‘मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..’, राणेंना ठाकरे गटाचा टोला

“महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पुरता निकाल जनतेने लावला आहे. ‘अब की बार चार सौ पार’वाल्यांचे नाक महाराष्ट्राने कापले, तर त्यांचे दोन्ही कान उत्तर प्रदेशने व ‘मुंडण’ कार्यक्रम राहुल गांधी यांनी केला. तरीही हे लोक विजयाच्या पिपाण्या वाजवत फिरतात हा विनोद आहे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे. “भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

राणेंच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या

“आता श्रीमान राणे यांनी दावा केला आहे की, ‘‘लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली. यापुढे कोकणात कुणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर त्यांची जागा दाखवून देऊ.’’ नारोबांचे हे फूत्कार भाजपच्या अहंकारी वृत्तीस साजेसे आहेत. काही लोकांना ‘जय’ विनम्रपणे स्वीकारता येत नाही. त्यातले हे महाशय आहेत,” अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. “राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  भाजप कार्यकर्त्याकडून मतदान केंद्रात मोबाईलचा वापर, फोनवर बोलतानाचा व्हिडीओ समोर

खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन

“राणे हे पुन्हा मंत्री झाले नाहीत, ही त्यांची योग्यता. (‘लायकी’ हा शब्द अधिक उचित आहे.) राणे हे कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून त्यांनी पक्ष सोडला. राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले. राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाताना त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर घाणेरडी टीका केली. खासगीत ते भाजप नेत्यांवरही हवे ते बोलतात. मोदी यांनी त्यांना आता मंत्री केले नाही व खासदार होऊनही बेकारीचे जिणे आल्याने मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. राणे यांच्याकडे पाहता त्यांची प्रकृती थोडी नाजूक झालेली दिसते. त्यामुळे त्यांना विजयाचे अजीर्ण झाले. असा अजीर्णाचा त्रास राणे यांना यापूर्वी अनेकदा झाला, पण या पोटदुखीवर शिवसेनेनेच जालीम उपाय वेळोवेळी केला,” अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

राणेंचा खरा इतिहास फडणवीसांनीच सांगितला

“शिवसेनेने राणे व त्यांच्या टोळ्यांचा कोकणातील दहशतवाद मोडून त्यांचा पराभव केला. राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. (येथे ‘गाडले’ हा शब्द अधिक उचित आहे.) त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते. कोकणातील निवडणुका म्हणजे ‘हऱ्या-नाऱ्या’ टोळीकडून रक्ताची होळी व खुनाखुनीचा शिमगाच असे. रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत असली तरी या बिल्लीचा खरा इतिहास स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केला आहे,” अशी आठवण ठाकरे गटाने करुन दिली आहे.

हेही वाचा :  Gold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर

मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..

“कोकणात या वेळी नारायण राणे कसे जिंकले त्याचे पुरावे समोर आले आहेत. घरात पैशांची पाकिटे पोहोचवून, पाठवून, लोकांना भ्रष्ट करून, मते विकत घेऊन राणे यांनी हा विजय मिळविल्याचे कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसते. निवडणूक यंत्रणा व जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा मिंधी व बुळी असल्यानेच राणे यांना 48 हजार मतांनी खासदारकीचा टोप डोक्यावर चढवता आला, पण मते विकत घेण्याचा हा प्रकार कोर्टात पोहोचल्याने राणे यांची खासदारकी औटघटकेची ठरू शकते. राणे यांना 4,48,514 मते, तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,00,656 मते मिळाली. म्हणजे स्वतःस महान नेते वगैरे समजणाऱ्या राण्यांना पन्नास हजारांचीही आघाडी मिळालेली नाही. पैशांचा खेळ प्रशासन-पोलिसांच्या सहकार्याने झाला नसता तर राणे किमान दीड-दोन लाखांच्या फरकाने पराभूत झाले असते, पण पन्नास हजारांनी जिंकलेले राणे हे ‘कोकण’ दिग्विजयाच्या वल्गना करीत आहेत. सत्य असे की, भाजपचा पराभव झाला व महाराष्ट्राने मोदी-शहांना त्यांची जागा दाखवली. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची…

“मोदी-शहा यांनी शिवसेना संपविण्यासाठी काय करायचे बाकी ठेवले? पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने एक झंझावात निर्माण केला व त्यात भाजप उडून गेला. राणे स्वतः कसेबसे जिंकले, पण भाजप हरला. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची महाराष्ट्रात हीच अवस्था होते, त्या पक्षाचा पराभव होतो, असे राणे यांचे सध्याचे सहकारी दीपक केसरकर यांनी सांगितले ते तंतोतंत खरे ठरले. राणे यांनी शिवसेनेचा पराभव कोकणात केला हे असत्य आहे. पैसा व पोलीस यंत्रणेच्या मदतीने त्यांनी कोकणी बाणा व स्वाभिमानाची तात्पुरती पीछेहाट केली. कोकणच्या जमिनी, उद्योग यावर परप्रांतीयांचा डोळा आहे. कोकणात विषारी प्रकल्प येत आहेत. त्यावर राणे यांनी बोलायला हवे. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली. चौथ्यांदाही पराभव होईल. मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात. मोदी-फडणवीस-शहांचे तसेच झाले होते. महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला. ” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :  ...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; ग्राहकांनो आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा भाव

Gold Price Today 26th June: आज बुधवारीदेखील सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. सोनं-चांदीच्या …

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …