माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चुना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक

माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चुना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक


नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती. 

तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर ऋषभ पंतचाही समावेश आहे. त्याने 2020-21 मध्ये त्याला 1 कोटी 63 लाखांचा गंडा घातला होता. 

मृणांक सिंगने हॉटेल, बार, रेस्तराँ, तरुण मुली, कॅब चालक आणि खाण्याच्या छोट्या दुकानांसहित अनेकांची फसवणूक केली आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता, त्याच्यात अनेक महिलांचे व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. यामधील काही आक्षेपार्ह आहेत. 

पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची कोठडी ठोठावण्यात  आली आहे. प्रकरणाचा पुढे तपास केला जात असून, मोबाईलचीही चाचपणी सुरु आहे. याप्रकरणी अजून पीडित समोर येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :  kitchen Tips: खबरदारी घेतली तरी डाळ, तांदळाला किडे लागतात? मग 'या' टिप्स फॉलो करा!

मृणांक सिंग 22 ऑगस्ट 2022 रोजी ताज पॅलेस हॉटेलमध्ये राहिला होता. यावेळी 5 लाख 53 हजार 362 रुपयांचं बिल न भरताच तो निघून गेला होता. पैसे भरण्यास सांगितले असता त्याने एडिडास कंपनी भरेल असं सांगितलं होतं. पण त्यानंतरही पैसे देण्यात आले नाहीत, आणि फोन केला असता तो टाळाटाळ करु लागला होता. दरम्यान त्याच्या वडिलांनी संपत्तीतून त्याला बेदखल केलं असल्याची माहिती दिली. 

आरोपीने नातेवाईकांना आपण दुबईत स्थायिक झाल्याचं सांगितलं होतं. तो नेहमी आपला फोन स्विच ऑफ ठेवत असे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. तसंच देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. 25 डिसेंबरला आरोपीला विमानतळावरुन अटक करण्यात आली. तो हाँगकाँगला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच ताब्यात घेत पोलिसांकडे सोपवण्यात आलं.  



Source link