Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”


“ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपाचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजपा नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले.”

रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की करत आहेत. देश सोडून पळून जाण्याची अमेरिकेचे ऑफर धुडकावून झेलेन्स्की यांनी आपण देशामध्येच राहणार असून रशियाविरोधात लढणार असल्याचं म्हटलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सध्या जगभरातील नेत्यांना फोन करुन समर्थनाची मागणी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आपल्या नेत्यांसोबत व्हिडीओ शूट करुन ते पोस्ट करत लढत राहण्याचा निर्धारही व्यक्त करताना दिसतायत. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही चर्चा केलीय. सध्या जगभरामध्ये झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जात आहे. असं असतानाच आता शिवसेनेनं झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केलीय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

वोलोडिमिर झेलेन्स्की यांचं कौतुक
“रशियासमोर शरणागती पत्करण्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नकार दिला आहे. रशियाच्या बलाढ्य फौजा युक्रेनमध्ये घुसल्या. लढाऊ विमाने नागरी वस्त्यांवर बॉम्बहल्ले करीत आहेत. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांनी युक्रेन रक्तबंबाळ झाले आहे, पण वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश वाचविण्याचा निर्धार केला आहे. झेलेन्स्की यांनी आतापर्यंत ६७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना फोन करून मदतीची याचना केली. त्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आहेत, पण एकही राष्ट्र झेलेन्स्की यांना उघडपणे मदत करायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेनही फुसकेच निघाले. बायडेन यांनी युक्रेनच्या बचावासाठी सैन्य व दारूगोळा पाठवायला हवा होता, पण बायडेन यांनी झेलेन्स्की यांना फोन करून सांगितले, ‘‘विमान पाठवतो, युक्रेन सोडून पळून जा.’’ यावर झेलेन्स्की यांनी जगाला बाणेदार उत्तर दिले, ‘‘मला पळून जाण्याचा मार्ग नकोय, मला पळून जाण्यासाठी तुमचे विमान नकोय. मला शस्त्र आणि दारूगोळा द्या. मी व माझा देश लढत राहील.’’ झेलेन्स्की यांनी एखाद्या महानायकाप्रमाणे हे विधान फेकले,” असं म्हणत शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं कौतुक केलंय.

हेही वाचा :  वडिलांच्या कानाखाली लावली, आईला केसाला धरुन फरफटत आणलं; जमीन भावाच्या नावे केल्याने मुलाचा प्रताप

नक्की वाचा >> Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…”

युक्रेनच्या पाठीमागे एकही देश उघडपणे उभा राहत नाही
“झेलेन्स्की हे स्वतः हाती शस्त्र घेऊन रणांगणात उतरले आहेत. ते बेडरपणे लढत आहेत. यालाच म्हणतात ५६ इंचाची छाती. झेलेन्स्की म्हणाले, आम्ही युक्रेनचे प्राणपणाने रक्षण करू. शस्त्र हेच आमचे सामर्थ्य आहे. आम्ही आमची बायका-मुले, मातृभूमी या सर्वांचे रक्षण करू. रशियाचे शस्त्रबळ युक्रेनच्या तुलनेत प्रचंड आहे. अमेरिकेने इराकला गिळले व सद्दाम हुसेन यांना खतम केले, त्याचप्रमाणे रशियाला युक्रेनला गिळून झेलेन्स्की यांना खतम करायचे आहे. महासत्तेचे लांडगे हे असे लचके तोडत आहेत. सद्दाम हुसेन अमेरिकेला शरण गेले नाहीत, पण लढणाऱ्या सद्दामला जगाने मदत केली नाही. आता आक्रोश करणाऱ्या युक्रेनच्या पाठीमागे एकही देश उघडपणे उभा राहत नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

मोदी भाजपावर निशाणा…
“जगाचे नेते श्री. मोदी यांनी तर ‘नरो वा कुंजरोवा’ अशी तटस्थ भूमिका स्वीकारली. ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपाचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजपा नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले. म्हणूनच लढणाऱ्या युक्रेनचे व त्यांच्या बेडर राष्ट्राध्यक्षांचे महत्त्व आहे. झेलेन्स्की हे आज जगाचे नायक बनले आहेत. अमेरिका, चीनसारख्या महासत्ता भूमिका घ्यायला तयार नाहीत. रशियाचे पुतीन लांडग्याप्रमाणे युक्रेनचे लचके तोडत आहेत. जगातले महापंडित, युनो, नाटो हतबलतेने पुतीनने लादलेले युद्ध पाहत आहेत, पण मदतीस कोणी तयार नाही. सर्व आंतरराष्ट्रीय मंच हे षंढांसारखे खाली मान घालून बसले आहेत. झेलेन्स्की हे त्यांच्या परिवारासह पळून जाऊ शकले असते. त्यांनी नकार दिला. त्यांनी स्वतः हातात शस्त्र घेतले. त्यांनी त्यांच्या जनतेला आवाहन केले, ‘‘ज्यांना शस्त्र हवीत त्यांना शस्त्र मिळतील. मिळेल त्या हत्याराने रशियन फौजांशी लढा.’’ झेलेन्स्की यांच्या या वक्तव्याने युक्रेनची जनता चैतन्याने भारून गेली,” असं लेखात म्हटलंय.

