शिंदेंकडे कोणतं व्हिजन? देवरांना ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, ‘CM चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारत..’

Thackeray Group On Milind Deora Joining Shinde Faction: काँग्रेसचा हात सोडून माजी खासदार मिलिंद देवरा हे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले. मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये देवरांसहीत काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता देवरांच्या या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्हिजन असल्याने आपण त्यांच्या गटात सहभागी होत आहोत, असं पक्षप्रवेशावेळी देवरांनी म्हटलं. यावरुनच ठाकरे गटाने देवरा यांना खडे बोल सुनावलेत. “माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडले आहे. देवरा कुटुंबाचे काँग्रेसचे 55 वर्षांचे संबंध होते. मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसमधील बडे प्रस्थ होते व गांधी कुटुंबात मुरली देवरा यांचे वजन होते. केंद्रात देवरा कुटुंबाने सर्वोच्च पदे भूषविली ती काँग्रेसमुळेच. पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा आता त्याग केला व महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या ‘मिंधे’ गटात सामील झाले. काँग्रेस हा एक विचार होताच, पण ‘मिंधे’ गट म्हणजे कोणता विचार आहे की ज्यासाठी 50-50 वर्षांचे काँग्रेसशी नाते त्यांना तोडावेसे वाटले?” असा सवाल ठाकरे गटाने देवरांना विचारला आहे.

हेही वाचा :  Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे 'काळा दिवस', तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन

मुरलीभाई देवरा यांच्या आत्म्यास अतोनात यातना

“राहुल गांधी यांच्या अंतस्थ गोटात मिलिंद देवरा यांचा समावेश होता. पण गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’स रविवारपासून सुरुवात होत असतानाच देवरा यांनी काँग्रेसला सोडले. हा मुहूर्त भाजपने काढला असावा. देवरा हे लोकसभेच्या दोन निवडणुका सातत्याने हरले व ज्या दक्षिण मुंबईतून त्यांना तिसऱ्यांदा लढायची इच्छा होती त्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. त्यामुळे सध्याच्या महाआघाडीत या जागेवर काँग्रेसला लढता येणे शक्य नव्हते. देवरा यांनी या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी 50 वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले. काँग्रेसशी निष्ठा वाहिलेल्या त्यांच्या पिताजींच्या म्हणजे मुरलीभाई देवरा यांच्या आत्म्यास यामुळे अतोनात यातना झाल्या असतील,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मिंधे गटास व्हिजन आहे असा साक्षात्कार

“मिलिंद देवरा म्हणतात, ‘‘एकनाथ शिंदें यांचे व्हिजन खूपच मोठे आहे. पंतप्रधान मोदी व शहा यांचेही देशासाठीचे व्हिजन मोठे आहे. मोदीविरोध हाच काँग्रेसचा कार्यक्रम आहे. तो मला मान्य नाही.’’ तर काँग्रेसचा त्याग करताना मिलिंद देवरा यांनी त्यांचे व्हिजन स्पष्ट केले. काँग्रेसने गेल्या 70 वर्षांत देशात काहीच केले नाही व काँग्रेसला व्हिजन नव्हते व नाही हे त्यांचे म्हणणे आहे. पण या व्हिजन नसलेल्या पक्षानेच माधवराव शिंदे, मुरली देवरा अशांचे नेतृत्व उभे करून त्यांना सत्तेत आणले. आज ज्योतिरादित्य शिंदेही भाजपात गेले व मिलिंदभाई थेट मिंधे गटात गेले. फक्त दीडेक वर्षांपूर्वी शिवसेना फुटीतून, खोक्यांच्या माध्यमातून जन्मास आलेल्या मिंधे गटास व्हिजन आहे असा साक्षात्कार मिलिंद देवरा यांना झाला. मिंधे गटाने महाराष्ट्राची जी लूटमार चालवली आहे तेच व्हिजन असेल तर काय करावे?” असा उपहासात्मक प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

हेही वाचा :  राजपाल यादवच्या दुसऱ्या पत्नीने कॅनडामधून येऊन स्वीकारली भारतीय संस्कृती

याला ‘व्हिजन’ म्हणायचे काय?

“महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेला जात असताना मुख्यमंत्री मिंधे हे स्वच्छ, चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारीत फिरत आहेत. यास ‘व्हिजन’ म्हणायचे काय? देवरा यांनी व्हिजनच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण मिंधे गटात जाण्याचे खरे कारण सांगायला हवे. काँग्रेस पक्ष सोडणे व वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यांनी व्हिजनचा मुद्दा उकरून काढला आहे. मोदीविरोध हाच काँग्रेसचा कार्यक्रम आहे, असे देवरा म्हणतात. या कार्यक्रमात कधीकाळी आपण स्वतःही सामील झाला होता व त्या व्हिजनचे आपणही समर्थक होता. मोदी व त्यांच्या लोकांनी देशात संविधान, कायदा, नियम तसेच घटनात्मक संस्थांची नासधूस चालवली आहे. ‘हम करे सो कायदा’ हे त्यांचे धोरण आहे. आपल्या भांडवलदार मित्रासाठी देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांनी विकायला काढली आहे. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी चालली आहे. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवणे हे देशभक्त राष्ट्रीय पक्षांचे काम आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ त्याच हेतूने काढली आहे. मिलिंद देवरा त्या न्याय यात्रेत सामील होण्याऐवजी मिंधे प्रा. लिमिटेड कंपनीत सामील झाले,” असा उल्लेख लेखात आहे.

हेही वाचा :  बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर

स्वतःचीच अवहेलना करू नये

“मिंधे गटाने मोदी-शहांच्या सहकार्याने शिवसेनेवर दरोडा टाकला. त्या दरोड्यास जनतेचा पाठिंबा नाही. महाराष्ट्राचे मांगल्य व स्वाभिमानाला चूड लावणाऱ्या या चोर मंडळात कुणाला व्हिजन दिसत असेल तर ते व्हिजन त्यांनाच लखलाभ ठरो. कधीकाळी इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचे बेजोड नेतृत्व मिलिंद देवरा यांनी स्वीकारले, पण आता मिंध्यांच्या खुज्या-पोरकट नेतृत्वाखाली त्यांना काम करावे लागेल. मिंधे यांच्या गटासाठी देवरांचे महत्त्व काय? मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंधे गटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर मिंधे गटाचे दिल्लीतील ‘दूत’ म्हणून काम मिळेल. बदल्यात राज्यसभा मिळेल. उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले. मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले व देवरांना नवे व्हिजन मिळाले. यात राष्ट्रकारण व समाजकारण अजिबात नाही. महाराष्ट्राच्या हिताचा तर विषयच नाही. देवरा यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मिंधे गटाच्या व्हिजनमुळे काँग्रेस सोडली, असे बोलून त्यांनी स्वतःचीच अवहेलना करू नये,” असा शाब्दिक चिमटा ठाकरे गटाने काढला आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA तून काढल्यानंतर गेला नैराश्यात, हरला तरी पुन्हा लढला; UPSC देऊन मनुज असा बनला IAS

Success Story IAS Manuj Jindal: प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ येतो जेव्हा सर्वकाही संपलंय असं वाटतं. …

‘मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस…’, CM शिंदेंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण, ‘निर्धास्त होऊन…’

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) अपेक्षित यश मिळालं नाही. महाराष्ट्रातही महायुतीला मोठं अपयश आलं …