विधानपरिषदेसाठी काय होती महायुतीची रणनिती? अजित पवारांनी स्वत: केलं उघड, ‘आम्ही तिघेही तीन वेळा…’

विधानपरिषदेसाठी काय होती महायुतीची रणनिती? अजित पवारांनी स्वत: केलं उघड, ‘आम्ही तिघेही तीन वेळा…’


Maharashtra Legislative Council Election: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीसाठी हा निकाल संजीवनी देणारा ठरला आहे. याचसह महायुतीने निवडणुकीसाठी आखलेली रणनीतीही यशस्वी ठरली आहे. अजित पवार यांनी निकाल सुरु असतानाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नेमकी काय रणनीती होती याचा खुलासा केला. 

निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीबद्दल ते म्हणाले की, “आमदार फुटणार अशा बातम्या येत होत्या. पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाने आपली मंत सांभाळायची यावर चर्चा केली. तसंच बाकीचे आमदार त्यांना सगळ्यांनीच आपल्याकडे खेचण्याचा किंवा विनंती करण्याचा प्रयत्न करायचा नाही असं ठरलं होतं. वेगवेगळ्या पक्षांनी जबाबदारी वाटून घेतली होती”. 

“आम्हाला मतं कमी होती. स्वत: एकनाथ शिंदे यांनाही कमी होती. पण अपक्ष, छोटे पक्ष असतात. तीन वेळा मी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. एकदा वर्षावर बैठक झाली. आम्ही एकत्र मिळून नाही तर प्रत्यकेजण वेगळी विनंती करेल असं ठरलं होतं असं पुन्हा त्यांनी सांगितलं. महायुतीला विधानसभेतही असंच यश मिळावं यासाठी प्रयत्न असेल,” असा विश्वासही व्यक्त केला.

हेही वाचा :  भाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

पुढे त्यांनी सांगितलं की, “आम्हाला ही निवडणूक बिनविरोधी होईल असं वाटत होतं. पण अचानक एक अतिरिक्त उमेदवार आला आणि निवडणुकीला वेगळ्या प्रकारची रंगत आली. पण आता चित्र स्पष्ट झालं आहे. मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेत निवडून गेले आहेत. तिथे आता महायुतीला बहुमत मिळालं आहे. यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व आमदारांनी ऐकल्या. कुटुंब म्हणून सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न होता. लोकशाही पद्धतीने निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात यश मिळालं याचं समाधान आहे”.

निकालामागे अदृश्य शक्ती होती का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “अदृश्य शक्ती वैगेरे असं काही नसतं. प्रयत्न करायचे असतात. तुम्हाला आमदारांशी संबंध चांगले ठेवावे लागतात. त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आमच्या सहकारी मित्रांनी चांगलं काम केलं. आम्हाला ज्यांन शब्द दिला त्यांनी मतदान केलं हे निकालावरुन दिसत आहे”.



Source link