देशभरातील १५ हून अधिक राज्यांमधील विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे बोर्ड, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डामार्फत होणाऱ्या दहावी, बारावीच्या ऑफलाइन बोर्ड परीक्षांविरोधात याचिका दाखल केली आहे. या परीक्षा ऑफलाइन घेण्याऐवजी वैकल्पिक मूल्यांकन पद्धतीने घेण्याची मागणी करत या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
CBSE ICSE Offline परीक्षांविरोधात याचिका
याचिकेत म्हटलंय की विद्यार्थी राज्य सरकार आणि अन्य बोर्डांच्या या निर्णयामुळे असमाधानी आणि आपल्या भविष्य आणि करिअर संबंधी चिंतित आहेत. याचिकेत कोविड-१९ स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडथळ्यांमळे आलेल्या समस्या आणि ताणासंदर्भातलाही उल्लेख आहे. याचिकाकर्ता विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की परीक्षा ऑफलाइन करण्यासारखी स्थिती सध्या नाही. कारण करोना अद्यापही आहे आणि लोक संक्रमितही होत आहेत. रुग्ण आणि मृत्यूंची संख्याही वाढत आहे.
CBSE Term-2 परीक्षा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षा (CBSE Final Exam) दोन टप्प्यात आयोजित केल्या आहेत. देशातील कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE)ने ICSE इयत्ता दहावी (ICSE Class 10th) आणि इयत्ता बारावीच्या टर्म २ परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आयसीएसई टर्म २ परीक्षा एप्रिलच्या अंतिम आठवड्यात होणार आहे.