‘असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?’, बांडगुळं म्हणत उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ (Saamana) वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, यामधून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात अशा शब्दांत त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. हे ट्रिपल इंजिन की डालडय़ाचा डबा? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा’ या ‘पॉडकास्ट’ माध्यमातून ‘सामना’ला प्रदीर्घ मुलाखत दिली. 2024 आपल्या देशाला नवं वळण देईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे तीन पक्षसुद्धा आता ‘एनडीए’त सामील झाले आहेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला. शिवसेनेने तुमच्या पाठीत म्हणे खंजीर खुपसला, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं, की ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीही फोडलीत? अशी विचारणा त्यांनी भाजपाला केली. 

ज्या घडामोडी घडताहेत त्याबद्दल बोलायचं तर ज्यांनी या घडामोडी घडवल्या त्यांचा घडा आता मोडीत निघायला आलेला आहे. एक नवीन महाराष्ट्र उभा राहतोय आणि हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा या घडामोडींना सुरुवात झाली त्याच वेळी मी म्हटलं होतं की, सडलेली पानं पडलीच पाहिजेत. ती पानं पडल्यानंतर नवीन अंकुर निघतात. कोंब फुटतात आणि वृक्ष पुन्हा ताजातवाना, टवटवीत पानांनी-फुलांनी बहरून जातो. आज तीच अवस्था शिवसेनेची आहे. सडलेली पानं आता झडलेली आहेत. नवीन कोंब फुटलेले आहेत असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

हेही वाचा :  फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss

“काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं हे आपल्याच सोबत आहेत,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

“धनुष्यबाण आणि मशाल या माझ्यासाठी नंतर आलेल्या गोष्टी आहेत. पहिली आली ती शिवसेना. ते नाव फार महत्त्वाचं आहे. जे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीसुद्धा सांगितलेलं आहे की, शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. मी वारंवार हे सांगत आलोय की, निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 

मी इर्शाळवाडीला गेलो असताना त्या गर्दीत एक तरुण मला ओरडून प्रश्न विचारत होता की, ‘आपल्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली तरी आम्ही हेच आयुष्य जगायचं का?’ आणि हा चटका लावणारा प्रश्न आहे. आपण पंचाहत्तर वर्षे कसली साजरी करतो आहोत? कसला अमृत महोत्सव? इकडे माणसं मृत्युमुखी पडताना अमृत कसलं? असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

हेही वाचा :  Maharashtra Politics case : 16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...

“असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?”

“एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना मुख्यमंत्री मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. पहा, फोटो प्रसिद्ध झालेत. कुणाला मुजरा मारताय? कशासाठी मुजरा मारताय? ज्यांना मुजरा मारायला गेला आहात त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये देशात काय चाललंय? मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना बाहेर आली आहे. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चाड बाळगा. मुळात हा व्हिडीओ बाहेर आला नसता तर जगाला काहीच कळलं नसतं. या घटनेचा तिथल्या तिथेच रोखठोक समाचार घ्यायला हवा होता, पण तो घेतला गेला नाही हे दुर्दैव म्हणायचं. एवढे होऊनही आपले पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर 36 सेकंदच ते बोलले आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले. आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत रवाना झाले आहेत. म्हणजे राज्यात एवढी मोठी दुर्घटना घडली आहे, आपत्ती ओढवली आहे, दरड कोसळली आहे तरीदेखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जाताहेत. हे असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

“मला जे करायचं होतं ते मी केलं. सध्याचं चित्र तुम्ही म्हणताय ते पाहिलं तर या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, पण असं किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. शिवसेनाप्रमुखांचासुद्धा हाच स्वभाव होता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा :  बाबरी पाडली तेव्हा फक्त भाजपचीच मंडळी, शिवेसेनेचे कोणीच नव्हते- फडणवीसांचा दावा

“माझं सरकार वाहून नव्हतं गेलं. खेकडय़ांनी धरण फोडलेलं. ते धरणातच बसले होते, मातीमध्ये.शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही आपण सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिरका तिरकाच जातो आणि खेकडय़ाची एक मानसिकता तुम्हाला माहिती असेल की, ज्या टोपलीत खेकडे असतात त्या टोपलीवर झाकण ठेवण्याची गरज नसते. एखादा खेकडा वर जायला निघाला की बाकीचे खेकडे त्याला खाली खेचत असतात. तसेच हेही खेकडेच आहेत,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …