ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवाल

Central Government Action Against Adani-Ambani: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातीत आघाडीचे उद्योजक अंबानी आणि अदानी यांचा उल्लेख करत केलेल्या टीकेवरुन आता ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. अदानी-अंबानींकडून काँग्रेसला काळा पैसा पुरवला जात असल्याचा आरोप मोदींनी जाहीर सभेत केल्यानंतर आता ठाकरे गटाने जर या उद्योजकांनी पैसा पुरवल्याची कल्पना केंद्रातील प्रमुख नेत्यांना आहे तर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयच्या माध्यमातून कारवाई का करत नाही असा सवाल विचारला आहे.

निराश-हताश मानसिकतेची लक्षणे

“नरेंद्र मोदी हे 4 जूननंतर पंतप्रधान नसतील. ते झोला घेऊन हिमालयात जातील, की त्यांनी व अमित शहा मिळून जी ‘कांडे’ देशात केली त्याबद्दल त्यांना न्यायालये, चौकशी आयोगासमोर खेटे मारावे लागतील ते सांगता येत नाही; पण मोदी जाता जाता जी भाषणे आणि वक्तव्ये करीत आहेत ती त्यांच्या निराश-हताश मानसिकतेची लक्षणे आहेत. मोदी यांनी स्वतःला प्रचारात गुंतवण्यापेक्षा त्वरित वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे आहे,” असा टोला ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे. “तेलंगणातील एका प्रचार सभेत मोदी यांनी त्यांच्या प्रिय अंबानी-अदानींचा उल्लेख केला,” असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मूठभर उद्योगपतींची भरभराट

‘‘अंबानी-अदानीने काँग्रेसला पोते भरून काळा पैसा पाठवलाय व आता काँगेसचे शहजादे अंबानी-अदानीचे नाव घेत नाहीत.’’ यावर राहुल गांधी यांनी त्यांच्या पद्धतीने मार्मिक उत्तर मोदींना दिले. गांधी म्हणतात, ‘‘एरवी बंद खोल्यांत अंबानी-अदानी करता. आज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलत आहात. मोदीजी, आपण घाबरलात की काय?’’ गांधी म्हणतात ते खरेच आहे. मोदींची सध्याची भाषणे व भूमिका त्यांचे पाय लटपटले असल्याचे लक्षण आहे. मोदी यांच्या काळात मूठभर उद्योगपतींची भरभराट झाली. त्यात त्यांचे मित्र अदानी यांचे नाव आघाडीवर आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे; नवी नियमावली जाहीर | Maharashtra Government cancels Guidelines over Holi Celebration sgy 87

उलट्या बोंबा मारून स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी जगजाहीर केली

“भाजप हा सामान्य जनतेची सुख-दुःखे समजून घेणारा पक्ष कधीच नव्हता. शेठजींचा पक्ष असेच त्या पक्षाविषयी म्हटले गेले. म्हणूनच महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत शेतकरी आत्महत्या करीत आहेत, पण त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज माफ न करता मोदी यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांची 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली. मोदी काळात सगळ्यात मोठे लाभार्थी हे अदानी आहेत. भाजपा अदानी उद्योगसमूहात गुंतवणूक करीत आहे की अदानीसारखे उद्योगपती भाजपात गुंतवणूक करीत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. पण भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, पण मोदी हे आता उलट्या बोंबा मारून स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी जगजाहीर करीत आहेत,” असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

वागणे देशाच्या महान परंपरेच्या विरुद्ध

“मोदी ज्या उद्योगपतींना, कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे मदत करीत होते, त्या प्रत्येकाने भाजपला निवडणूक रोखे माध्यमातून शेकडो कोटींचा निधी दिला. कोरोना काळात लस बनविणाऱ्या कंपन्यांकडून मोदी यांनी ‘धनलाभ’ करून घेतला व या लसींमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. म्हणजे मोदी यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले. त्याच लोण्याच्या जिभा चाटत मोदी आता काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. हा त्यांचा नेहमीचा शहाजोगपणा झाला. मोदी हे रामाच्या नावावर मते मागत आहेत व गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडूनही निवडणूक लढविण्यासाठी कोट्यवधींचा मलिदा स्वीकारीत आहेत. गोमातेच्या या तथाकथित भगतांनी अशा प्रकारे हिंदुत्वाचे ढोंग रचले आहे. निवडणुकीच्या आधी मोदी यांच्या तपास यंत्रणांनी काँग्रेसवर 1800 कोटींच्या ‘कर’ वसुलीची नोटीस बजावली व काँग्रेसची बँक खाती गोठवून कोंडी केली. ही हुकूमशाहीच झाली. हातात सत्ता आहे म्हणून अशा पद्धतीने मनमानी करायची व लोकशाहीचा गळा घोटायचा हे मोदींचे वागणे देशाच्या महान परंपरेच्या विरुद्ध आहे,” अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा :  ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट

या मूर्खपणाची नोंद जगाच्या इतिहासात नक्कीच होईल

“मोदी यांनी सर्व उद्योग गुजरातला पळवले व त्या बदल्यात भाजपला आर्थिक लाभ मिळवून दिले. मोदी यांचे साम्राज्य काळ्या पैशांच्या खांबावर उभे आहे व त्या खांबावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ले केल्याने मोदी यांची घाबरगुंडी उडाली. मोदी हे हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत व त्यामुळेच ते घाबरले आहेत. चार गाढवे एकत्र चरत असली तरी हुकूमशहा घाबरतो. चार गाढवे एकत्र येऊन आपली सत्ता उलथवून टाकण्याचे कारस्थान रचत आहेत असा संशय त्यास येतो व त्या चार गाढवांच्या विरोधात कारवाईचे फर्मान काढतो. आपल्या देशात सध्या हेच चालले आहे. मोदी हे बेफाम आणि बेताल वक्तव्ये करून पंतप्रधानपदाचे हसे करून घेत आहेत. मोदी यांनी देश भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या नावाखाली देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात घेतले. या मूर्खपणाची नोंद जगाच्या इतिहासात नक्कीच होईल व जे लोक त्यांच्या गोठ्यात यायला तयार नाहीत त्यांना ईडी वगैरेच्या माध्यमातून तुरुंगात टाकले,” अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

दोन्ही उद्योगपतींवर कारवाई करायला हरकत नाही

“अंबानी-अदानी वगैरे उद्योगपती काँग्रेसला टेम्पो भरभरून काळा पैसा देत आहेत व त्याच पैशांवर राहुल गांधी निवडणुका लढत आहेत, असे मोदी सांगत आहेत. ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे काळ्या पैशांचे हे असे ‘मनी लाँडरिंग’ करणाऱ्या या उद्योगपतींना ‘पीएमएलए’ कायद्यानुसार लगेच अटक करून तुरुंगात टाकायला हवे, पण मोदी असे काहीच करत नाहीत. ते मनाने कमजोर आहेत व छप्पन्न इंच छाती असल्याचा आव आणत आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी ‘मनी लाँडरिंग’चा कायदा आहे व त्याच कायद्याचा सोटा चालवून मोदी-शहांनी आपल्या विरोधकांना छळले, पक्ष फोडले. आता मोदी यांनी अदानी-अंबानींचा काळा पैसा काँग्रेसकडे जात असल्याचे सांगून टाकले. हे पंतप्रधानांचे स्टेटमेंट आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयने याच स्टेटमेंटच्या आधारे दोन्ही उद्योगपतींवर कारवाई करायला हरकत नाही,” असं ठाकरे गटाने म्हटलंय.

हेही वाचा :  शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या का नाही?

मोदींना योग्य उपचारांची

“पीएमएलए कायदा तेच सांगतो. मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला केला, पण मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारून स्वतःलाच संकटात टाकले. मोदी ब्रॅण्डचे हे अधःपतन व घसरण आहे. मोदी-अदानी यांचे संबंध जगजाहीर आहेत. मोदी यांचे वक्तव्य पाहून त्यांच्या या उद्योगपती मित्रांनाही वाटले असेल, मूर्ख मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू बरा. मोदी यांचे वक्तव्य गंभीर आहे. अखेर राहुल गांधी यांनी मोदी यांना गुडघ्यावर आणले. काळ्या पैशांचा स्रोत नक्की कोठे आहे, याचा खुलासा करण्यास भाग पाडले. झोला घेऊन हिमालयात जाण्याची वेळ आणि मुहूर्त मोदींनी मुक्रर केला हे स्पष्ट झाले. मोदी यांची प्रकृती बरी नाही. त्यांना योग्य उपचारांची गरज आहे. मोदींनी वेळीच विश्रांती घेतली नाही तर भाजप 100 आकडाही पार करणार नाही. मोदी ब्रॅण्ड पूर्णपणे संपला आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; ग्राहकांनो आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचा भाव

Gold Price Today 26th June: आज बुधवारीदेखील सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. सोनं-चांदीच्या …

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …