मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोका

मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करु नका; पुणेकर अधिकाऱ्याने सांगितला यामागील धोका


Public Warning Against Sharing Phone Number: खासगी माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्याने एक आवाहन केलं आहे. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी सर्वांनाच आपला मोबाईल क्रमांक हॉटेलमध्ये, शॉपिंग मॉलमध्ये देऊ नका असं आवाहन केलं आहे. ग्राहकांनी अशा ठिकाणी आपले मोबाईल क्रमांक दिलेच पाहिजेत असं कोणतंही बंधन त्यांच्यावर नसतं. आपण अशा ठिकाणी क्रमांक देण्यासाठी नाही म्हणून शकतो हेच अनेकांना ठाऊक नसतं.

…म्हणून दिला इशारा

सोमवारी पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये कोणत्याही व्यक्तीला पूर्व कल्पना दिल्याशिवाय त्याचा किंवा तिचा मोबाईल क्रमांक शेअर करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. तावरे यांनी सध्या सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून फोन नंबर्सचा चुकीचा वापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला आहे. अनेकांचे फोन नंबर हे त्यांच्या बँक खात्यांशी लिंक असतात आणि या फोन नंबर्सच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना बरीच माहिती मिळू शकते. केवळ फोन नंबर्सच्या माध्यमातून एखाद्याचं बँक अकाऊंट रिकामं केलं जाऊ शकतं. 

हेही वाचा :  पैसे असो वा नसो, NPCI ची भन्नाट सुविधा! UPI खातं क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार

3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड

तसेच ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे मोबाईल क्रमांक कोणालाही पुरवत असतील तर अशा अस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार ही कारवाई केली जाऊ शकते ज्यामध्ये 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

नक्की पाहा >> Cyber Attack: मोबाईलमध्ये ‘हे’ चिन्ह दिसलं तर कोणीतरी तुमची स्क्रीन रेकॉर्ड करतंय असं समजा

माहिती सायबर गुन्हेगारांना पुरवली जाते

हल्ली अनेक शॉपिंग मॉल, रेस्तराँ, रिटेल दुकानदार ग्राहकांचे फोन नंबर घेतात. यासाठी वेगवेगली कारणं सांगितली जातात. मात्र यामागे मोठा डेटा बेस तयार करण्याचा छुपा हेतू असतो. मोठ्या संख्येनं गोळा केलेली अशी माहिती बऱ्याचदा मुद्दाम सायबर गुन्हेगारांना पुरवली जाते. या माहितीच्या आधारे हे सायबर गुन्हेगार फसवणूक करुन लोकांना लुबाडतात., असं दिनेश तावरे यांनी म्हटलं आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडूनही वेळोवेळी इशारा

खासगी माहितीसंदर्भात जागृत राहण्याबद्दलचे अनेक मेसेज आणि जनजागृती मोहिमा सरकारकडून तसेच पोलिसांकडून राबवल्या जातात. ग्राहक व्यवहार मंत्रालयानेही अनेकदा अशाप्रकारचे इशारे देताना लोकांना मोबाईल क्रमांक शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे. खासगी दुकानांमध्ये तसेच अस्थापनांमध्ये आपला मोबाईल क्रमांक शेअर करु नये, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयने म्हटलं आहे.

हेही वाचा :  Instagram रील्स पाहण्याचं वेड लागलंय?, या सोप्या टिप्सनं स्क्रीन टाइम करा कमी

 



Source link