‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. या अशा मोहिमांमुळे झाडूही बदनाम झाला आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे. 

हे कोणते धार्मिक अधिष्ठान?

“अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशभरात एक वेगळीच नौटंकी चालवली आहे. ही नौटंकी पाहून प्रत्यक्ष प्रभू श्रीरामही स्मित करीत असतील. भाजपचे केंद्रीय मंत्री यानिमित्ताने देशभरातील मंदिरांतील साफसफाई मोहिमेत रममाण झाले आहेत. केंद्रातले मंत्री, त्यांचे राज्याराज्यांतील मंत्री, भाजपचे पुढारी राममंदिर सोहळ्याच्या निमित्ताने गावोगावच्या मंदिरांत झाडू मारीत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील हे कोणते धार्मिक अधिष्ठान म्हणायचे? काय तर म्हणे, मंदिर सफाईचे आदेश पंतप्रधानांनी दिले होते. स्वतः पंतप्रधान मोदी 12 जानेवारीस नाशिकच्या काळाराम मंदिरात आले व त्यांनी मंदिराच्या चकचकीत फरशीवर ‘मॉप’ फिरवून सफाई मोहिमेचा शुभारंभ केला,” अशा खोचक शब्दांमध्ये ठाकरे गटाने भाजपाने सुरु केलेल्या या मोहिमेवर टीप्पणी केली आहे.

हेही वाचा :  Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?

‘स्वच्छ’ झालेल्या मंदिरात झाडू मारून पंतप्रधानांनी काय साधले?

“खरे तर पंतप्रधान येणार म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काळाराम मंदिर सफाईवर 10-12 लाख खर्च करून साफसफाई केलीच होती. शिवाय मंदिराच्या विश्वस्त संस्थेनेही स्वतंत्र दोन-चार लाख खर्च करून सफाई करून घेतली होती ती वेगळीच. त्यामुळे त्या ‘स्वच्छ’ झालेल्या मंदिरात झाडू मारून पंतप्रधानांनी काय साधले? एका फोटो उत्सवाची सोय झाली इतकेच. पुन्हा पंतप्रधान मंदिर सफाई करीत असताना आजूबाजूला सन्नाटा होता. चिटपाखरूही दिसत नव्हते. एखाद्या निर्जन जागेवर पंतप्रधान सफाई करीत आहेत असेच ते चित्र होते. मंदिर हे भक्तांसाठी आहे. भक्त नसतील तर मूर्तीचे देवत्व आणि तेज कमी होते, पण पंतप्रधानांच्या फोटो सेशनच्या वेळी भक्तांना आसपास फिरकू न देण्याची व्यवस्था केलेली असावी,” अशा शब्दांमध्ये ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

ज्यांनी राज्य करायचे, प्रशासन चालवायचे त्यांना धार्मिक अनुष्ठानात…

“पंतप्रधानांनी चकचकीत फरशीवर सफाईचे फडके मारताच त्यांचे भगतगण तरी मागे कसे राहतील? त्यांनीही स्वच्छ, चकचकीत मंदिराचा शोध घेऊन तेथे झाडू मारण्याच्या मोहिमा सुरू केल्या. मुख्यमंत्री मिंधे हे ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिराच्या चकाचक लादीवर झाडू मारतानाचा हास्यास्पद फोटो प्रसिद्ध झाला आहे. मुंबईतील मंदिरांतही भाजपवाल्यांनी सफाई केल्याचे पाहायला मिळाले. राज्याराज्यांत हा सफाई कार्यक्रम सुरू झाला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौच्या हनुमान सेतू मंदिरात जाऊन साफसफाई केली. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन त्यांनी लादी पुसली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरात जाऊन झाडूने मंदिर परिसर साफ केला. आणखी एक केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भुवनेश्वर येथील मंदिरात जाऊन झाडू मारला. वैष्णव हे रेल्वेमंत्री आहेत. लोकल ट्रेन्स, रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड अस्वच्छता आहे, त्यांची प्रसाधनगृहे घाणेरडी आहेत. त्यामुळे खऱ्या साफसफाईची गरज तेथे आहे. मात्र ती सोडून हे महाशय मंदिराच्या स्वच्छ फरशीवर झाडू मारीत आहेत. धर्मेंद्र प्रधान, मीनाक्षी लेखी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही विविध मंदिरांत जाऊन झाडू मारला. ज्यांनी राज्य करायचे, प्रशासन चालवायचे त्यांना धार्मिक अनुष्ठानात, मंदिरांच्या साफसफाईत गुंतवून भाजप निवडणुकांना सामोरे जाणार आहे,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

हेही वाचा :  चार दिवसांत पाचशे नियोजित शस्त्रक्रिया स्थगित!; वैद्यकीय शिक्षकांना आश्वासनाचे पत्र मिळालेच नाही | Five hundred planned surgeries postponed in four days akp 94

मोदींनी उपवास केल्याने…

“देशाच्या सीमेवर गोंधळाचे चित्र आहे. मालदीवसारखा पाच लाख लोकसंख्येचा देशही भारतावर गुरगुरत आहे व देशाचे संरक्षणमंत्री मंदिरात झाडू मारीत आहेत. देशात बेरोजगारी, उपासमारी, बालकांचे कुपोषण सुरू आहे. आर्थिक विषमतेचा कहर आहे, पण पंतप्रधान मोदी अयोध्येनिमित्ताने धार्मिक अनुष्ठानात गुंतून पडले आहेत. राममंदिर सोहळ्याच्या निमित्ताने मोदी दहा दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या उपवासामुळे देशातील 35 टक्के लोकांची उपासमार थांबणार आहे काय? मोदी तीन दिवस मंदिरातच साध्या सतरंजीवर झोपणार आहेत. कश्मीरातील शेकडो कश्मिरी पंडित गेली अनेक वर्षे निर्वासितांच्या छावण्यांत अशाच पद्धतीने जीवन जगत आहेत. पंतप्रधानांच्या ‘सतरंजी’ उपक्रमाने पंडितांची घरवापसी होणार आहे काय?” असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

भारतीय जनता पक्षाने महान हिंदू संस्कृतीचे ‘डबके’ केले

“मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे. हिंदूंची मंदिरे साफ नाहीत म्हणून मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना ती साफ करावी लागत आहेत, असा संदेश त्यामुळे जातोय व हा हिंदुत्वाचा अपमान आहे. वास्तविक, झाडू हे हिंदू संस्कृतीत देवी लक्ष्मीचे पवित्र प्रतीक मानले गेले आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी केला जातो, तो त्यामुळेच. नवीन वास्तुप्रवेशाच्या वेळीही नवीन झाडू घेऊन प्रवेश करणे शुभ मानले गेले आहे. झाडूचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याविषयीदेखील हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिष शास्त्रात सूचना दिल्या आहेत. हिंदू धर्म आणि संस्कृतीत झाडूला एवढे महत्त्व असताना केंद्रातील मंत्र्यांनी, भाजप पुढाऱ्यांनी मंदिरात घुसून सफाईची नौटंकी करणे हे पवित्र, संस्कारी हिंदू धर्माचे ओंगळवाणे प्रदर्शन ठरते. संकुचितपणाचे वावडे असणारी आपली हिंदू संस्कृती आहे. हिंदू संस्कृती स्वच्छ, पारदर्शक आहे. हिंदू संस्कृती ही हृदय व बुद्धी यांची पूजा करणारी आहे. उदार भावना, निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनास सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे. ज्ञान-विज्ञानास भावनेची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी हिंदू संस्कृती आहे. कर्म, ज्ञान, विकास, भक्तीचा जिवंत महिमा, शरीर, बुद्धी व मन यांना सतत सेवेत झिजविण्याचा महिमा म्हणजे हिंदू संस्कृती. भारतीय जनता पक्षाने या महान संस्कृतीचे ‘डबके’ करून ठेवले. त्यामुळे झाडूही बदनाम झाला,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :  CORONA UPDATE : निर्बंध हटणार, धोका मात्र कायम! आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …