Rohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस…; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार भावूक!

Rohit Pawar Emotional Post: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. मात्र, संकटाच्या काळात आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग रोहित पवारांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?

नेहमीप्रमाणे आज सकाळी घरी गेल्या गेल्या मुलं धावतच जवळ आली. मला घट्ट पकडलं. मलाही त्यांच्या त्या स्पर्शाचं समाधान नेहमीपेक्षा अधिकच वाटलं. त्यांना जवळ घेऊन बोलत असताना मुलाने प्रश्न केला. डॅडा 5 दिवस झालेय कित्ती वाट पाहतोय तुझी…कुठं गेला होता? (ते दोघंही मला कधी अरेतुरे तर कधी अहोजाहो बोलतात. त्यांच्यासोबतची जवळीक अधिक वाढावी आणि नातं अधिक घट्ट रहावं, म्हणून मलाही तसंच आवडतं.) त्याच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं.. बाहेर होतो बाळा… अडचण होती जरा…

काय अडचण झाली डॅडा? त्याचा पुढचा प्रश्न… आपल्या संघटनेत जरा अडचण आली होती, असं मी त्यांना उत्तर दिलं. काय अडचण आली होती? असा प्रश्नांची सरबत्ती लावली. निरागसपणे एकामागून एक असे अनेक प्रश्न विचारणं त्याचं चालूच होतं. आता या लहान पोराला सांगावं तरी काय, असा प्रश्न पडला होता. दुसरं काहीतरी बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करत होतो. कारण घरी येताना राजकारण घरात घेऊन यायचं नाही आणि बाहेर राजकारण करत असताना मध्ये घर आणायचं नाही, हा माझा मूळ स्वभाव. पण आजचा प्रसंग मात्र माझ्यासाठी अत्यंत वेगळा होता. 

हेही वाचा :  शरद पवारांची तंबी, तरीही सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले 'अजितदादांना खलनायक...'

मी त्याला म्हणालो, अरे बाळा काही नाही, ज्या पक्ष संघटनेत मी काम करतो ना ती संघटना आज अडचणीत आहे. त्यातच संघटना आणि आपल्या कुटुंबात अंतर पडतं की काय असं वाटतंय… काही आपल्याच जवळची माणसं… माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मी गप्प झालो. तेवढयात तो म्हणाला, बोल ना डॅडा! 

त्याच्या बोलण्याने पुन्हा भानावर येत कसंतरी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलत असताना मनावर अत्यंत तणाव होता. बोलताना शब्द जड होत होते. नेहमीसारखी सहजता नव्हती. संघटनेतील ज्या गोष्टीमुळं पाच-सहा दिवसांपासून अत्यंत अस्वस्थ होतो, ती गोष्ट काही क्षणापुरती विसरुन मुलांना बोलावं, त्यांनी कसा अभ्यास केला? काय ॲक्टिीव्हिटी केली? हे विचारावं असं वाटंत होतं. पण जणूकाय मूळ विषय माझी पाठ सोडतच नव्हता. मुलाच्या या प्रश्नांनी मी निरुत्तर होत होतो..… या चिमुकल्या वयात त्याला काय आणि कसं उत्तर द्यावं, असा गोंधळ माझ्या मनात सुरु होता. 

तेवढ्यात मुलीने प्रश्न विचारायला सुरवात केली.…  मग आता काय होईल डॅडा? तू कॉफी घेतली का? असे एका दमात तीने दोन प्रश्न मुलीने विचारले. काही नाही बेटा सगळं ठीक होईल. आपल कुटुंब जपणं, सर्वांनी गुण्यागोविंदाने, सामंजस्याने, आनंदाने एकत्र राहणं ही आपली संस्कृती आहे. पण त्याबरोबर आपले विचार जपणं हेही तेवढंच गरजेचं असतं आणि हे विचार जपणारी माणसं आहेत आपल्या सोबत… तिला माझं हे बोलणं कितपत कळलं की नाही माहीत नाही. पण तिने होकारार्थी मान हलवली.. आणि माझा हात स्वतःच्या चिमुकल्या हातात घेतला आणि दुसरा हात माझ्या तोंडावरुन फिरवत म्हणाली ‘नो टेंशन डॅडा.. काळजी करु नको.. मॉम, आजोबा, आजी हे आम्ही पण सगळेजण आहोत ना सोबत’

हेही वाचा :  तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

तिचे हे शब्द कानावर पडताच मनात विचार आला… ज्यांना आपण लहान आहेत असं म्हणतो, पण ते खरंच किती मोठे असतात ना… अडचणीच्या काळात जवळची माणसं जेंव्हा आधार बनतात तो आधार खरंच डोंगराएवढा मोठा असतो, असं रोहित पवार म्हणतात.

पाहा ट्विट – 

दरम्यान, शेवटी कर्तव्याची जाणीव असलेला बाप म्हणून त्या दोघांनाही थोडा वेळ मॉलमध्ये घेऊन गेलो. पण यानिमित्ताने त्यांच्यासोबत घालवलेला वेळ मात्र त्यांच्यापेक्षा मलाच खूप काही देऊन गेला, अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

इथून पुढे Upi Transaction…; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम

HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. अलीकडेच बँकेने ग्राहकांसाठी नवीन …

‘नग्नता म्हणजे सौंदर्य नाही, आमच्याकडे नग्नता..’; जाहीर भाषणात ‘तिने’ ब्रिटीश राजघराण्याला सुनावलं

First Lady Slams Meghan Markle: नायजेरियाच्या प्रथम महिला सिनेटर ओलुरेमी टिनुबू यांनी ब्रिटीश राज घरण्यातील सदस्या …