‘गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून..’; मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group About Rahul Narvekar: “विधानसभा अध्यक्षांनी कसे वागू नये हे महाराष्ट्रात काल दिसून आले. सर्वेच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ‘ट्रायब्युनल’ म्हणजे न्यायदान करणाऱ्या लवादाची भूमिका बजावायला सांगितले. मात्र मिस्टर ट्रायब्युनल राहुल नार्वेकर हे सरळ शिंदे गटाच्या वकिलाच्या भूमिकेत गेले. नार्वेकर यांच्या तथाकथित निकालपत्राची देशभरात चेष्टा सुरू आहे. जो महाराष्ट्र न्या. रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा सांगतो त्या महाराष्ट्रात असे छ‘दाम’शास्त्री निपजावेत व त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचाच मुडदा पाडावा यासारखे दुर्दैव नाही,” अशा कठोर शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या ‘खरी शिवसेना’ एकनाथ शिंदेंचीच निकालावर टीप्पणी केली आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून कठोर शब्दांमध्ये या निकालावर प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.

या कोलांटउड्यांमुळे महाराष्ट्राच्या जनतेत…

“पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा फूत्कार छ‘दाम’शास्त्रींनी सोडला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारलेला हा डंख आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटास खरी शिवसेना म्हणून मान्यता देणे म्हणजे विधान भवनाच्या दारातील पट्टेवाल्याने विधानसभा अध्यक्षांनाच त्यांच्या दालनाबाहेर काढण्यासारखे आहे. मुळात ‘ट्रायब्युनल’ने वाचून दाखवलेले निकालपत्र म्हणजे कोलांटउड्या आहेत. या कोलांटउड्यांमुळे महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड संतापाचा लाव्हा उसळून बाहेर पडत आहे,” असं या लेखात म्हटलं आहे.

हेही वाचा :  पंतप्रधानही ज्यांच्यापुढे नतमस्तक झाले, ते 125 वर्षांचे योगगुरू आहेत तरी कोण?

मोदी युगात नीतिमत्तेची चाड ठेवायला…

“देशाच्या सर्वोच्च न्यायालयास न जुमानता अशा माकडउड्या मारणे हीच हुकूमशाही आहे. त्याच हुकूमशाहीविरोधात देशात वातावरण तयार होत आहे. सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशांना हरताळ फासून महाराष्ट्रातील फुटीर आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय जनता मान्य करणार नाही. चार पक्ष बदलून पीठासीन अधिकारी म्हणून बसलेली व्यक्ती सरन्यायाधीशांचा निर्देश डावलू शकत नाही, पण मोदी युगात नीतिमत्तेची चाड ठेवायला घटनात्मक पदावर बसलेली एकही व्यक्ती तयार नाही,” अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे.

निवडणूक आयोग व निकाल देणाऱ्यांच्या बापजाद्यांना विचारून बाळासाहेब ठाकरेंनी…

“शिंदे गटाच्या गोगावले यांना विधानसभा अध्यक्षांनी ‘व्हिप’ म्हणून मान्यता देणे बेकायदा होते. कुणाची बाजू योग्य याची पडताळणी न करता विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला हे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले, पण पक्षांतरे करून ‘पीठासीन’ झालेल्यांनी ते मान्य केले नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर एक अनधिकृत सरकार उभे आहे, ते अधिकृत करण्याचे काम अखेर विधानसभा अध्यक्षांनी केले. फुटीर शिंदे यांची नेमणूक त्यांनी जवळजवळ शिवसेनाप्रमुखपदी केल्याची निर्लज्ज घोषणाच निकालपत्रात केली. महाराष्ट्राच्या मातीचे पावित्र्य नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. निवडणूक आयोग व निकाल देणाऱ्यांच्या बापजाद्यांना विचारून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून विचारांचा, लढ्याचा, स्वाभिमानाचा वारसा घेऊन त्यांनी शिवसेना निर्माण केली. शिवसेना म्हणजे एका आंदोलनाची ठिणगी होती. त्याच ठिणगीने पुढे विचारांचा वणवा पेटवला. ही ठिणगी मिंधे गटातील पाद्र्या पावट्यांच्या खोक्यांतून निर्माण झाली नाही,” अशा शब्दांमध्ये शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

हेही वाचा :  'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

महाराष्ट्राची कवचकुंडले असलेल्या शिवसेनेस…

“महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणे हीच शिवसेना या पक्षाची घटना व अन्याय, ढोंगाच्या पेकाटात लाथ मारणे हीच आचारसंहिता; पण शिवसेनेच्या घटनेत त्रुटी आहेत अशा सबबीखाली विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या खोकेबाज गटाच्या हवाली केली. महाराष्ट्राची कवचकुंडले असलेल्या शिवसेनेस खोकेवाल्यांच्या तराजूत टाकणे हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 मराठी हुतात्म्यांचा आणि सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या 69 शिवसैनिक हुतात्म्यांचा अपमान आहे,” असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

अनेक घराण्यांची भाजपातील नाती-गोती तपासावी लागतील

ठाकरे गटाने घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंनाही लेखात लक्ष्य केलं आहे. “राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘‘हा घराणेशाहीचा पराभव आहे.’’ हे सांगताना त्यांनी स्वतःच्या घराणेशाहीकडे बोट दाखवायला हवे. अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे त्यांनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीवर दोन वेळा खासदार झाले. गंगाधर फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही तरी खास नाते असावे असे सांगतात. जय शहा हे महान क्रिकेटपटू अमित शहांचे कोणी तरी लागतात. कोणी म्हणतात रमाकांत आचरेकर, डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स वगैरेंनी क्रिकेटचे धडे चिरंजीव जय शहांकडूनच घेतले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या उद्धाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पीयूष गोयल व वेदप्रकाश गोयल यांचेही काही तरी संबंध असल्याचा संशय आहे. नारोबा तातू राणे व नित्या नारू राणेही एकाच घरात राहतात. महाराष्ट्रात विखेपाटील, मुंडे परिवार, लातुरात निलंगेकर अशा अनेक घराण्यांची भाजपातील नाती-गोती तपासावी लागतील,” अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा :  Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

शिंद्यांसारख्यांची घराणी दलाली व खोकेबाजीचा वारसा पुढे नेतात

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, वारसा प्रकाश आंबेडकर पुढे नेत आहेत. उद्या आंबेडकरांच्या घराणेशाहीवरही शिंदे आपली जीभ टाळ्यास लावतील. ज्यांच्या घराण्यात विचार आहे, तोच विचारांची घराणेशाही पुढे नेतो. शिंद्यांसारख्यांची घराणी ही दलाली व खोकेबाजीचा वारसा पुढे नेतात. महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे उदयन राजे भाजपच्या घरात आहेत. शिंदे त्यासही घराणेशाहीच म्हणणार काय?” असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून बेताल बडबडतात अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. “मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात, पण गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील! ती वेळ दूर नाही. महाराष्ट्र रामशास्त्र्यांचा आहे. छ‘दाम’शास्त्र्यांचा नाही,” असं लेखाच्या शेवटी म्हटलेलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …