तांत्रिक चुकीमुळे मुंबईतील गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडणे कठिण; VJTI संस्था काढणार तोडगा

Andheri Gokhale Pool :  अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची मदत घेण्यात येत असून लवकरच त्यांच्याकडून सूचना अपेक्षित आहेत. या सूचना प्राप्त होताच गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याचा समावेश करून ती कामे हाती घेण्यात येतील, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

 

अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याचा मुद्दा प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमातून सातत्याने चर्चेत आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून खालील प्रमाणे वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन बर्फीवाला पूल हा गोखले पुलासोबत जोडण्यासाठी अनेक पर्यायांवर विचारमंथन करण्यात येत आहे. 

गोखले पुलाचा पहिला टप्पा 26 फेब्रुवारी 2024 रोजी खुला करून देण्यात आला. तर अगोदरच नियोजित केल्याप्रमाणे दुसर्यार टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल.

 

पुलाच्या ठिकाणी व्हीजेटीआय संस्थेच्या सल्लागारांनी प्रकल्प स्थळी भेट दिली असून दोन्ही पूल जोडण्यासाठीची पद्धती त्यांच्याकडून सुचवले जाणे अपेक्षित आहे. ही पद्धती बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुचविण्यात आल्यानंतर दोन्ही पुलाच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल. त्यासोबतच दुसर्याा टप्प्याचे कामही त्याचवेळी जलदगतीने करण्यात येईल. बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या जोडणी बाबत प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे.

हेही वाचा :  Maharashtra Rain Updates : घाटमाथ्यावर 'रेड' तर, मुंबईत 'ऑरेंज अलर्ट'; घराबाहेर पडण्याआधी वाचा पावसाची बातमी

 

बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्ग येथे दुरूस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची  आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नियोजित केल्याप्रमाणे दुसर्या  टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल. व्हीजेटीआय संस्थेच्या माध्यमातून सुचवण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचे अनुकरण करत हे दोन्ही पूल जोडण्याचे काम लवकरच बृहन्मुं बई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. 

 

गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या महानगरपालिका क्षेत्रातील पुनर्बांधणीचे कार्यादेश 20 एप्रिल 2020 रोजी देण्यात आले. तर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम15 मार्च 2021 रोजी सुरू झाले. जुन्या पुलाच्या निष्कासनाची कार्यवाही पूर्व दिशेला सुरू असताना रेल्वे प्रशासनाने 24 मार्च 2021 आणि 16 एप्रिल 2021 रोजी लिहिलेल्या पत्रानुसार कळविले की, रेल्वे भागातील पुलाचे पुनर्बांधणीचे काम करणे आवश्यक आहे.

 

मुंबई महानगरपालिकेने हे काम करताना रेल्वे पुलाखाली किमान 6 मीटर इतकी ओव्हरहेड उंची ठेवून हे पुनर्बांधणीचे काम करावे. त्यानुसारच रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हर ब्रीज) ओपन वेब गर्डरच्या आराखड्याचे काम पूर्ण करून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने हा आराखडा 30 मे 2022 रोजी मंजूर केला. आराखडय़ात रेल्वे भागातील पुलाच्या 8.45  मीटरच्या उंचीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. परिणामी रेल्वे हद्दीतील पुलाची उंची ही  2.73 मीटरने वाढली. सद्यस्थितील रेल्वे भागातील पुलाची पातळी व बर्फीवाला जंक्शन येथे पुलाची पातळी यामध्ये दोन्ही पुलाच्या उंचीतील फरकहा 2.83 मीटर इतका आहे. 

हेही वाचा :  लोन ॲपच्या जाळ्यात अडकलं आणि संपूर्ण कुटुंब संपलं! 'ही' सुसाईड नोट सर्वांसाठी एक धडा

 

इंडियन रोड कॉंग्रेस: 86- 2018  च्या अनुच्छेद 9.2 अन्वये शहरी भागात वाहनांसाठी उतार (व्हर्टिकल ग्रेडिएंट) हा 4 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. इंडियन रोड कॉंग्रेस: 86 – 2018 च्या अनुच्छेद 9.२ अन्वये सुरक्षित ताशी 20 किमी वेगाने वेग प्रतिबंधात्मक अंतर हे 20 मीटर इतके असायला हवे. नवीन वाढीव उंचीच्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाला सद्यस्थितीतील बर्फीवाला पुलाच्या उंचीला जोडण्यासाठी खूपच रस्ता तयार केला असता तर व्हर्टिकल ग्रेडिएंट 7.25 टक्के इतका म्हणजे प्रचलित नियमाच्या तुलनेत 3.25 इतका अधिक उतार तयार झाला असता. तर उतारावरील स्टॉपिंग साईट डिस्टन्स म्हणजे वाहन थांबण्याच्या गतीचे अंतर ताशी 20 किमी वेगाने फक्त 4.55 मीटर इतके कमी झाले असते. 

 

या दोन्ही बाबी प्रचलित नियम आणि वाहन सुरक्षा या दोन्ही दृष्टीने अतिशय धोकेदायक आहेत. परिणामी गोखले पुलावर रेल्वे भागातील खांब क्रमांक 5 आणि बर्फीवाला जंक्शन हे जोडणीसाठी शक्य नसल्याचे सल्लागारांनी स्पष्ट केले होते.

तसेच नव्याने बांधण्यात आलेला गोपाळ कृष्ण गोखले पुलाचा उतार हा स्वामी विवेकानंद मार्गाच्या दिशेने असून उत्तर दिशेचा बर्फीवाला पुलाचा उताराचा भाग गोखले पुलाच्या दिशेने आलेला आहे. दोन्ही पुलाचे चढ-उतार हे एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे दोन्ही पुलाचे उतार पाहता बर्फीवाला उड्डाणपूल हा गोखले पुलाला जोडणे शक्य नाही. अतिशय खोल उतार असल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. 

हेही वाचा :  Cyclone Biporjoy महाराष्ट्रापासून नेमकं किती दूर? मान्सूनवर चक्रिवादळाचे काय परिणाम, पाहा...

 

व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच त्यांचा अवलंब करून बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याच्या कामासाठी लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

खोल उताराचे तोटे खालीलप्रमाणे असू शकतात 

  • वाहनाची स्थिरता- तीव्र उतारामुळे वाहनाच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः अवजड किंवा मालवाहू वाहनांवर याचा परिणाम होतानाच वाहनाचे नियंत्रण सुटू शकते.
  • ब्रेकिंगची समस्या- तीव्र उतारामुळे ब्रेकिंग सिस्टिमवर परिणाम होतानाच इंजिन ओव्हरहिट होणे तसेच ब्रेक निकामी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
  • वाहनांच्या देखभालीवर परिणाम- तीव्र उतारामुळे सततची देखभाल दुरुस्ती गरजेची असते. परिणामी देखभाल दुरूस्ती खर्चात भर पडते.
  • रस्ते वापरावर मर्यादा- तीव्र उतारामुळे अशा रस्त्याच्या वापरावर काही वाहनांना मर्यादा येतात. ज्या वाहनांची अश्वशक्ती कमी आहे किंवा वहन क्षमता कमी आहे, अशा वाहनांना खोल उतारावरून पुढे जाताना वाहतुकीसाठी मर्यादा येतात.
  • इंधन बचतीवर परिणाम- जी वाहने उंच चढावर प्रवास करतात, अशा वाहनांना अधिकचे इंधन खर्ची होते.
  • वाहतुकीवर परिणाम- तीव्र उतारामुळे वाहतुकीच्या वेगावर परिणाम होतो. परिणामी वाहतूक मंदावतानाच प्रवासाचा वेळ वाढतो.
  • प्रवासाची गैरसोय-  तीव्र उतारावरील प्रवासामुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागणे यासारखे विपरीत परिणाम होऊ शकतात.
  • वाहन कार्यक्षमतेवर परिणाम- तीव्र उतारावर वाहन चालल्याने अधिकचा आवाज निर्माण होतानाच, कंपने वाढून तसेच गैरसोयीचा प्रवास होतो.
  • दृश्यमानतेत घट- तीव्र उताराचा परिणाम म्हणून वाहनचालकांच्या दृश्यमानतेत घट होवू शकते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …