बनावट कागदपत्रे तयार करुन प्लॉट विक्री, परभणीच्या बाजार समितीतील धक्कादायक प्रकार

बनावट कागदपत्रे तयार करुन प्लॉट विक्री, परभणीच्या बाजार समितीतील धक्कादायक प्रकार


Parbhani Fake Document Case : बनावट कागदपत्रे तयार करुन नसलेले प्लॉट विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत घडला आहे. जिंतूर बाजार समितीत प्रशासक काळात अनागोंदी कारभार पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अभियंता रोखपालासह 11 प्रशासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2021 -22 मध्ये प्रशासक पदावर असताना अपहार केल्याने 11 संचालकासह अभियंता सचिव आणि रोखपालवर जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 33 लाख 37 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालात सिद्ध

परभणीतील बाजार समितीत अवैध प्लॉट विक्री, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्लॉट शिल्लक नसताना बनावट प्लॉट तयार करुन विक्री करणे, रोड लाईट, बागेचा खर्च, बांधकाम खर्च, गोदामातील भंगार विक्री, प्रवास खर्च यात गैरव्यवहार झाल्याचे बोललं जात आहे. यात तब्बल 33 लाख 37 हजार 466 रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी गठीत केलेल्या समितीच्या चौकशी अहवालात सिद्ध झालं आहे. 

2021 -22 या कालावधीत अशासकीय मुख्य प्रशासक, अशासकीय सदस्यांनी खोटे आणि बनावट बिले, व्हाऊचर तयार करून बाजार समितीच्या निधीचा अपहार केला. यात मुख्य प्रशासक मनोज थिटे, शंकर जाधव, रुपेश चिद्रवार, जगदीश शेंद्रे, प्रकाश शेळके, दिलीप डोईफोडे, दिलीप घनसावध, प्रभाकर चव्हाण, कैलास सांगळे, हनुमंत भालेराव, मोहम्मद आबेद मोहम्मद गफार हे प्रशासक मंडळ दोषी आढळले आहे. तसेच अभियंता बोराडे, सचिव सतीश काळे, रोखपाल मंगेश शिंदे हे दोषी आढळले आहेत.

हेही वाचा :  अधिकाऱ्याने खटका ओढला अन् थेट महिलेच्या डोक्यातून आरपार गेली गोळी; शहारा आणणारं भयानक CCTV

प्लॉटधारकाकडून मोठी रक्कम घेतल्याची तक्रार

प्रशासक मंडळांनी यापूर्वी कायदेशीररित्या वाटप केलेल्या प्लॉट क्रमांक एक ते सातमध्ये फेरफार करुन सर्व्हिस रोड 15 मीटरवरुन 12 मीटरचा करुन सुधारित बनावट लेआउट तयार करीत पणन संचालक पुणे यांची दिशाभूल केली. बाजार समितीच्या सर्व्हिस रोडवर जिंतूर-येलदरी व जिंतूर-वरूड या दोन मुख्य रस्त्याच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ही जागा बाजार समितीची असल्याचं भासवत प्लॉट तयार करून ते वाटप केले. या प्लॉटधारकाकडून मोठ्या रक्कम घेण्यात आल्याचे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. तत्कालीन अशासकीय मंडळातील मुख्य प्रशासक व इतर सदस्यांनी हे दस्तऐवज तयार केले आहेत. 

याप्रकरणी अभियंता बोराडे, तत्कालीन सचिव सतीश काळे, रोखपाल मंगेश शिंदे, इतर व्यक्ती यांच्यासोबत संगनमत करुन विश्वासघात करत बनावट बिले, व्हाऊचर, तसेच प्लॉटसंदर्भात बनावट कागदपत्रे, दस्तऐवज तयार करण्यात आली. तसेच याचा वापर करुन 33 लाख 37 हजार 466 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



Source link