विश्लेषण : आपत्कालीन व्यवस्थापनात रुग्णालये किती सिद्ध? दिरंगाई का?

विश्लेषण : आपत्कालीन व्यवस्थापनात रुग्णालये किती सिद्ध? दिरंगाई का?



विश्लेषण : आपत्कालीन व्यवस्थापनात रुग्णालये किती सिद्ध? दिरंगाई का?

प्रसाद रावकर

जगभरातील मोठ्या शहरांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळविणाऱ्या मुंबईतील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. केवळ महाराष्ट्राच्या गाव-खेड्यातूनच नव्हे तर परराज्यांतील रुग्णही मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईतील सरकारी, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कायमच रुग्ण आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी असते. खासगी रुग्णालयांमध्येही काही अंशी तशीच स्थिती असते. डॉक्टर, परिचारिका, अन्य रुग्णालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय ऐरणीवर आला आहे. परिणामी, रुग्णालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन काळाची गरज बनली आहे. रुग्णालयीन प्रशासन मात्र त्याबाबत उदासीन असल्याचे दिसते आहे.

अनुचित प्रकार, दुर्घटनांचा सर्वांनाच फटका

गेल्या काही वर्षांमध्ये रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुचित प्रकार घडू लागले आहेत. एखादा रुग्ण दगावल्यानंतर त्याचे नातेवाईक संतप्त होतात आणि डॉक्टर, परिचारिका, अन्य रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात. अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. तसेच रुग्णालयांतून नवजात बालकांची चोरी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रुग्णालयांतील सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. रुग्णालयांमध्ये छोटी-मोठी आग लागण्याच्याही घटनाही घडल्या आहेत. एकूणच रुग्णालयांमध्ये घडणारे अनुचित प्रकार वा दुर्घटनांचा फटका डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्णांनाही सोसावा लागत आहे.

हेही वाचा :  “काँग्रेसमध्ये काही लोक फक्त एसीमध्ये बसून मोठमोठी भाषणं ठोकतात”, राहुल गांधींनीच घेतली नेतेमंडळींची शाळा!

आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत उदासीनता?

रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र रुग्णालयीन कर्मचारी त्यासाठी सज्ज असायला हवेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने मुंबईतील सरकारी, पालिका आणि खासगी अशा एकूण ६१२ रुग्णालयांना आपत्कालीन व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश देऊन तब्बल एक वर्ष लोटले. परंतु केवळ २१ रुग्णालयांनीच हा आराखडा सादर केला. केवळ खासगीच नाही तर सरकारी आणि पालिकेचे रुग्णालयीन व्यवस्थापन त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयांना आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आराखड्याचा मसुदाही तयार करुन पाठविण्यात आला होता. परंतु त्यातील रकाने भरून तो सादर करण्याची तसदीही रुग्णालयांनी घेतली नाही.

अपघात, घातपातातील जखमींसाठी नियोजनाची गरज

मुंबईत नैसर्गिक आपत्ती, इमारत कोसळणे, आग लागणे, अपघात, घातपात अशा घटना घडत असतात. अशावेळी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येते. रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवेबाबत व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि येणारे जखमी यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी नियोजनाची नितांत गरज असते. त्याचाही आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यात समावेश असणे गरजेचे आहे. ही बाब आराखड्यात विचारात घेण्यात आली आहे. परंतु रुग्णालये या आराखड्याच्या मसुद्याकडेच दुर्लक्ष करीत आहेत.

हेही वाचा :  Property: घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारी बँकांकडून स्वस्त घरं, दुकान आणि जमीन, अधिक तपशील जाणून घ्या

कारवाईचा बडगा

आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा सादर न करणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरणपत्र पाठविण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यानंतरही आराखडा सादर न करणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई असणार आहे. मुळात रुग्णालयांनी सदैव तत्पर असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना रुग्णालयांमध्ये असायलाच हव्यात. सीसी टीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, अग्निप्रतिबंध यंत्रणा, पुरेसे मनुष्यबळ आदी सुविधा असायलाच हव्यात. तरच अनुचित प्रकार, दुर्घटना टाळणे प्रशासनाला शक्य होऊ शकेल.

The post विश्लेषण : आपत्कालीन व्यवस्थापनात रुग्णालये किती सिद्ध? दिरंगाई का? appeared first on Loksatta.

Source link