Farmers Crisis : शेतकरी नवरा नको गं बाई; वावरातील कारभारी शोधतोय कारभारीण!

Farmers Crisis : शेतकरी नवरा नको गं बाई…ही काही आता चेष्टेवारी घ्यायची गोष्ट उरलेली नाही. उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी….असं म्हणायचे दिवस गेले. शहरी तर सोडाच मात्र ग्रामीण महाराष्ट्रातील मुलींनाही शेतकरी मुलापेक्षा नोकरी, त्यातही खाजगीपेक्षा कनिष्ठ का असेना पण सरकारी नोकरी असलेला मुलगाच लग्नासाठी हवाय. मुली न मिळाल्यानं ग्रामीण भागात वय उलटून जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय. मार्च ते मे हा तसा लगीनसराईचा काळ. मात्र, यंदाचे मुहूर्त गेले, इतरांची लग्न झाली आपलं कधी हा प्रश्न अनेक शेतकरी उपवरांना भेडसावतोय. 

हे असं होण्याला कारणीभूत आहे बदलती ग्रामीण भागातली सामाजिक-आर्थिक स्थिती आणि युवतींच्या आशा-अपेक्षा. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली अस्मानी-सुलतानी संकटं, हमीभाव, नापिकी, अवकाळी आणि पिढीगणिक लहान होत जाणारा शेतीचा तुकडा. याच्या जोडीला कर्जाचा विळखा. 

जळजळीत वास्तव 

एकीकडे पुरूष माणसांची ही स्थिती तर बायाबापड्यांचे दुष्काळात पाण्यासाठी होणारे हाल हे दुसरं टोक. ग्रामीण मुलींनी हे जळजळीत वास्तव नुसतं पाहिलेलंच नाही तर आपापल्या घरी अनुभवलेलंसुद्धा आहे. शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या मुलींच्या या मुद्यांकडेही पाहावं लागेल. फार कशाला. खुद्द अशा मुलींचे आई-वडीलच जे आपण भोगलं ते आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये, अशाच भूमिकेचे असतात.

हेही वाचा :  'आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच' ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

मुलींच्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती… 

सुरक्षित आर्थिक जीवन इतकीच या मुलींची अपेक्षा नसते. या मुलींना शहरी वातावरण, गृहसंकुलातील आधुनिक सोयी असलेलं राहणीमान, स्वत:च्या करियरसाठी आणि पुढे मुला-बाळांसाठी असलेल्या शैक्षणिक सुविधा अशा एकूणच मध्यमवर्गीय जीवनाची आकांक्षा असते. शहरातल्या अशा मध्यमवर्गीय जीवनातील नव्या आणि छोट्या कुटुंबकेंद्री सांस्कृतिक वातावरणाचं त्यांना आकर्षण असतं.

शेतकी पुत्रांची ही व्यथा शेतकरी चळवळी आणि संघटनांच्याही लक्षात येऊ लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तर शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीच्या नावे 10 लाख आणि तिच्या वडलांच्या नावे 5 लाख मुदत ठेव करण्याची मागणी लावून धरण्याचं ठरवलं आहे. शेतकरी उपवर तरूणांचा हा विषय मराठी सिनेमा- सिरियलवाल्यांच्याही नजरेत भरला आहे. मात्र खरंच शेतकरी नवरा असल्यास मुली तितक्याच सकारात्मकतेनं लग्नाच्या बेडीत अडकतील का याचं उत्तर हे बिनभरवशाच्या हवामानाइतकंच अनिश्चित आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …