साम्ययोग : शक्तींचा आधार

साम्ययोग : शक्तींचा आधार



साम्ययोग : शक्तींचा आधार

अतुल सुलाखे [email protected]

सप्तशक्ती या सात प्रवचनांचा आरंभ विनोबा एका निरीक्षणाने करतात. त्यांच्या मते, गीतेचा दहावा अध्याय ही काही नेटकी बाग नाही. ते एक जंगल आहे. परंतु या सप्तशक्तींच्या क्रमामध्ये एक व्यवस्था आहे. या सात शक्ती, कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा धृती आणि क्षमा, अशा आहेत. त्यांच्या रूपाने मी स्त्रियांमध्ये वसतो, असे भगवान म्हणतात. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की नारी म्हणजे केवळ स्त्री नव्हे. संपूर्ण समाजाची शक्ती म्हणजे नारी शक्ती. स्त्रियांमध्ये या शक्तींना धारण करण्याची विशेष क्षमता आहे.

पहिली शक्ती कीर्ती. कृती आणि कीर्ती, असे नाते विनोबांनी पाहिले आहे. माणूस एखादी कृती करतो. तिचे फळही त्याला मिळते. इथे कृतीचे प्रयोजन संपते. ही कृती चांगली असेल तर तिचे महत्त्व पिढय़ांपर्यंत पोचते. सत्कृतीचे भविष्यातही टिकून राहणारे स्मरण म्हणजे ‘कीर्ती’. फळ मिळाल्यावरही ही गोष्ट राहते. सर्वत्र पसरते म्हणून तिला शक्ती म्हटले आहे.

कृतीची ही कीर्ती सातत्याने पुढे जात राहिली की त्यातून परंपरा निर्माण होते. या क्रमात संस्कृती निर्माण होते. खरे तर सत्कृतीची जबाबदारी अखिल मानव समाजाची आहे तरीही स्त्रियांचे विशेष लक्षात घेऊन, गीतेने तिचे नाते स्त्रियांशी जोडले आहे.

हेही वाचा :  विधानपरिषदेच्या जागांवरुन मविआत बिघाड? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

दुसरी शक्ती ‘श्री’. विनोबांनी तिचे तीन अर्थ सांगितले आहेत. कांती, शोभा आणि लक्ष्मी. श्री हा शब्द प्राचीन आहे आणि पवित्रही. म्हणून आपण ईश्वर, विभूती आणि साधु-संतांच्या, मागे-पुढे श्री वापरतो. उदा. श्रीराम आणि राजश्री. कांती या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. ऋग्वेदात अग्नीचे वर्णन, त्याची श्री, म्हणजे कांती, दर्शनीय आहे असे आले आहे.

हा अग्नी प्रत्येक घरातला अतिथी आहे. तो अन्न शिजवण्यात आणि अतिथीचा सत्कार करण्यात मदत करतो. विनोबांनी इथे अग्नीचे वर्णन करणारे ऋग्वेदातील दोन संदर्भ दिले आहेत. ‘स दर्शतश्री:’ आणि ‘अतिथिर् गृहे गृहे.’ या वर्णनाला त्यांनी, अग्नी, पाकसिद्धी, उत्पादनवाढ, त्यासाठी शरीरपरिश्रम आणि अंतिमत: लक्ष्मीची उपासना असा व्यापक संदर्भ दिला आहे. जिथे शरीरपरिश्रम नाही तिथे कांती, शोभा आणि लक्ष्मी नसणारच. त्यांची ही मांडणी डोळे उघडणारी आहे.

त्याच वेळी या देशात शोभा नावाची गोष्ट नाही हेही विनोबा बजावतात. कारण जिथे इतकी विषमता आहे तिथे शोभा कशी असेल? ‘समत्व म्हणजे श्री,’ इतकी ही थेट उकल आहे. आणखी एका ठिकाणी विनोबांनी या शक्तीचे आगळे स्पष्टीकरण केले आहे. ‘श्री’ म्हणजे शोभा आणि ‘अर्श्री’ म्हणजे अशोभा. यातूनच ‘अश्लील’ शब्द आला.

हेही वाचा :  'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

विनोबांनी आपल्या सहकाऱ्यांसह इंदौरमध्ये चित्रपटगृहांबाहेर लावलेल्या अशोभनीय पोस्टर्सविरोधात आंदोलन केले होते. तो प्रश्न त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींपर्यंत नेला होता. त्या पोस्टरमुळे अशोभनीयता प्रतिष्ठित होते म्हणून ते व्यथित झाले होते.

इंदौरमध्ये त्यांनी मैला सफाईचेही काम केले. या कामात मानवता शिल्लक राहिली नाही असे त्यांनी सांगितले. दोन्ही उदाहरणांत निव्वळ अशोभनीयता होती. विनोबांची ही मांडणी अंतर्बाह्य साम्याचा आग्रह राखणारी आहे. कारण विषमता असेल तर शक्तीच काय पण कोणतीही भली गोष्ट उभी राहात नाही.

The post साम्ययोग : शक्तींचा आधार appeared first on Loksatta.

Source link