Uddhav Thackeray On Maharashtra Got No Funds In Budget 2024: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्रामध्ये बिहारमधील नितीशकुमार यांच्या जनता दल युनायडेट आणि आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडूंच्या तेलगू देसम पार्टीच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. इतर राज्यांकडे अर्थसंकल्पामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून होत असतानाच आता उद्धव ठाकरे गटानेही मुंबई तसेच महाराष्ट्राचा साधा उल्लेख ही अर्थसंकल्पात नसल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस
“केंद्रीय सरकारच्या तिजोरीत कराच्या रूपाने सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून छदामही मिळाला नाही. निधी तर सोडाच; पण अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र व मुंबईचा साधा उल्लेखही केला नाही,” असं ठाकरे गटाने ‘सामना’मधून नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे. तसेच राज्यातील शिंदे सरकावरही ठाकरे गटाने बजेटच्या माध्यमातून टोला लगावताना केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस असल्याचा आरोप केला आहे. “‘खोके’शाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणूनही केंद्रीय सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकस व द्वेष भरला आहे, हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
हा महाराष्ट्राचा दोष आहे काय?
“सरकारची कुबडी बनलेल्या आंध्र व बिहार या दोन राज्यांवर सरकारी तिजोरीतून दौलतजादा करणाऱ्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे सर्वात मोठे करदाते राज्य असणे हा महाराष्ट्राचा दोष आहे काय? केवळ राजकारण व सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांत रिकामी करणे, यालाच ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणतात काय?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. “निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला हा ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प खरोखरच संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आहे काय?” असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला आहे.
नक्की वाचा >> ‘टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही…’; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप
दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार…
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ ही योजना सुरू केलेली दिसत आहे,” असा टोला लगावला होता. “गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.