आनंद पोटात माझ्या माईना! अंतराळात पाऊल ठेवताच सुनीता विलियम्सचा जल्लोष; NASA ने रचला इतिहास

आनंद पोटात माझ्या माईना! अंतराळात पाऊल ठेवताच सुनीता विलियम्सचा जल्लोष; NASA ने रचला इतिहास


Sunita Williams: अमेरिकी अंतराळ संस्था नासाने अंतराळात आणखी एक इतिहास रचला आहे. याचा अमेरिकेइतकाच आनंद भारतीयांना देखील झालाय. कारण या स्पेस मिशन टीममध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आहेत. सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीय. बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (ISS) यशस्वीपणे जोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या जगभरात पाहिला जातोय. 

अंतराळात नासाच्या टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यार यशस्वीपणे मात त्यांनी केली. अखेर सुनीता विल्यम्स यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवले. हा त्यांच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. सुनीता यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आनंदाच्या भरात त्यांनी अंतराळ यानातच उड्या मारायला सुरुवात केली. यानंतर सहकाऱ्यांना  मिठी मारून त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. 

58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी विल्मोर यांच्यासोबत तिसऱ्यांदा अंतराळात प्रवास केला आणि इतिहास रचला गेला. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून ISS मध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या सदस्य म्हणून ओळखल्या जातील. विल्यम्स या चाचणी उड्डाणाचे पायलट आहेत तर 61 वर्षीय विल्मोर हे मिशनचे कमांडर आहेत. 

केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे 26 तासांनी म्हणजेच गुरुवारी दुपारी 1 वाजून 34 मिनिटांनी बोईंग स्टारलाइनर अंतराळ यानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या पाऊल ठेवले. नासाने एका निवेदनात याबद्दलची माहिती दिली आहे.

हेही वाचा :  औरंगजेब, टिपू सुल्तानचं उदात्तीकरण करणाऱ्यांना फडणवीसांचा जाहीर इशारा, म्हणाले "चौकशी झाल्यावर मी स्वत:..."

विल्यम्स यांनी अंतराळात आनंद केला व्यक्त

सुनिता विलियम्स यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र परिवाराचे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. आमचे येथे आणखी एक कुटुंब आहे, जे छान आहे, असे त्या म्हणाल्या.  आम्ही अंतराळात राहून खूप आनंदी आहोत. यापेक्षा चांगले काही मिळत नाही, असेही त्या म्हणाल्या. 

ISS च्या मार्गावर  क्रूने प्रथमच अंतराळात स्टारलाइनर ‘मॅन्युअली’ उड्डाणाच्या चाचण्यांची मालिका पूर्ण केली. दोन स्टारलाइनर अंतराळवीर, सध्या स्थानकावर राहणाऱ्या सात जणांसह मिळून अवकाशात विविध चाचण्या आणि वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.



Source link