शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रांवर, विविध संबंधित सत्रांचे विषयांवर चर्चा करण्यात आली. या सत्रात विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांचे सरकारी अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, कौशल्य विकास संस्था, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि इतर तज्ञ उपस्थित होते.
डिजिटल युनिव्हर्सिटी, डिजिटल शिक्षक, क्लासरूम वन चॅनलचा आवाका वाढविणे या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. शहर नियोजन आणि डिझाइन करताना भारताच्या दृष्टीकोनातून ज्ञान,उद्योग-कौशल्य वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि कौशल्य संबंध मजबूत करणे हा यामागचा हेतू आहे.
डिजिटल कनेक्टिव्हिटीवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल युनिव्हर्सिटीबद्दल बोलले. आजची तरुण पिढी देशाच्या भविष्याचे नेतृत्व आहे. ते भविष्याचे राष्ट्रनिर्माते असल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रात केलेल्या बदलांबद्दलही त्यांनी माहिती दिली. २०२२ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित पाच गोष्टींवर खूप भर देण्यात आला आहे. यामध्ये आपली शिक्षण प्रणाली विस्तारित करणे आणि तिची गुणवत्ता सुधारणे यांचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जागतिक महामारीच्या काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीने आपली शिक्षण व्यवस्था जिवंत ठेवली आहे. भारतात डिजिटल डिव्हाईड किती वेगाने कमी होत आहे हे आपण पाहत आहोत.
‘पाच महत्वाच्या बाबींवर भर’
२०२२ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित पाच बाबींवर जास्त भर देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. यामध्ये प्रथम गुणवत्ता शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचा समावेश आहे. यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीचा विस्तार होऊन तिची गुणवत्ता सुधारेल आणि शिक्षण क्षेत्राची क्षमता वाढणार आहे. यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
कौशल्य विकास ही दुसरी महत्वाची बाब आहे. देशात डिजिटल स्किलिंग इकोसिस्टम तयार झाली पाहिजे. उद्योगाच्या मागणीनुसार कौशल्य विकास व्हायला हवा, इंडस्ट्री लिंकेज अधिक चांगले असावे, याकडे लक्ष देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहरी नियोजन आणि रचना ही आहे. भारतातील प्राचीन अनुभव आणि ज्ञान आज आपल्या शिक्षणात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीयीकरण हा चौथा महत्वाचा पैलू आहे. जागतिक दर्जाची परदेशी विद्यापीठे भारतात येणे. गिफ्ट सिटीसारख्या आमच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी फिनटेक संस्थांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तर अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक ही पाचवी आणि महत्वाची बाब आहे. या सर्वांमध्ये रोजगाराच्या अफाट संधी असून ही एक मोठी जागतिक बाजारपेठ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.