जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, ‘यापुढे…’

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडबरोबरच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावरुन राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच प्रफुल्ल पटेलांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितलेली नाही. पटेल यांनी या प्रकरणावर दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. 

 

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान मोदींनी 14 मे रोजी वाराणसीमधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि त्यानंतरही भाजपाच्या सहकारी पक्षांचे म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. मोदींनी हा अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर जिरोटप घातला. पटेल यांनी जिरेटोप मोदींच्या हातात देण्याऐवजी स्वत:च्या हाताने त्यांच्या डोक्यावर घातला. यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात जिरेटोपाला मानाचं स्थान आहे. त्यामुळेच एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरुन शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस गटानेही प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा :  महाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

अनेक राजकीय पक्षांनी यावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी 15 मे रोजी सकाळी 11 वाजून 04 मिनिटांनी एक पोस्ट केली. मात्र या प्रकरणावरुन एवढा वाद निर्माण झालेला असतानाही जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितली नाहीच पण साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ,” असं पटेल यांनी एक्स (आधीचं ट्वीटर) वर पोस्ट करत म्हटलं आहे.

संभाजी ब्रिगेडचा इशारा

पटेल यांच्या या कृतीवरुन संभाजी ब्रिगेडनेही नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरोटोप परिधान करु नेय असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यावरही जिरेटोप परिधान करण्याचा प्घात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. फक्त छत्रपतीच जिरेटोप परिधान करु शकतात. जिरेटोपाचा असा अपमान केला जाऊ नये,” असा इशारा दिला आहे.

हेही वाचा :  'आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर...' फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस?

भाजपा-शिंदे गटाची सारवासारव

दरम्यान, भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटाने या प्रकरणावर भाष्य करताना ‘यामध्ये मोदींचा दोष नाही’ असे म्हटले आहे. “जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? असाप्रकारची पुनरावृत्ती होणार नाही,” असं उद्योगमंत्री उदय सामंत या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले. तर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी, “प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

T20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात …

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र …