हेही वाचा :  राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

नक्की वाचा >> Ukraine War: त्या २४ वर्षीय तरुणीची Instagram स्टोरी जगभरात चर्चेचा विषय; ‘पुतिन कनेक्शन’मुळे स्क्रीनशॉट व्हायरल

दुसऱ्या महायुद्धाची आठवण…
“किव या राजधानी शहरात नऊ हजार लोक शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले. त्यात माजी मिस युक्रेनचाही समावेश आहे. झेलेन्स्की यांचा हा बाणा पाहून आम्हाला दुसऱ्या महायुद्धात हिटलरी फौजांशी मुकाबला करणाऱ्या चर्चिलची आठवण येत आहे. त्या वेळी ब्रिटनची युद्धाची तयारी मुळीच नव्हती. बेल्जियम आणि फ्रान्स यांच्या सीमेजवळील डंकर्कच्या किनाऱ्यावर ब्रिटिशांच्या नि फ्रेंचांच्या साडेतीन लाख फौजेपैकी निम्म्याहून अधिक सैनिक हिटलरी फौजांच्या चढाईत ठार मारले गेले होते नि इतरांना मिळेल त्या जहाजातून अथवा होडक्यांतून ब्रिटिश खाडी ओलांडून कशीबशी माघार घ्यावी लागली होती. फ्रान्सच्या भ्रष्ट, अंदाधुंद नि फंदफितुरीने पोखरलेल्या राजवटीचा हिटलरी फौजांच्या चढाईपुढे धुव्वा उडायला लागला होता. अशा स्थितीत ब्रिटनला वाचविण्याची जबाबदारी चर्चिलवर येऊन पडली. काम कठीण होते, पण चर्चिल आत्मविश्वासाने उभा राहिला. त्याने ब्रिटिश जनतेला रेडिओवरून जो संदेश दिला, त्याने सबंध राष्ट्रामध्ये जणू दैवी शक्तीचा संचार झाला. त्याने सुरुवातीलाच परखडपणे सांगितले की, ‘‘मी तुम्हाला रक्त, घाम, श्रम आणि अश्रू यांच्याहून अधिक काही देऊ शकत नाही,’’ पण पाठोपाठ त्याने गर्जना केली की, ‘‘आम्ही शत्रूंशी भूमीवर लढू, रस्त्यावर लढू, कुंपणांमध्ये लढू, शेतामध्ये लढू, सागरावर लढू आणि जर हा देश सोडण्याची वेळ आली तर समुद्रपार जाऊन त्यांच्याशी लढू, पण विजय मिळेपर्यंत लढण्याचे थांबणार नाही.’’ तो फक्त बोलूनच थांबला नाही तर त्याने लढणाऱ्या लोकांचे नेतृत्व केले,” असा उल्लेख लेखात आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

नोंद इतिहास ‘डरपोक’ म्हणून
“लंडनवर हिटलरच्या लडाकू विमानांचा भयंकर बॉम्बहल्ला सुरू असताना चर्चिल निधड्या छातीने सैन्यतळांवर फिरत होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे चर्चिलच्याच निर्भयाने बेडरपणे फिरत आहेत. याच बेडरपणामुळे जेलेन्स्की हे जगाचे नायक बनले आहेत. युद्धप्रसंगी पळून न जाता हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरणारा, जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून त्यांचे नाव इतिहासात कोरले जाईल. रशियासारख्या बलाढ्य व साम्राज्यवादी देशाने व पुतीनसारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याने युक्रेनवर हल्ला करणे हे शौर्य नसून रशियन आक्रमणापुढे शरण न जाता लढणे हेच खरे शौर्य आहे. या संघर्षात जे तटस्थ राहिले व नुसते शब्दांचे बुडबुडे फोडत राहिले, त्यांची नोंद इतिहास ‘डरपोक’ म्हणून ठेवेल,” असा टोला शिवसेनेनं नाव न घेता लगावला आहे.

हेही वाचा :  Travel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

नक्की वाचा >> Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

जग शूरांची आठवण ठेवते, बाकी…
“अफगाणिस्तानच्या जनतेला तालिबान्यांपासून वाचवू शकले नाहीत. इराकच्या जनतेला अमेरिकेच्या मगरमिठीतून वाचवू शकले नाहीत. युक्रेनचा एकाकी लढा पाहूनही महासत्ता म्हणवून घेणाऱ्यांच्या मुठी अन्यायाविरुद्ध आवळल्या नाहीत. ही तर आंतरराष्ट्रीय मंचांची नामर्दानगीच आहे. युनोपासून नाटोपर्यंत सगळेच जण कुचकामी ठरले. फक्त प्रे. झेलेन्स्की हेच ५६ इंचाच्या छातीवर गोळ्या झेलत लढत राहिले. जग शूरांची आठवण ठेवते. बाकी येतात व जातात. युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …