घाटीत नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती,एकाच दिवशी 10 रुग्ण दगावले; डॉक्टरांनी सांगितलं कारण

घाटीत नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती,एकाच दिवशी 10 रुग्ण दगावले; डॉक्टरांनी सांगितलं कारण


Ghati Hospital Death Case: नांदेड रुग्णालयापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचीही विदारक अवस्था समोर आली आहे. घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 रुग्ण दगावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रतिक्रिया देत रुग्णांच्या मृत्यूंवर स्पष्टीकरण दिले आहे. 

संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये औषध टंचाई कायम असून सोमवारीही केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा उरला आहे. त्यामुळं,औषधांसाठी हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन नागरिक फिरत असतात. तसंच, बरेच रुग्ण घाटी रुग्णालयात उपचारांसाठी खूप उशिराने दाखल होतात त्यामुळं मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. तर, काहींच्या मते रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. 

डॉक्टरांची प्रतिक्रिया

घाटी रुग्णालयात मरणासन्न अवस्थेत रुग्ण येतात फक्त संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातून आणि मराठवाड्याबाहेरूनही रुग्ण येतात आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं घाटी हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणं आहे. मृत्यूचा समर्थन नाही मात्र अत्यंत क्रिटिकल अवस्थेत रुग्ण येत असल्यामुळेच मृत्यू होत असल्याचं प्रशासनाचे म्हणणं आहे. दिवसाला आठ ते दहा मृत्यू या ठिकाणी होतात तर महिन्याला 300 ते साडेतीनशे मृत्यू होतात, मात्र रुग्णाचा जीव वाचवणं आमचं कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाचे डीन आणि वैद्यकीय अधिष्ठाता यांनी दिली आहे.

हेही वाचा :  अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचे मृत्यू 

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय आणि महाविद्यालयात 24 तासात 24 रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा ढासळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर,औषध पुरवठा होत नसल्याने हे मृत्यू झालेत का असा सवाल झी 24 तासने उपस्थित केला होता. तेव्हा रुग्णालयात औषधांची कुठलीही कमतरता नाही असा दावा रुग्णालय प्रशासनाने प्रेस नोट काढून केला होता. प्रत्यक्षात मात्र आजही रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व औषधी ही बाहेरूनच आणावी लागत असल्याचे झी 24 तासने उघड केले आहे. सलाईन, सिरींज, रेबीज, सर्पदंश अश्या सर्वच औषधी बाहेरून आणाव्या लागत आहेत. रुग्णालयातील डॉकटर एका साध्या चिठ्ठीवर लिहून ही औषधे बाहेरून आणण्यास सांगत आहेत, हे उघड झाले आहे.



Source link