IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्यावर रोज नवनवे आरोप होत आहेत. त्यातच वादग्रस्त पूजा खेडकर याच्या शासकीय विश्रामगृहावर पोलिसांची टीम दाखल झाली होती. 15 जुलैला रात्री उशिरा पोलिसांनी वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात प्रवेश केला होता. साध्या कपड्यातील 6 पोसीस पूजा खेडकर राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले होते. दरम्यान पूजा खेडकर यांनी मात्र आपणच पोलिसांना बोलावलं होतं, ते चौकशीसाठी आले नव्हते असा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्यावरील आरोपांना त्यांनी उत्तर दिलं असून, खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे.
“जे काही सत्य आहे ते समोर येईल, काही लपवलेलं नाही. सरकारने गठीत केलेल्या समितीशी जो काही संवाद साधला जातो त्यात गुप्तता पाळली जाते. यामुळे ते लोकांशी, मीडियाशी शेअर करु शकत नाही. सर्व चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. जी काही कागदपत्रं, माहिती मी दिली आहे त्यासाठी समिती आहे. तज्ज्ञ यासंबंधी निर्णय घेतली आणि त्यासाठी आपण वाट पाहिली पाहिजे. आपण त्याचा आदर करायला हवा,” असं आवाहन पूजा खेडकर यांनी केलं आहे.
खोट्या प्रमाणपत्रांच्या आरोपावर IAS पूजा खेडकरांनी अखेर मौन सोडलं, ‘मला दोषी ठरवणं…’
“आता जर तुम्ही म्हणत आहात तर कमिटीसमोर सगळं सत्य येईलच. दररोज नव्या फेक गोष्टी समोर येत आहेत. फेक न्यूज दिल्या जात आहेत. असा कोणता व्यक्ती असतो ज्याचं रोज काही नवीन असतं. खोटी माहिती पसरवली जात आहे. माझी फार मानहानी होत आहे. मीडियाने जबाबदारीने वागायला हवं. माझा मीडियावर विश्वास आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना जी काही माहिती आहे, ती खोटी म्हणून पसरवू नका,” असंही त्यांनी म्हटलं.
“जी काही माहिती आहे त्यात छेडछाड होऊ नये यासाठीच ती जाहीर केली जात नाही. कोणीही मध्यस्थीचा प्रयत्न करु नये यासाठीच ती दिली जात नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी स्वत: तुम्हाला त्याची कॉपी देईन,” असंही त्या म्हणाल्या. पोलीस आले नव्हते, मी त्यांना बोलावलं होतं. माझं त्यांच्याकडे काम होतं. पोलीस कोणत्याही तपासासाठी आले नव्हते असा दावा यावेळी त्यांनी केला.
नागरी सेवेत स्थान मिळवण्यासाठी इतर मागासवर्गीय कोट्याचा (ओबीसी) आणि अपंगत्वाच्या तरतुदींचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे. तसंच त्यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं सापडली आहेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणार आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) आणि 2021मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं.