घराचे बदलते स्वरूप

घराचे बदलते स्वरूप



घराचे बदलते स्वरूप

सुचित्रा साठे

घर.. एकमेकांचे असलेल्या, आपुलकीने किंवा रक्ताच्या नात्यांनी गुंतलेल्या, ओढीने जवळ येणाऱ्या माणसांचे हक्काचे, माझेपणाने मिरवणारे स्थान. भिंतींनी लक्ष्मणरेषा आखून एकमेकांबद्दलच्या भावनांनी, विचारांनी साकार होणारे जग त्या सर्वाना कमी-अधिक खोली असतेच. त्यामुळेच जणू घराची ‘खोली’ होते. खोलीच्या रूपात मोजपट्टीने ते साकार होते. एकच खोली जरी असली तरी ते ‘घर’ असते. तिथे घरपण असते.

घरात माणसं राहणार म्हणजे सगळे व्यवहार होणारच. खाणं, पिणं, झोपणं, उठणं-बसणं, काम करणं हे होतच राहातं. आवश्यक गोष्टींसाठी सहज जागा निश्चित होतात. त्या खोलीचा एक कोपरा स्वच्छतागृहाचं काम करतो. थोडी स्वच्छता आत, थोडी घराबाहेर. दुसरा कोपरा पोटपूजेची व्यवस्था करण्याचं मनावर घेतो. स्टोव्ह किंवा गॅसची शेगडी कायमस्वरूपी  जागा पटकावते. भांडीकुं डी दाटीवाटीने, पण कौतुकाने हजेरी लावतात, बिलगून बसतात. बाकी सामान हवं तेव्हा हवं तसं हातपाय पसरते. गरज नसेल तेव्हा कमीत कमी जागेत अंग चोरून बसते. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत आसमंतात जसे रोज तेच बदल होत असतात, तसेच त्या एका खोलीच्या घरांत किंवा घराच्या एका खोलीत बदल होत राहतात, सगळ्यांच्या नजरेसमोरच सगळं घडत राहतं. कुठेही आडपडदा राहत नाही. गॅसजवळ कोंडाळं करून आपुलकीने चहा पिताना तिथे मंगलप्रभात होते. पोटात कावळे ओरडायला लागले की ते भोजनगृह होते. शाळा-कॉलेजात जाणाऱ्यांसाठी ती अधूनमधून अभ्यासिका होते. वयोवृद्ध, ज्येष्ठांसाठी विश्रांतीस्थान होते. तिन्ही सांजा झाल्या की सगळे घरी परततात आणि खोलीला कुटुंबकट्टय़ाचे स्वरूप येते. रात्री ते बामणघर होते. कोणी दिवा लावून अभ्यास करत असलं तरी बाकीच्यांवर निद्रादेवीची संक्रांत येत नाही. काहीतरी कमी असल्याची  जाणीव नसते. उलट आनंदाचं अस्तरच लावल्यासारखं वाटत राहतं. बदल किंवा सुधारणा होतच असतात. त्यातूनच एका खोलीचे आधी पार्टिशनने, मग भिंतीने दोन भाग झाले. त्यामुळे दोन खोल्यांतील एकीला स्वयंपाकघर म्हणून स्वतंत्र अस्तित्व मिळाले. दुसरी खोली ऊठबस करण्यासाठी वापरली जाऊ लागली. झोपण्यासाठी मात्र माणसांच्या संख्येनुसार दोन्ही खोल्यांचा वापर होऊ लागला. संख्या मर्यादित असेल तर बाहेरच्या खोलीत झोपण्यालाच प्राधान्य मिळू लागले. जेवणं स्वयंपाकघरातच होऊ लागली. सणवार, पाहुणेरावळे आले तरच बाहेर पानं मांडली जाऊ लागली. कोणी तिऱ्हाईत कामासाठी बाहेरच्या खोलीत जेवायच्या वेळेला येऊन बसले आणि एखाद्याला जेवायचे असेल तर स्वयंपाकघरात जेवणं शक्य होऊ लागले. घराच्या आसमंताची दोन खोल्यांतील विभागणी सोयीस्कर वाटू लागली.

हेही वाचा :  केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करण्यापेक्षा…; जयंत पाटलांचा मोदी सरकारला सल्ला

घराचा विस्तार आणखीन झाला. दोनाच्या तीन खोल्या झाल्या. झोपण्याची खोली हे लेबल त्या खोलीला लागले. स्वयंपाकघरात झोपण्याची कल्पना बाद झाली. तो विचार मनातही येईना. झोपण्यासाठी अनुकूल अशी तजवीज केली गेली. डबलबेडने आपला बाडबिस्तरा पसरून टाकला. खोली भरून गेली. स्वयंपाकघराप्रमाणेच झोपण्याला स्वतंत्र अस्तित्व लाभले. लवकर उठण्यावरचे बंधन सैल पडले. एकच खोली असताना ठरावीक वेळ झाली की सगळ्यांना उठावेच लागे. लहान बाळांना किंवा आजारी माणसांनाच हवं तितकं झोपून राहता येत असे. आता तो प्रश्न निकालात लागला. पाहुण्यांची झोपण्याची व्यवस्था बैठकीच्या खोलीत होऊ लागली. घरातले-बाहेरचे यामध्ये तुटक रेषा आखली जाऊ लागली. असं असलं तरी प्रात:विधीसाठी बाहेरचीच वाट धरावी लागत असे. रात्री वार्ता ‘बाहेर’ जाणं त्रासाचे, गैरसोयीचे वाटू लागले. मग ती गोष्ट घरातच उरकता येऊ लागली तर….आणि बीएचके संस्कृतीचा जन्म झाला. सोय झाली. नंबर लावणं, पाणी घेऊन जाणं, सगळं टळलं. मग घरातल्या कुठल्या तरी खोलीला स्वच्छतागृह चिकटली. बहुतेक ठिकाणी मध्यवर्ती स्थान त्यांना देण्यात येऊ लागलं. बाहेरून घरात त्यांनी मुसंडीच मारली म्हणाना! त्यामुळे एका खोलीच्या घराचं तीन खोल्यांच्या ‘स्वयंपूर्ण’ घरात रूपांतर झाले.

हेही वाचा :  BLOG: उद्धवदादा, पुरे झालं! आता तरी ऐका आमची व्यथा…

एका झोपण्याच्या खोलीने गरज भागेना, हळूच दुसरीही झोपण्याची खोली आली. पश्चिमेचे वारे आले आणि मुलांनाही स्वतंत्र झोपण्याची खोली हवीशी वाटू लागली. तिथे मुलं म्हणतील ती पूर्वदिशा ठरू लागली. त्या खोलीत तिसरे कोणी येण्याची कल्पनाही सहन होईनाशी झाली. थोडं सिंहावलोकन केलं तर लक्षात येईल की पूर्वी पाहुणा किती सहजतेने सामावून घेतला जायचा. कसं, कुठे झोपायचं हा विचारसुद्धा मनात डोकवायचा नाही. आता झोपण्याच्या खोल्यांची दारं घट्ट बंद होतात. त्यामुळे २ बीएचकेचे रूपांतर २.५ बीएचकेत होऊ लागले. पाहुण्यांच्या सोयीचाही वास्तुरचनेने विचार केला.

पूर्वी लग्नकार्य असेल तर दाटीवाटीने मौजमस्ती, चेष्टामस्करी करत ‘रात्र जागवावी असे आज वाटे’ हा विचार ऐरणीवर असायचा. उपलब्ध जागेतच  सगळे कलंडायचे, डब्यात धान्य भरताना कसे डबा हलवत भरतो तसे. आता लग्न घर निवांत असते. पाहुण्यांची सोय एखाद्या रिकाम्या ब्लॉकमध्ये किंवा हॉटेलमध्ये केली जाते. वास्तु‘रचना’ अशी कालानुरूप बदलत असते. तो बदल सामाजिक परिस्थितीनुसार अपरिहार्य असतो. अपेक्षित असतो. घराचं रूप असं विकसित संक्रमित होत असतं. असं असलं तरी घरातील सुख, समाधान किंवा घराचं घरपण हे आकारमानावर अवलंबून असतं, असं नाही. म्हणून कधी कधी चंद्रमौळी झोपडीत जे सुख आनंद लाभतो, तो वातानुकूलित अद्ययावत सुसज्ज घरात मऊ मऊ गाद्यागिरद्यांवर लोळूनही मिळत नाही. घराच्या स्थूल, दर्शनी रूपापेक्षा त्याचं सूक्ष्म रूप म्हणजेच घरपण वेगळंही असू शकतं. जसा एखादा तापट, फणसासारखा वाटणारा माणूस मनाने कोमल, प्रेमळ असू शकतो. बर्फ हाताला गार लागतो पण त्याचा उपयोग ‘शेक’ देण्याकरता केला जातो. बारूपापेक्षा गुण वेगळे असू शकतात. ‘काय भुललासी वरलिया रंगा’ असं होऊ नये म्हणून घराचं अंतरंग त्याचा ‘वास्तव’ रंग  जपणं, जाणणं हेही महत्त्वाचं असतं. तरच ते घर प्रत्येकाच्या मनात ‘घर’ करतं.

हेही वाचा :  मुद्रांक शुल्कवाढीचा घरांच्या किमतीवर परिणाम

The post घराचे बदलते स्वरूप appeared first on Loksatta.

Source link