‘आई तिच्या पक्षासाठी..’, सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थची पोस्ट; लोक म्हणाले, ‘आजोबांकडे..’

‘आई तिच्या पक्षासाठी..’, सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर पार्थची पोस्ट; लोक म्हणाले, ‘आजोबांकडे..’


Baramati Loksabha Parth Pawar Post For Mother: केवळ महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंनी दीड लाखांहून अधिक मताधिक्याने अजित पवार यांच्या पत्नी तसचे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं. अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा विषय केलेल्या या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना अटीतटीचा संघर्ष करावा लागेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला. सुप्रिया सुळेंनी 1 लाख 58 हजार 333 मतांनी या मतदारसंघातून विजय मिळवत आपली खासदारकी कायम राखली. या मतदारसंघामध्ये वर वर जरी हा सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा असा संघर्ष होता तरी प्रत्यक्ष लढाई ही राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार विरुद्ध त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात होता. या संघर्षामध्ये शरद पवार गटाने बाजी मारली. सुनेत्रा पवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरुन संघर्ष केल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. मात्र या पराभवानंतर आता सुनेत्रा पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा :  '4 जूननंतर मोदी-शहांना अज्ञातवासातच जावे लागेल', राऊतांचं भाकित; म्हणाले, 'ED, CBI..'

निकालावर शरद पवार काय म्हणाले?

बारामतीमध्ये पहिल्या फेरीपासूनच सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. त्यांनी अगदी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखली. खडकवासला वगळता इतर सर्व भागांमध्ये सुप्रिया सुळेंनी आघाडी कायम राखत सहज विजय मिळवला. या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी, “इथे निकाल वेगळा लागला असता तर आश्चर्य वाटलं असतं,” असं मत नोंदवलं. शरद पवारांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवताना आपण बारामतीमधून 60 वर्षांहून अधिक काळापासून लढतोय आणि इथूनच आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्याची आठवण करुन दिली. या पराभवानंतर बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयापासून त्यांच्या बंगल्यासमोरही शुकशुकाट होता. दुसरीकडे सुप्रिया सुळे समर्थकांनी दणकत्यात सेलिब्रेशन केलं. 

नक्की वाचा >> ‘मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..’, ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, ‘400 पारचा नारा..’

पार्थ पवारांची भावनिक पोस्ट

दरम्यान, आपल्या आईच्या पराभवानंतर पार्थ पवार सोशल मीडियावरुन व्यक्त झाले आहेत. ‘मला इतकंच म्हणायचं आहे की माझी आई उत्तम प्रकारे लढली. ती तिच्या पक्षासाठी आणि एनडीएसाठी लढली. ती आम्हा सर्वांसाठी विजेतीच आहे. आम्हा साऱ्यांचं तिच्यावर फार प्रेम आहे,’ असं पार्थ पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना पार्थ पवार यांनी, “तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,” असं म्हणत मतदारांचे आभार मानले आहेत.

आजोबांकडे जाण्याचा सल्ला

पार्थ पवारांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यापैकी एका युझरने तर ‘आजोबांशी बोलून मिटवा’ असा सल्ला दिला आहे. शरद पवारांशिवाय तुमचे वडील काहीच नाहीत. पुन्हा आजोबांकडे जा, ते तुम्हाला माफ करतील. तुमचं करिअरसुद्धा सुधरेल. भाजपाबरोबर तुमचं काहीही भविष्य नाही, असं ब्रिजेश देशमुख नावाच्या व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :  इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

 

मविआला मोठं यश

दरम्यान, राज्याच्या निकालमध्ये महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश मिळवत 31 जागा जिंकल्या असून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 13 जागा जिंकल्या असून ठाकरे गटाने 9 जागा जिंकल्या आहेत. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी सात जागांवर विजय मिळवला आहे. 



Source link