औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून होणारी हवाई वाहतूक वाढावी यासाठी दोन कंपन्यांबरोबर सध्या बोलणी सुरू असून आकाश एअरलाइन्स व गुवाहाटीमधील अन्य एका कंपनीबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी दोन विमाने औरंगाबाद येथेच ठेवून वेगवेगळय़ा शहरात सेवा उपलब्ध होईल काय, याची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
औरंगाबाद विमानतळाचे भाडे तुलनेने कमी असून औरंगाबाद हे विमानांचे तळ व्हावे, अशी रचना केली जात आहे. आकाश एअरलाइन्सच्या आकाश झुनझुनवाला यांच्याशी नुकतीच चर्चा झाली असून गुवाहाटीतील अन्य एका कंपनीबरोबर बोलणी चालू असन हवाई वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे डॉ. कराड म्हणाले. रस्ते, हवाई वाहतूक यांसह वेगवेगळय़ा विकास योजनांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ‘जॅकेवेल’ची कामे करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागावयाच्या परवानगीचा अर्ज अद्याप महापालिकेने केलेला नाही. तो त्यांनी तातडीने करावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या असून केवळ पाण्याच्या टाक्या बांधून उपयोगाचे नाही तर जायकवाडीपासून पाणी आणण्यासाठीची प्रक्रिया आधी हाती घ्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. आता टाक्यांचे काम सुरू आहे. खरेतर जलशुद्धिकरणाच्या कामाला प्राधान्य द्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. या योजनेला निधीची कमतरता भासणार नाही. अमृत-२ मधून निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.
आणखी एका केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव
शहरात सध्या एक केंद्रीय विद्यालय आहे. त्यात सर्वसामान्य माणसांच्या मुलांना प्रवेश देणे अवघड होऊन जाते, त्यामुळे आणखी एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा मानस असून त्यासाठी वाळूजमध्ये पाच एकर जागाही ठरविण्यात आली आहे.
गॅस लाईनचे भूमिपूजन पुढील महिन्यात
सीएनजी गॅस उपलब्ध होण्यासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते २ मार्च रोजी ठरविण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मराठवाडय़ासह बँकांचे जाळे वाढावे म्हणून राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक २८ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे.
खुलताबाद येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र
मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सोय मिळावी म्हणून खुलताबादेत दहा एकर जागेची मागणी केलेली होती. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी या अनुषंगाने चर्चा झाली असून जागा उपलब्ध होताच १५ कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून हे काम केले जाणार आहे.
देवगिरीच्या किल्ल्यात ध्वनी-प्रकाशाची सुविधा
देवगिरी येथे ‘साऊंड अॅण्ड लाइट’ कार्यक्रमासाठी इंडियन ऑइलकडून २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ३१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक करण्यात आले होते. घृष्णेश्वर मंदिर, अहिल्यादेवींचा कुंड, शहाजीराजे गढी, सोनेरी महल, बीबी का मकबरा या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीही निधी मागण्यात आला असून तो दिला जाईल, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.
लासूरचा हुरडा आणि नाशिकचा चिवडा
अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी आयोजित कार्यक्रमात एक जिल्हा-एक उत्पादन या योजनेची माहिती देताना डॉ. कराड यांनी सोपे उदाहरण सांगितले. ४०० नवीन रेल्वेगाडय़ा सुरू करायच्या असून अनेक उत्पादनांना लवकरात लवकर पोहोचवता यावे म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. आता लासूरच्या भोवताली हुरडा आहे तर नाशिकचा चिवडाही प्रसिद्ध आहे, असेही डॉ. कराड बोलता बोलता म्हणून गेले.
The post हवाई वाहतूक सक्षम करण्यासाठी दोन विमान कंपन्यांशी चर्चा appeared first on Loksatta.