राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन; मुंबईत लाखोंची दंड वसुली

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलली असतानाच बांधकाम – पाडकामाचा राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही महानगरपालिकेने सक्त मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून शुक्रवार, दिनांक ३ ते रविवार ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पर्यंत एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरु राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना राबवण्याची सूचना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर विविध कामे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये सरकारी, निमसरकारीसह खासगी बांधकामांद्वारे होणारे वायू प्रदूषण तसेच धूळ नियंत्रण कामे याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे पालन न करणा-या संबंधितांवर सक्त कारवाईचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे. 

हेही वाचा :  Santosh Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी 100 वर्षांची परंपरा मोडली? ग्रामस्थ चिडले आणि...

महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार , बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत (वरच्या बाजूने आणि सर्व बाजूंनीसुद्धा). जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरुन वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी/ परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम राडारोडा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम व पाडकाम मलबा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच नेला जावा. राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले पाहिजे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांनी या कामी भरारी पथके गठीत केली आहेत. 

हवा गुणवत्ता निर्देशांकनुसार धुळीचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्म धूलिकण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने दंडात्मक उपाययोजना देखील आता करण्यात येत आहेत. राडारोडा वाहून नेणारी वाहने, बांधकाम ठिकाणे व त्याजवळील सार्वजनिक ठिकाणे येथे आवश्यक ती उपाययोजना न राबविल्यामुळे झालेले प्रदूषण यावर नियंत्रण आणणे, हा यामागील उद्देश आहे.

राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपयांचा दंड तीन दिवसात वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  गर्लफ्रेंडचा मृतदेह खड्ड्यात पुरला आणि त्यावर मीठ टाकलं... आरोपीचं लॉजिक पोलिसांच्याही डोक्याबाहेर

यामध्ये, जी दक्षिण विभागात १५ हजार रुपये, पी उत्तर विभागात ८० हजार रुपये, एन विभागात ७० हजार रुपये, एस विभागात ४५ हजार ६९२ रुपये, टी विभागात ५० हजार रुपये , पी दक्षिण विभागात १३ हजार रुपये, के पश्चिम विभागात १० हजार रुपये, एफ उत्तर विभागात ४५ हजार रुपये, जी उत्तर विभागात १० हजार रुपये असा एकूण ४ लाख ७१हजार ६९२ रुपयांचा दंड रकमेचा समावेश आहे. 

 महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जावे. याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल. या पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरु राहणार आहे. स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि हरित मुंबई ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच नागरिकांची देखील आहे, असेही आयुक्त महोदयांनी नमूद केले आहे. 

परिमंडळ निहाय दंड रकमेची आकडेवारी

परिमंडळ १ – निरंक
परिमंडळ २ – ७० हजार रुपये 
परिमंडळ ३ – ५३ हजार ५०० रुपये 
परिमंडळ ४ – १ लाख ३ हजार रुपये 
परिमंडळ ५ – ५६ हजार ५०० रुपये 
परिमंडळ ६ – १ लाख ६३ हजार ६९२ रुपये 
परिमंडळ ७ – २५ हजार रुपये

हेही वाचा :  Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …