ‘सामना’मधून लगावण्यात आला आहे.

पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत

“उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे. “अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बऱ्याचदा गंमत असते. ‘‘अजित पवार हे ‘मविआ’त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील’’, असे नाना म्हणाले. त्याआधी नाना यांनी सांगितले की, ‘‘महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे ‘गंमत जंमत’ सरकार आहे.’’ नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

हेही वाचा :  Video : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला

“मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय?”

“शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही. अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही. शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील त्यांच्या शेतावर आराम करतात. म्हणजे ‘24 तास काम व पुढचे 72 तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंदे यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते. अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळ्यांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर साताऱ्यात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही. शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही. आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपत्तीचे रक्षण खोक्यांनी होत नाही. दुसरे असे की, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही. ‘मी पुन्हा येणार’वाल्यांनाही ‘उप’ वगैरे होऊन उपऱ्यांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत, पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच, पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार किती खोलवर पसरलाय? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्य मंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल,” असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा :  कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल

“आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात”

“शिंदे यांची प्रकृती चिंता करावी अशी आहे हे आमदार शिरसाटांचे म्हणणे खरे असेल तर त्यांना लगेच अतिदक्षता विभागात दाखल करून पुढचे उपचार करावे लागतील व त्यांच्या आसपास अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना फिरकू न देण्याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे, त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

अजित पवार आणि शिंदेंवर साधला निशाणा

“अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही. राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही. चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला. त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीर्याने घेतला पाहिजे. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळ्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :  पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …