‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘भाजपच्या टोळधाडीस महाराष्ट्रात..’

Uddhav Thackeray Group On BJP Vs Manoj Jarange Patil Issue: जरांगेंची भाषा ही ठाकरे-पवारांची भाषा वाटत असल्याचं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. याच विधानावरुन आता उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीसहीत राज्य सरकारवर ‘चोराच्या लट्या बोंबा’ म्हणत हल्लाबोल केला आहे. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत ठाकरे गटाने गुन्हा आणि चौकशी केवळ जरांगेंचीच का असा सवाल उपस्थित केला आहे.

प्रकरण अंगलट आले की…

“चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे काय ते सध्याच्या भारतीय जनता पक्षाकडून शिकायला हवे. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न इतक्या दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या भाजपातील टोळीस पडला आहे. जरांगेंची भाषा ही ठाकरे-पवारांची भाषा असल्याचा अफलातून शोधही या टोळीने लावला आहे. एखादे प्रकरण अंगलट आले की, त्यातून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करतो. जरांगे पाटलांच्या बाबतीत तेच घडले आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

जरांगेंवर ठाकरे गटाची टीका

“मराठ्यांना सध्या दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल काय? जर ते आरक्षण टिकणार नसेल तर सरकारकडून समाजाची फसवणूक सुरू आहे, असे जरांगे पाटील म्हणतात. मराठ्यांना ‘ओबीसी’मधून आरक्षण द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे व ते शक्य नाही, असे सरकार म्हणते. कोणाच्याही ताटातले काढून मराठ्यांना आरक्षण नको, तर कोणाच्याही हक्कांना, आरक्षणास हात न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, ही भूमिका सगळ्यांचीच असायला हवी. महाराष्ट्रातील सर्वच समाजात सलोखा राहावा. जात विरुद्ध जात असा संघर्ष गावागावांत उभा राहिला तर महाराष्ट्राच्या एकतेला तडे जातील. तसे होता कामा नये. जरांगे यांनी 10 टक्के आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांवर जी भाषा वापरली ती योग्य नाही. फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत व त्यांच्या बाबतीत भाषेचा वापर मर्यादा राखून करायला हवा. जरांगे हे ग्रामीण भागातील आहेत व त्यांनी अंतरवाली सराटीच्या बाहेरचे जग पाहिले नसल्याने बोलताना त्यांचा तोल जातो. दुसरे म्हणजे सततच्या उपोषणांमुळे संपूर्ण शरीर व मनावरही परिणाम होतो, पण काही असले तरी वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख, असभ्य भाषा योग्य नाही,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा :  नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

राणेंच्या भाषेचं काय?

ठाकरे गटाने भाजपामधील नारायण राणे आणि त्यांच्या मुलांच्या विधानांवरुन टोलेबाजी केली आहे. “एकेरी उल्लेख व धमकीवजा भाषा हेच जरांगे यांना अपराधी ठरविण्याचे कारण असेल तर भाजपच्या फडणवीस टोळीतील अनेक लोक जरांगेंपेक्षा खालच्या थराची भाषा वापरत आहेत. केंद्रातले मंत्री नारायण तातू राणे व त्यांची पिलावळ भाजपात आहे. मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर हात उचलण्याची भाषा या नारायण तातू राणेंनी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. राण्यांची पिल्लेही याला-त्याला मारण्याची भाषा करतात व गृहमंत्री फडणवीस हे आपल्या टोळीचे ‘बॉस’ असल्याचे सांगतात. त्यामुळे जरांगेंचा बोलविता धनी कोण? हे शोधताना या ‘तातू’ पिलावळीचा बोलविता धनी शोधायला हवा,” असंही लेखात म्हटलं आहे.

भुजबळांची भाषा

“कायद्याचे राज्य हे सगळ्यांसाठी समानच असायला हवे. जरांगे यांच्या आंदोलनास हवा देणारे व उपोषणस्थळी त्यांना सरकारी निरोप देणारे कोण होते? याचा तपास ‘फोन टॅपिंग’ फेम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केला तर गृहमंत्र्यांपर्यंत खरी माहिती पोहोचेल. जरांगे यांचे आंदोलन पेटले तेव्हा फडणवीस सरकारमधील छगन भुजबळ यांची भाषा मंत्रीपदास शोभणारी नव्हती. ‘मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकार स्वीकारीत नाही त्याला मी काय करू?’ असे भुजबळ म्हणत होते. त्यामुळे बेताल विधाने करणारे फक्त जरांगे हेच नाहीत, तर सरकारमधील लोक तसेच आहेत, पण गुन्हे दाखल झाले ते जरांगे व एक हजार मराठा कार्यकर्त्यांवर,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन

इंटरनेट बंदमध्ये महाराष्ट्राची भर पडली

“आता महाराष्ट्राचे चित्र नेमके काय आहे? जरांगे हे मुंबईत यायला निघाले होते. त्यांना पोलिसांनी थांबवले. जरांगे मागे गेले, पण मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत व तेथील इंटरनेट सेवा बंद केली. कश्मीर खोऱ्यात, मणिपुरात इंटरनेट सेवा बंद आहे. त्यात आता महाराष्ट्राची भर पडली. हे राज्यकर्त्यांचे नाकर्तेपण आहे. राज्याच्या काही भागांत तणाव आहे. हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही भागांत संचारबंदी आहे. जरांगे हे मागे फिरले व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक होऊ शकेल. अशा प्रकारे जरांगे यांचा करेक्ट कार्यक्रम शिंदे-फडणवीस सरकारने केला व हे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीच जाहीर केले,” असा टोला ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

जरांगेच्या आंदोलनास पैसे कोठून येतात?

“मनोज जरांगेंचे आंदोलन वेळीच थांबवता आले असते, पण सरकारचे ‘इंटरेस्ट’ वेगळ्या पद्धतीचे होते. सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी असा बखेडा निर्माण करून राज्यात फूट पाडायची होती. वातावरण पेटवून राजकीय पोळी भाजायची होती व तो करेक्ट कार्यक्रम सरकारने केलाच. आता जरांगेंना जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपातील आमदारांना तयार केले. आता जशास तसे उत्तर म्हणजे काय? भाजपच्या टोळधाडीस महाराष्ट्रात शांतता नांदावी असे वाटत नाही काय? जरांगेंचे बोलविते धनी जे कोणी असतील ते असतील, पण जरांगे यांना बळ देणारे व आंदोलनात हवा भरणारे ‘हवाबाण हरडे’ फडणवीस यांच्या बगलेतच आहेत. उगाच दुसऱ्यांकडे कशाला बोटे दाखवता? दुसऱ्यांचे भाडोत्री खांदे वापरून बार उडविण्याचे खेळ शिवसेना कधीच करीत नाही. अशा खेळांत सध्याचा भाजप पारंगत आहे. भाजपच्या नेत्यांनी एक इरसाल प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे जरांगे यांच्या आंदोलनास पैसे कोठून येतात? याचे सामान्य जनतेच्या मनातले उत्तर असे की, ‘‘महाराष्ट्रात आमदार-खासदार खरेदीसाठी जेथून पैसे येतात तेथूनच ते येत असावेत.’’ भाजप हा शेठजींचा पक्ष आहे व सावकारी हाच त्यांचा धंदा आहे. त्यामुळे या सावकारीचीही एस.आय.टी. चौकशी होऊ द्या! जरांगे व त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत भाजपच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. चोरांना चोर म्हटले की राग येतो,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :  सरकार विरुद्ध मराठा संघर्ष टाळला जाणार का? जरांगे म्हणाले, 'मागे जी चूक झाली ती...'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …