शिवजयंती उत्साहात

शिवजयंती उत्साहात



शिवजयंती उत्साहात

औरंगाबाद : जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष, कडाडणारे पोवाडे, ढोल-ताशांचा गजर आणि रक्तदान, लसीकरण, आरोग्य तपासणीच्या शिबिरांचे आयोजन करत मराठवाडय़ात सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात आली. औरंगाबादेत क्रांती चौकातील अश्वारुढ पुतळा नव्याने उंची वाढवून उभा केल्यानंतर त्याचे लोकार्पण मध्यरात्री पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी शिवसेनेसह भाजपचे नेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर, शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी शिवप्रेमींचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. क्रांती चौकात महाराजांच्या पुतळय़ासह औरंगाबादचा तरुण अभियंता आकाश बारोटे याने आरती मेकॅनिझम या संकल्पनेतून तयार केलेले एक स्वयंचलित यंत्र लक्षवेधक होते.

जालना शहर आणि जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरातील महाराजांच्या पुतळय़ास पालकमंत्री राजेश टोपे यांनी पुष्पहार अर्पण केला. शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचालित सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुभाष देवीदान, कार्याध्यक्ष रवींद्र राऊत, सचिव सतीश जाधव, जालना र्मचट बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत यांची उपस्थिती या वेळी होती. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या उपस्थितीत भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मंठा येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी आमदार अरिवदराव चव्हाण यांनीही अभिवादन केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.

हेही वाचा :  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

लातूरमध्येही शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. निलंगा येथे अक्का फाऊंडेशनतर्फे साकारण्यात आलेल्या ११ हजार चौरस फुटाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण माजी खासदार रूपा पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. मंगेश निपाणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे ४५० लिटर तैलरंगाचा वापर करून हे भव्य चित्र साकारले आहे. कार्यक्रमास राज्याचे माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरिवद पाटील-निलंगेकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारत बाई साळुंके, सभापती गोिवद चिंलकूरे, निलंगा पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिराजदार उपस्थित होते. शनिवारी रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. यासाठी एक घर एक रक्तदाता संकल्पना राबविण्यात आली. भाजपाचे प्रदेश सचिव युवानेते अरिवद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून गेल्या पाच वर्षांत शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी, शिवरायांची हरित प्रतिमा, बारा बलुतेदारांच्या हस्ते शिवरायांना अभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंगोली – हिंगोलीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन पार पडले. हा पूजाविधी वंदनाताई आखरे यांनी केला. जयंतीनिमित्त कोविड लसीकरण, रक्तदान शिबिरासारखे विविध समाजोपयोगी उपक्रमही घेण्यात आले. कार्यक्रमांना शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पप्पू चव्हाण, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, सचिव डॉ. सतीश शिंदे, यासह मुख्य मार्गदर्शक शिवाजी ढोकर पाटील, मनोज आखरे, सुनील पाटील गोरेगावकर आदींची उपस्थिती होती. याशिवाय इतर कार्यक्रम आमदार तानाजी मुटकुळे, दिलीप चव्हाण, आमदार संतोष बांगर, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, शिवाजीराव माने, गजानन घुगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा :  विद्यापीठ परिक्षेत गोंधळ; एमए इंग्रजी विषयाचा पेपर बदलला, परिक्षार्थींची तारांबळ

बीडमध्येही उत्साह

बीड – जिल्हाभरात उत्साहात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी झाली. शहरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळय़ास आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी अभिवादन केले. परळीमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून अभिवादन केले गेले. गेवराईत विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून साकारलेली पंधरा हजार चौरस फुटावरील शिवप्रतिमा मुख्य आकर्षण ठरली. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून महाआरती करण्यात आली.

The post शिवजयंती उत्साहात appeared first on Loksatta.

Source link