ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, ’70 हजार कोटींच्या…’

Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा ‘भारता’चा राहिलेला नसून तो मोदी-शहांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? म्हणूनच शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य पिंवा खंत वाटण्याचे कारण नाही,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

‘करप्ट’ पार्टी मोदी-शहांनी अजित पवारांना सोपवली

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यापद्धतीने अजित पवारांच्या हवाली केला त्याच पद्धतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ‘आयतोबा’ एकनाथ मिंधे यांच्या हाती सोपवली गेली. म्हणजे तुम्ही बेइमानी करून, भ्रष्टाचार करून भाजपच्या गोटात या, आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात देतो, हीच ‘मोदी गॅरंटी’ आहे व लोकशाहीसाठी तो सगळ्यात मोठा धोका आहे. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे ‘नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी’ अशी टीका मोदी-शहांनी केली होती. तीच तथाकथित ‘करप्ट’ पार्टी मोदी-शहांच्या गॅरंटीने आता अजित पवारांना सोपवली,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा :  "1971च्या पराभवाच्या वेदना अजूनही होतायत"; केंद्रीय मंत्र्यांनी चोळलं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब

“जगातले दुसरे मोठे आश्चर्य असे की, अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब स्वतः पंतप्रधान मोदी यांनी फोडला होता. त्याच अजित पवारांना ‘राष्ट्रवादी’ व घड्याळ चिन्ह मिळताच मोदी-शहा-फडणवीस-बावनकुळे वगैरे भाजप कुळांनी अजित पवारांचे अभिनंदन करून एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यापेक्षा ढोंग आणि वैचारिक व्यभिचार तो कोणता?” असा सवाल ठाकरे गटाने उपल्थित केला आहे.

महाराष्ट्रीय जनतेचा मानस

“‘शिवसेना’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’सारख्या महाराष्ट्र अस्मिता जपणाऱ्या मराठी माणसांचे पक्ष पह्डून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पुरती वाट लावण्याची गॅरंटी मोदी-शहांच्या राजकारणाने दिली आहे हे नक्की झाले. विधिमंडळातील बळ म्हणजे खरा राजकीय पक्ष नाही, विधिमंडळातील पक्ष वेगळा व पक्ष संघटन वेगळे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण ‘शिवसेना’ प्रकरणात असतानाही निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता लोकशाही व संविधानाची संपूर्ण हत्या करण्यासाठी हे सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले जाईल. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक महाराष्ट्रीय जनतेला मूर्ख समजले काय? जेथे ‘ठाकरे’ तेथेच शिवसेना व जेथे ‘शरद पवार’ तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, हाच महाराष्ट्रीय जनतेचा मानस आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> आज लोकसभाची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात…; Opinion Poll ची थक्क करणारी आकडेवारी

‘ईव्हीएम’ सेट झाल्या

“महाराष्ट्रात लोकसभेच्या 42 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार आता अमित शहा यांनी केला आहे. देशभरात ते 400 पार करणार आहेत. यावर राष्ट्रीय जनता दलाच्या मनोज झा यांनी उत्तर दिले आहे, ‘‘तुम्ही नेमका आकडा सांगताय याचा अर्थ त्या पद्धतीने ‘ईव्हीएम’ सेट झाल्या आहेत.’’ देशातल्या लोकशाहीचे हे दशावतार आहेत. निवडणूक आयोग, संसद, न्यायालये, ईव्हीएम असे सगळे काही एक-दोन व्यक्तींच्याच मुठीत असल्यावर ही मंडळी महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागाच काय, 148 जागा व देशात 700 जागा सहज जिंकू शकतात,” असा उपहासात्मक टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा :  राज्यातला लाजिरवाणा प्रकार! आदिवासी दलित वस्तीतल्या नागरिकांना प्यावं लागतंय सार्वजनिक शौचालयातले पाणी

अतिविनम्र आविर्भाव अजित पवारांनी आणला

“श्रीमान मोदी हे संसदेत व बाहेर तर्कहीन भाषणे करतात व त्यांचे अंधभक्त टाळ्या वाजवतात. या टाळकुट्यांमुळेच देशात कधी मोगलांचे तर कधी ब्रिटिशांचे राज्य आले होते, पण त्याही काळात छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सावरकर निर्माण झालेच होते व देशावर अन्याय करणाऱ्यांचे धिंडवडे निघाले होते. राष्ट्रवाद हा भाजपचा अजेंडा नसून फक्त निवडणूक आणि सत्ता हाच त्यांचा आत्मा बनला आहे. ‘‘आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत,’’ असा अतिविनम्र आविर्भाव अजित पवार यांनी आणला. हे ढोंग आहे. मोदी-शहांची गॅरंटी हेच या घडामोडींचे सूत्र आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

अजित पवारांची गांडुळाशी तुलना

“शिवसेना जेव्हा याच पद्धतीने मिंधे यांच्या हाती सोपवली तेव्हा याच अजित पवारांनी जाहीरपणे सांगितले होते, ‘‘हे बरोबर नाही. पक्ष ज्यांनी स्थापन केला त्यांच्याकडून काढून घेतला, चिन्ह काढून घेतले. हे निवडणूक आयोगाने केले, पण हे जनतेला पटले का?’’ हे अजित पवारांनी शिवसेनेच्या बाबतीत तेव्हा सांगितले, पण आज त्याच पद्धतीने अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला व जिंकला. आता हे तरी लोकांना पटते का याचे उत्तर अजित पवार व त्यांच्या फुटीर मंडळाने द्यायला हवे. शरद पवार यांनीच अजित पवारांना सर्वार्थाने मोठे केले, पण गांडुळाने समुद्रावर दावा करावा असे आता घडले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा राज्यपालांना इशारा म्हणाले, “गरज पडली तर तुमचं धोतर…”

महाराष्ट्राच्या मानेवर बसलेली भुताटकी

“उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष जनमानसात रुजलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कागदी निर्णयाने त्यांच्या अस्तित्वावर फरक पडणार नाही. निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल. एकनाथ मिंधे, अजित पवार यांनी महाराष्ट्राचे गारदी म्हणून काम केले व गारद्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. शिवसेना असे अनेक घाव झेलून उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांनी झंझावात निर्माण केला आहे. शरद पवारही अनेक वादळे व संकटे झेलून उभेच आहेत. निवडणूक आयोग महाराष्ट्राचा हा उत्साह कसा संपवणार? मोदी-शहांची अप्रामाणिक गॅरंटी आणि निवडणूक आयोगाची घटनाबाह्य झुंडशाही यांचा पराभव महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: राजस्थानच्या बाडमेर येथे गच्चीवर झोपलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे …

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …