‘दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..’; ठाकरे गटाचा सवाल

Jammu Kashmir Security Issue: “घटनेचे 370 वे कलम रद्द केल्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये शांतता नांदत आहे, असे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उठता बसता सांगत असतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते या वल्गना करीतच आहेत. मात्र खरेच जम्मू-कश्मीर दहशतवादमुक्त झाले आहे का? तेथील दहशतवादी हल्ले थांबले आहेत का? कश्मीरमध्ये शांतता नांदत आहे का? राजौरी आणि बांदिपोरा येथे मागील दोन दिवसांत घडलेल्या घटनांनी या तिन्ही प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच दिली आहेत,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला आहे. मागील 2 दिवसांमध्ये राजौरी आणि बांदिपोरा येथे झालेल्या चकमकींमुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दाव्यांची पुन्हा पोलखोल केली असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

दहशतवाद कमी झाल्याचे पोकळ ढोल

“राजौरी जिल्हय़ातील पुंडा गावात दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केली. महम्मद रझ्झाक असे त्याचे नाव आहे. तो समाजकल्याण विभागात कामाला होता. मशिदीत नमाज पठण करून तो बाहेर पडला आणि त्याच वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. महम्मद याचा भाऊ ताहीर सुदैवाने बचावला. ताहीर हा लष्करात जवान आहे. दहशतवाद्यांना बहुदा ताहीर यालाच ‘लक्ष्य’ करायचे असावे, त्याचे अपहरण करण्याचाही त्यांचा इरादा असावा, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. दुर्दैवाने रझ्झाक याचा त्यांच्या गोळीबारात बळी गेला. या हल्ल्यापाठोपाठ बांदिपोरा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. त्यात दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. 15 दिवसांपूर्वी बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथेही प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ आपल्या जवानांची दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली होती. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे, असाच त्याचा अर्थ होतो. राजौरी येथे मशिदीबाहेर दहशतवादी गोळीबार करतात, बांदिपोरा आणि बारामुल्ला जिल्ह्यांत दहशतवादी आणि लष्करी जवान यांच्यात चकमक होते, थन्नामंडी तालुक्यातील डोरीमाल जंगलामध्येही तीन संशयित लपून बसल्याच्या माहितीवरून सुरक्षा दल तेथे शोधमोहीम सुरू करतात. कुठे दहशतवादी हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होतो, कुठे जवानांना हौतात्म्य पत्करावे लागते तर कुठे दहशतवाद्यांचा खात्मा केला जातो. कश्मीरमधील आजचे वास्तव हे असे आहे. तरीही राज्यकर्ते कश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचे पोकळ ढोल वाजवीत आहेत,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा :  Maharastra Politics: मुख्यमंत्री शिंदेंचं घडलंय-बिघडलंय? भाजप हायकमांड नाराज?

याला कश्मीरमधील दहशतवादाचा ‘शेवटचा श्वास’ कसा म्हणता येईल?

“370 कलम हटविण्यापूर्वी कश्मीरमध्ये हेच घडत होते आणि आताही तेच हल्ले, त्याच चकमकी आणि तेच मृत्यू होत आहेत. मग जम्मू-कश्मीरमध्ये नेमके बदलले काय?” असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. “गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू येथे बोलताना ‘कश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे,’ अशी बतावणी केली होती. त्यांचे हे शब्द हवेत विरण्याआधीच बारामुल्लापासून राजौरीपर्यंत दहशतवादी हल्ले आणि चकमकीच्या तीन घटना घडल्या. त्यात एका नागरिकाचा बळी गेला. याला कश्मीरमधील दहशतवादाचा ‘शेवटचा श्वास’ कसा म्हणता येईल?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

कश्मीरमध्ये बदलले काय?

“उरी, राजौरी आणि बांदिपोरा येथे अलीकडे घडलेल्या घटनांनी राज्यकर्त्यांनी सोडलेले कश्मीरमधील खोट्या शांततेचे फुगे फोडले आहेत. दोन दिवसांपूर्वी राजौरी जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या महम्मद रझ्झाक याचे वडील महम्मद अकबर हेदेखील 19 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले होते. आज त्यांचा मुलगा दहशतवाद्यांचे ‘लक्ष्य’ ठरला. मग कश्मीरमध्ये बदलले काय? दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर 370 कलम हटविल्यामुळे कश्मीरमध्ये शांतता आहे, तेथील दहशतवाद ‘शेवटचा श्वास’ घेतो आहे असे राज्यकर्ते कुठल्या तोंडाने म्हणत आहेत? केंद्रीय गृहमंत्री प. बंगालमधील प्रचारात ‘भाजपला मत द्या, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना उलटे लटकवू,’ अशा जाहीर धमक्या देत आहेत. पश्चिम बंगालचे काय ते तेथील मतदार बघतील, तुम्ही आधी कश्मीरचे बघा. तेथील दहशतवादी हल्ल्यांनी तुमच्या शांततेच्या कबुतरांना उलटे लटकविले आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :  मदरशांमध्ये शिकणाऱ्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना मिळणारी शिष्यवृत्ती बंद, केंद्र सरकारचा निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …