चीनला तोंड देण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे चुकीचे! ; आशियाई देशांशी आण्विक सहकार्य आवश्यक- संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांचे मत

चीनला तोंड देण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे चुकीचे! ; आशियाई देशांशी आण्विक सहकार्य आवश्यक- संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांचे मत



चीनला तोंड देण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे चुकीचे! ; आशियाई देशांशी आण्विक सहकार्य आवश्यक- संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांचे मत

मुंबई : चीन कधीच भारताला बरोबरीने- सन्मानाने वागवणार नाही हे लक्षात घेऊन चीनच्या भूराजकीय आव्हानाला तोंड देण्यासाठी धोरण आखण्याची गरज असून त्यासाठी अमेरिकेवर अवलंबून चालणार नाही. तर तैवान, व्हिएतनाम, फिलिपाइन्ससारख्या देशांना अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी मदत करून चीनच्या अवतीभवती एक वेढा तयार केला तरच चीनच्या विस्तारवादाला तोंड देता येईल, असे परखड मत संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांनी बुधवारी व्यक्त केले.

माजी कॅबिनेट सचिव बी. जी. देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘एशियाटिक सोसायटी’तर्फे ‘भारताचे भूराजकारण अधिक समर्थ करण्याचे मार्ग’ या विषयावर संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ व नवी दिल्लीतील नॅशनल सेक्युरिटीज स्टडीज सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च मानद प्राध्यापक भरत कार्नाड यांचे व्याख्यान झाले. माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्ष मीनल क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही हे धोरणही भारताने बदलले पाहिजे. देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणुहल्ला करण्याची तयारी ठेवावी, असे मतही कर्नाड यांनी व्यक्त केले.   पुढच्या काही वर्षांत अमेरिका व चीननंतर भारत हा जगातील तिसरी आर्थिक ताकद असेल अशी चिन्हे आहेत. मात्र त्याच वेळी चीनच्या विस्तारवादाचे आव्हान आपल्यापुढे उभे ठाकले आहे. आधी डोकलाम व नंतर लडाख व अरुणाचलच्या माध्यमातून भारतासमोर सतत संकटे उभी करणे हेच चीनचे धोरण आहे. आपल्यासमोर गुडघे टेकणारा भारत चीनला हवा आहे. चीनच्या या विस्तारवादाला तोंड देण्यासाठी भारताने अमेरिकेच्या आधारे धोरण आखले आहे. पण अमेरिका कधीही वैयक्तिक स्वार्थ सोडून कोणालाही मदत करत नाही. युक्रेन हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे संकटात आपल्यासोबत उभा राहील, असा विश्वास अमेरिकेवर ठेवता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती कार्नाड यांनी केली.

हेही वाचा :  मराठीचा अभिजात दर्जा गुजरातीने रोखला?; दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार

चीनच्या या विस्तारवादाचा त्रास केवळ भारताला नव्हे तर दक्षिण आशियाई व दक्षिण कोरिया व जपानसारख्या उत्तर आशियाई देशांनाही होत आहे. भारताचे भूराजकीय स्थान व साधनसंपत्ती, तंत्रज्ञानातील बळ, अण्वस्त्र सज्जता याचा वापर भारताने चीनविरोधात करायला हवा. चीनने पाकिस्तानला अण्वस्त्र सज्ज करून भारतासमोर एक संकट उभे केले त्याच धर्तीवर भारतानेही तैवान, व्हिएतनाम, फिलिपाइन्ससारख्या देशांना अण्वस्त्र सज्ज होण्यास मदत करावी. त्यात  गैर नाही. राजकीय वास्तव लक्षात घेऊन देशहित सर्वोच्च हेच धोरण असावे. दक्षिण कोरिया व जपानशीही सहकार्य वाढवावे. इंडोनेशियासह शक्य त्या देशांत ठिकाणी लष्करी व नौदलाचे तळ उभे करावेत. चीनच्या अवतीभवती अशा अण्वस्त्र सज्ज मित्रराष्ट्रांचा वेढा तयार करून, आपले संरक्षण तळ तयार केले तरच आपल्या आक्रमकतेला होणारा प्रतिकार व त्यातून होणारे संभाव्य नुकसान याची भीती चीनच्या मनात निर्माण करून त्याच्या विस्तारवादाला आणि अरेरावीला नियंत्रणात ठेवता येईल, असे कार्नाड यांनी स्पष्ट केले. भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना अण्वस्त्र सज्ज देशांची साखळीच आशियात स्थैर्य कायम ठेवू शकते, असा सल्ला दिला होता याची आठवणही कार्नाड यांनी करून दिली.

हेही वाचा :  Uddhav Thackeray By Election: गिरीश बापट यांच्या नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून...; उद्धव ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य

युक्रेन-रशिया वादात भारताने कोणाची तरी बाजू घेण्याचे काहीच कारण नाही, असे मत मेनन यांनी व्यक्त केले.

हिंदू-मुस्लीम संघर्ष टाळा

चीन हाच भारतासमोरील खरा धोका असून भारताच्या तुलनेत पाकिस्तान हे खूपच कमकुवत राष्ट्र असल्याने संरक्षणाच्या बाबतीत पाकिस्तान केंद्रीत असण्याची काहीच गरज नाही. पाकिस्तान हा धोका नाही हे लक्षात घेऊन उगाच त्याच्या नावाचे भूत उभे करू नये. तसेच देशातील हिंदूू-मुस्लीम तणाव वाढेल असे काही होऊ नये. पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर भारताची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या कोणत्याही भागावर अणुहल्ला करण्यास समर्थ आहेत, असा मुद्दाही भरत कार्नाड यांनी मांडला.

The post चीनला तोंड देण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे चुकीचे! ; आशियाई देशांशी आण्विक सहकार्य आवश्यक- संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांचे मत appeared first on Loksatta.

Source link