“गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला”, ‘सामना’तून शिंदे गटावर सडकून टीका

Maharashtra Political Crisis: जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. अजित पवार पावव्यांदा उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे. तसंच या सगळ्याचे सूत्रधार दिल्लीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

“महाराष्ट्रात भाजपने जे केले त्यामुळे संपूर्ण देशात त्यांची छिः थू होत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनाच काय ते पक्षात घेऊन पद वाटप करायचे बाकी आहे. या तिघांपैकी एकास पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार, दुसऱ्यास निती आयोग व तिसऱ्यास देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नेमले जाईल. कारण भ्रष्टाचार, लुटमार, नैतिकता हा आता त्यांच्यासाठी मुद्दा राहिलेला नाही. सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार हे चक्की पिसायला तुरुंगात जातील अशी गर्जना देवेंद्र फडणवीस वारंवार करीत होते, पण त्याच अजित पवारांनी फडणवीस यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सोमवारी हे ‘चक्की पिसिंग’ फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर त्यांच्या गटाचे खातेवाटप करीत बसले, आश्चर्यच आहे!,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. 

“खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ बंगल्यावर व्हायला हवी होती, पण अजित पवार व त्यांचा गट पोहोचला ‘सागर’वर. हे आश्चर्यच म्हणायला हवे. मुख्यमंत्र्यांची ही अशी अवस्था केविलवाणी आहे व दिवसेंदिवस ती अधिकच दयनीय होत जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे गरजणारे मिंधे गटाचे एक मंत्री गुलाबो पाटील हे राजभवनात अजित पवारांच्या चरणांवर लोटांगण घालायचेच काय ते बाकी होते. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सोडली व त्यांच्याच पायाशी लोटांगण घालणाऱ्या या ओशाळवाण्या चेहऱ्यांकडे पाहून जनता हसत होती. राष्ट्रवादी आमच्याबरोबर सत्तेत सहभागी झाली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे गरजणारे मिंधे गटाचे सर्व प्रवक्ते अचानक गायब झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची तर वाचाच गेली आहे. मिंध्यांचे एक मंत्री सावंतवाडीचे दिपू केसरकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच सांगितले होते, ‘बंड फसले असते तर शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल चालवले असते. त्यांची तेव्हाची फारच खराब होती.’ पण अजित पवारांच्या शपथ ग्रहणानंतर मुख्यमंत्र्यांची मानसिक अवस्था सुरत व गुवाहाटीपेक्षा जास्तच बिघडली असेल. म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावरील सर्व शस्त्रे लगेच सरकारजमा केली पाहिजेत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

हेही वाचा :  'आम्ही हाय तुमच्या पाठीमागं, काय घाबरु नका'; आज्जीची पवारांना भावनिक साद, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

“गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला” 

“महाराष्ट्राची सत्ता मिळावी म्हणून गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिल्याने मिंधे गटाची अवस्था विचित्र झाली आहे. दिल्लीवाल्यांची लाथ व फडणवीसांचा बुक्का अशा कोंडीत ते सापडले. अजित पवार यांना मांडीवर घ्यायचे की पायाशी बसून रोज अपमानाचे घोट गिळायचे? असा पेचप्रसंग मिंधे गटाला पडलाय खरा, पण श्रीमान फडणवीस यांचीही काही वेगळी अवस्था नाही. अजित पवार, हसन मुश्रीफ, भुजबळ, प्रफुल पटेल यांनीच त्यांच्या तंबूत सन्मानाने प्रवेश केल्याने ते आता चक्की पिसायला कोणास पाठवणार आहेत? मुलुंडचे पोपटलाल, अंजलीबाई दमानिया यांनी तरी काय करायचे? भुजबळांविरुद्ध काय कमी मोहीम उघडली होती? सिंचन घोटाळ्याचेच गाडीभर पुरावे घेऊन फडणवीस बैलगाडीवर स्वार झाले होते. तुरुंगात नवाब मलिक यांच्या बाजूची कोठडी त्यांनी या सगळ्यांसाठी राखूनच ठेवली होती. आता फडणवीस काय करणार? ‘सागर’ बंगल्यावर याच मंडळींसोबत मांडीला मांडी लावून खातेवाटप करण्याचा बाका प्रसंग मोदी-शहांनी त्यांच्यावर आणला,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे. 

“फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, नंतर ते शिंद्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राची ही अवस्था म्हणून ‘एक फुल दोन हाफ’ अशीच झाली आहे. पण जो फुल आहे तोसुद्धा ‘डाऊटफुल’ असल्याने चिंताग्रस्त चेहऱ्याने वावरतो आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. 

हेही वाचा :  "मातोश्राचे रस्ते कसे झाले दाखवतो तुम्हाला"; गुलाबराव पाटील यांची आदित्य ठाकरेंना धमकी

“शरद पवार यांनी सांगितले ते खरे आहे. ‘कालपर्यंत जे भ्रष्टाचारी होते तेच सरकारमध्ये गेल्याने त्यांच्यावरील आरोपांतून त्यांना मुक्त केले असेच समजायचे.’ महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. विचारांची लढाई विचाराने लढण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. मोदी-शहा-फडणवीसांच्या व्यापारी राजकारणाने या परंपरेस चूड लावली आहे. आणखी एक आश्चर्य असे की, श्री. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत व अजित पवार, प्रफुल पटेल वगैरे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चिन्हासह आपलाच असल्याचे जाहीर करून टाकले. शिवसेना फुटीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की, विधिमंडळातील फुटलेला गट म्हणजे पक्ष नव्हे. हे ‘फुटके’ पक्षावर दावा सांगू शकत नाही. हे सत्य असताना ‘पक्ष व चिन्ह’ आमचेच असे सांगणे हे फाजील आत्मविश्वासाचे लक्षण आहे. पण दिल्लीतील महाशक्तीने डोक्यात हवा भरली की हे फाजील आत्मविश्वासाचे फुगे फुगतात,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

“शिवसेना जशी जागच्या जागी राहिली तसेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिसत आहे. शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी साताऱ्याकडे कूच केले तेव्हा हजारो लोक रस्त्यावर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. राजभवनावरील शपथविधीस ज्यांनी हजेरी लावली त्यातले काही आमदारही पवारांसाठी हारतुरे घेऊन उभे होते. हे चित्र आशादायी आहे. प्रफुल पटेल यांनी जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक केली. हा पोरकटपणा आहे. या सगळ्यामागचे खरे सूत्रधार दिल्लीत आहेत,” असा आरोप शिवसेनेने केला आहे. 

हेही वाचा :  वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Anant and Radhika celebrated pre wedding cruise party : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा …

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …