Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?


Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना पदयात्रा.. एवढंच नाही तर बॅनर नाही अन् झेंडेही नाही. अपवाद वगळता पुण्यात निवडणूक असल्यासारखं कुठंच वाटत नाही. लोकशाहीचा महाउत्सव साजरा होत असताना पुणे जणू काही शांत शांत आहे. शहराच्या एखाद दुसऱ्या भागात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग दिसते. मात्र संपूर्ण शहरात म्हणावं तसं वातावरण (Pune Loksabha Prachar) अजून तयार झालेलं नाहीये. पुण्याच्या उमेदवारांना झालंय तरी काय? पुण्यात प्रचार का थंडावलाय? याची काही प्रमुख कारणं आहेतय.

पुण्यात प्रचार का थंडावलाय?

पाच टप्प्यात निवडणूक होत असल्याकारणानं प्रचाराला मिळालेला प्रदीर्घ कालावधी हा उमेदवारांसाठी मिळतोय. तर दुसरीकडे तापमानात झालेली प्रचंड वाढ आणि अंगाची होणारी लाही लाही उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना घराबाहेर पडू देत नाहीये. राजकीय पक्षांनी राजकारणाचा करून ठेवलेला खेळ खंडोबा आणि त्यातून निर्माण झालेलं अविश्वासाचं वातावरण देखील प्रचारासाठी मारक ठरत आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या मुद्द्यांबाबत मतदारांमध्ये असलेला कमालीचा संभ्रम आणि संशय देखील एक प्रमुख कारण आहे. या आणि अशा कारणांमुळे निवडणुकीबाबत एकूणच निरुत्साहाचं वातावरण दिसतंय.

हेही वाचा :  Karnataka Election 2023 : 'द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला...' विजयानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय पक्षांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. नाही म्हणायला पुण्यात झालेल्या पंतप्रधानांच्या सभेला मोठी गर्दी झाली. येत्या तीन तारखेला राहुल गांधींची देखील सभा होणार आहे. तरीही सर्वसामान्य पुणेकर स्वतःला निवडणुकीपासून काहीसा दूरच ठेवून आहे.

निवडणुकीची म्हणावी तशी हवा कुठंच नाही. त्याचा परिणाम प्रचार साहित्याच्या व्यवसायावर देखील झालाय. गल्ली बोळात किंवा रस्त्यांवर निवडणुकीचं वातावरण दिसत नसलं तरी सोशल मीडियावर मात्र वातावरण तापत असल्याचं चित्र आहे. सध्या तरी पुणे तिथे प्रचार उणे अशी स्थिती आहे. मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा विपरीत परिणाम व्हायला नको याची काळजी घेतली जाणं आवश्यक आहे.

पुण्यात तिरंगी लढत

पुण्यात तिरंगी लढत पहायला मिळत आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे लढत आहे. भारत निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 42 पैकी 7 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने पुणे लोकसभेसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रमुख तिन्ही उमेदवारांनी शड्डू ठोकलाय खरा पण पुण्याची निवडणूक खेळीमेळीत होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी तिन्ही उमेदवारांनी एकत्र एक नाष्ट्याचा आनंद घेतला होता. त्यामुळे पुण्यातील लढत म्हणावी तरी अतरंगी होणार नाही. याचा अंदाज पुणेकरांना आला असावा. 

हेही वाचा :  Loksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? 'मुंबईत 6 पैकी 'या' 4 जागा...'



Source link