हेमंत बिस्वा शर्मा यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राव यांनी २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) भारताच्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि मोदी सरकारकडे पुरावे मागितले होते. त्यानंतर हेमंत शर्मा यांनी व्हिडीओ ट्विट करत केसीआर यांना उत्तर दिले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे., “प्रिय केसीआर गरू, आमच्या शूर सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओग्राफिक पुरावा येथे आहे. असे असूनही तुम्ही आमच्या सशस्त्र दलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभे करता आणि त्यांचा अपमान करता. आमच्या सैन्यावर हल्ला करून त्यांची बदनामी करायला तुम्ही इतके हताश का आहात? नवीन भारत आपल्या सैन्याचा अपमान सहन करणार नाही,” असे शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नकाशे, उपग्रह प्रतिमा आणि अनेक व्हिडिओंचे कट शॉट्स दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये सर्जिकल स्ट्राईक कुठे करण्यात आला होता, याची पूर्वीची छायाचित्रेही दाखवण्यात आली आहेत.
याआधी, राव, पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा द्यावा या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागणीचे समर्थन केले होते. राहुल गांधींच्या वतीने सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागण्यात काहीही गैर नाही, असे राव म्हणाले. मी अजूनही विचारत आहे. भारत सरकारने पुरावे दाखवावेत. ही त्यांची जबाबदारी आहे. लोकांच्या मनात शंका आहेत, असे राव म्हणाले होते.
सर्जिकल स्ट्राईकवरून दोन्ही मुख्यमंत्री गेल्या आठवड्यापासून आमने-सामने आहेत. याची सुरुवात शर्मा यांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना, :या लोकांची मानसिकता बघा. जनरल बिपिन रावत हे देशाची शान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले. राहुल गांधींकडे राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही तुमच्याकडे कधी मागितला होता का? माझ्या सैन्याकडे पुरावे मागण्याचा तुला काय अधिकार आहे?,” असे म्हटले होते.