भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर


BJP Leader Minor Son Voted Video: लोकसभेच्या तीन टप्प्यांमधील मतदान पूर्ण झालं असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान 13 मे, 20 मे आणि 1 जून रोजी होणार आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक लहान मुलगा ईव्हीएमवरील बटण दाबून मतदान करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील भोपाळमधील बिरासियामधील असल्याची माहिती समोर येत आहे.

कुठे घडला हा प्रकार?

सोशल मीडियावरील दाव्यांनुसार आणि स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीचे पंचायत सदस्य असलेल्या विनय मेहर यांच्या मुलाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. विनय यांच्याबरोबर त्यांच्या मुलगा मतदानासाठी गेला होता. विनय यांनीच हा व्हिडीओ काढल्याचं व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. मंगळवारी म्हणजेच 7 मे रोजी मतदानकेंद्रावर मतदान करताना विनय यांनी आपल्या मुलाला ईव्हीएमवरील बटण दाबायला सांगितलं आणि हा व्हिडीओ काढला असं दिसत आहे. वडिलांच्यावतीने त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केलं.

हेही वाचा :  'उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांना मानसोपचारतज्ज्ञांची गरज'; फडणवीसांची जहरी टीका

व्हिडीओमध्ये काय आहे?

हा 14 सेकंदांचा व्हिडीओ भाजपा नेत्याच्या फेसबुक पेजवर शेअऱ करण्यात आला. मात्र या व्हिडीओछी दखल काँग्रेस नेते कमल नाथ यांच्या प्रसारमाध्यम सल्लागाराने घेतली. त्याने हा व्हिडीओ फ्लॅग केला. या व्हिडीओमध्ये लहान मुलगा आणि त्याचे वडील दोघे मतदानकेंद्रात ईव्हीएमसोर दिसत आहे. हा मुलगा ईव्हीएमवरील कमळासमोरचं बटण दाबताना दिसतो. त्यानंतर कॅमेरा हे मत नोंदवलं गेल्याचं दाखवणाऱ्या व्हीव्हीपॅट मशिनवर फोकस करतो. यानंतर विनय मेहेर हे, “ओके, हे पुरेसं आहे,” असं म्हणता ऐकू येतं.

नक्की पाहा >> Video : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..

हे दोन प्रश्न अनुत्तरित

मतदानकेंद्रामध्ये मोबाईल कसा नेऊ दिला हा पहिला प्रश्न मेहेर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विचारला जात आहे. तसेच मतदान करण्यासाठी गेलेल्या वडिलांबरोबर त्यांच्या अल्पवयीन मुलाला कसं जाऊ दिला हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

लहान मुलांच्या हातातील खेळणं

“या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग काही कारवाई करणार का?” अशा प्रश्न पियूष बाबीली यांनी उपस्थित केला आहे. ते माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे प्रसारमाध्यम सल्लागार आहेत. “भाजपाने निवडणूक आयोगाला लहान मुलांचं खेळणं बनवलं आहे. भोपाळमध्ये भाजपाचे जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केलं. मतदान करताना विनय मेहरही व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ विनय मेहर यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. काही कारवाई होणार का?” असा प्रश्न पियूष बाबीली व्हिडीओ पोस्ट करत उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तपासाचे आदेश

या प्रकरणावर अद्याप निवडणूक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. मात्र जिल्हाधिकारी कुशलेंद्र विक्रम सिंह यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तेथील निवडणूक अधिरारी संदीप सियानी यांना निलंबित करण्यात आलं असून भाजपा नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

इथे कोणाविरुद्ध कोण लढतंय?

हा प्रकार जिथे घडला तो बिरासिया भाग हा एससी उमेदवारासाठी राखीव असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. सध्या या ठिकाणी भाजपाचे विष्णू खट्टर हे आमदार आहेत. तर विद्यमान खासदार प्रज्ञा ठाकूर आहेत. या ठिकाणी भाजपाचे अलोक शर्मा हे उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अरुण श्रीवास्तव निवडणूक लढवत आहेत. 



Source link