‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया
मुंबई : कामगारांच्या संपामुळे एसटीची सेवा अद्यापही पूर्ववत होऊ न शकल्याने महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. मात्र, संपात मोठय़ा प्रमाणात वाहकही सहभागी असल्याने महामंडळाने काही महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहक भरतीचा निर्णय घेतला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीत ८२ हजार ४८९ कर्मचारी असून, २७ हजार ९८५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अद्यापही ५४ हजार ५९४ कर्मचारी संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ४ हजार ५०७ चालक हजर झाले असून, २५ हजार ८३ चालक संपात सहभागी आहेत़ तसेच ४ हजार ६३० वाहक कर्तव्यावर असून, २० हजार २८० वाहक संपात सहभागी आहेत. कामावर हजर झालेल्यांमध्ये सर्वाधिक प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारी आहेत. मात्र, मोठय़ा प्रमाणात चालक, वाहक सेवेत आल्याशिवाय एसटी पूर्णपणे सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे महामंडळाने मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नुकतीच ८०० कंत्राटी चालकांची भरती केली. मात्र, एसटीचे चालकच परतत नसल्याने या संख्येतही वाढ केली जाणार असून, त्यासाठी या आठवडय़ात निविदाही काढण्यात येणार आहे.
कंत्राटी चालक भरती करतानाच संपकरी वाहकही परतण्याचे प्रमाण कमी असल्याने एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एसटीतच इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीला हे काम दिले असून त्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना विचारले असता, सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विलीनीकरणाबाबत शासनाने नेमलेल्या समितीने अहवालासाठी मुदतवाढ मागितली आहे.
आतापर्यंतची कारवाई
एसटीच्या ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आह़े नऊ हजार ४४१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. ८ हजार ६२३ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत.
The post एसटीत आता कंत्राटी वाहकांची भरती; ‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया appeared first on Loksatta.