महेश एलकुंचवार [email protected]
गेली कित्येक वर्षे ‘महल’मधल्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतापासून लताबाई प्रकाशात आल्या असे लिहिले, बोलले जाते. ते निखळ अडाणीपणाचे आहे व असे बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. बाई ‘प्रकाशात आल्या’ म्हणजे काय? सूर्य प्रकाशात येतो का? बाई आल्या, गायल्या आणि त्यांनी जग जिंकले, हेच खरे आहे.
जी बातमी कानावर येईल म्हणून मन धास्तावलेले होते ती अखेर आलीच. काही काळ मी स्वस्थ बसून राहिलो आणि नंतर स्वत:ला कामात गुंतवून घेतले. अशात संपादकांचा फोन आला, ‘तुम्ही लताबाईंवर काही लिहा म्हणून.’ मी नाहीच म्हटले. कसे व काय लिहिणार? आपले आईबाप गेल्यावर आपण काही लिहू शकतो का? पोरकेपणाची सर्वव्यापी जाणीव आपल्याला घेरून असते. लताबाईंच्या जाण्याने आयुष्यात तिसऱ्यांदा आपले सगळे गेले अशी भावना क्षणाक्षणाला अधिक गडद होत गेली. भारतातल्या कोटय़वधी लोकांचे असे झाले असणार. आईवडील जातात तेव्हा अनाथपणाची जाणीव वैयक्तिक, आपल्यापुरती असते. महान कलावंत जातो तेव्हा मात्र ही जाणीव आसमंतभर पसरते व वैश्विक होते. सर्व माणसांना एकत्र बांधून ठेवणे न राजकारण्यांना जमत, न समाजसेवकांना, न शास्त्रज्ञांना. कलावंत मात्र ते सहज करून जातो. सर्व भारतीय (व त्यात पाकिस्तानमधलेही लोक आले!) एका सूत्राने एकमेकांशी लताबाईंच्या आवाजाने जसे बांधले गेलेले आहेत, तसे इतर कशानेही नाही. रामायण व महाभारत या दोन महाकाव्यांनी ते केले; पण त्यात फक्त हिंदूू एकमेकांशी जुळले राहिले. लताबाईंच्या आवाजाने मात्र हिंदूू, मुसलमान, ख्रिश्चन सगळे कायम एकत्र बांधून ठेवले. नाहीतर पाकिस्तानातल्या मुस्लिमांचे डोळे नुसते लताबाईंचे नाव घेतले तरी ओले होतात, हे झाले नसते. हा अनुभव मी प्रत्यक्ष पंधरा दिवस पाकिस्तानात होतो तेव्हा घेतलेला आहे. तिथले लोक एकामागोमागच्या निर्घृण राजवटींनी मनांनी मोडलेले व घायाळ झालेले. त्यांना बाईंच्या आवाजात विसावा मिळतो, भारताशी गळाभेट झाल्यासारखे वाटते. आपले सगळे हरवले, पण हा आवाज तर आपल्यासाठीच आहे असे त्यांना वाटते. दोन वैरी देशांना जोडणारा हा धागा तुटण्यासारखा नाही. तेवढे एक आशास्थान या दोन्ही देशांतल्या लोकांसाठी कायम जिवंत राहील.
लताबाईंचा उदय भारतीय इतिहासातल्या अत्यंत आनंदाच्या व तितक्याच कधीही भरून न येणाऱ्या व जिव्हारी जखम झाल्याच्या क्षणी झाला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत दुभंगला. हा रक्तलांछित आनंद मनवावा तरी कसा, अशा विव्हल मन:स्थितीत सर्व देश तेव्हा होता. माणसे मारली जात होती. जी जिवंत होती, त्यांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत होते. विस्थापित, सर्वस्व गमावलेली माणसे शहरागावांमधून पसरू लागली होती. आणि ते जरा पचनी पडत नाही तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधींची हत्या झाली. सर्व देश काळोखात बुडाला व आशांचे झरोके कायमचे बंद झाले असे वाटले.
हा काळ किती लोकांना आठवतो आता, ते मला माहीत नाही. पण मला आठवतो. तेव्हा मी सात वर्षांचाच होतो. पण वातावरणातली निराशा व विमनस्कता मला त्याही वयात स्पष्टपणे जाणवत होती. एकमेकांना धरून ठेवावे असे काही सापडत नव्हते. आणि अशात लताबाईंचा कोवळा, पण आश्वासक स्वर आसमंतात सूर्यप्रकाशाप्रमाणे पसरू लागला.
आताच्या व त्यांच्या आधीच्याही पिढय़ांना हे वर्णन अतिशयोक्त वाटेल. पण ते तसे नाही. तेव्हा गावे शांत असत. घरांमध्ये रेडिओ नसत. पण कुठेतरी बाईंचे गाणे कायम लागलेले असे व माणसे हातातले काम टाकून ते ऐकायला अंगणात येऊन उभी राहत. शांत होत. म्हटले तर ती गाणी फिल्मीच होती व अनेक वेळा त्यातले शब्दही उथळ असत. पण त्या शब्दांशी देणेघेणेच काय होते आमचे? एकतर हिंदी-उर्दू शब्द ते.. कळत कोणाला नसत. पण त्या शब्दांना व चालीला त्यांचे त्यांचे देणे देऊन उरत असे तो फक्त बाईंचा आवाज. सर्व आसमंत त्या आवाजाच्या प्रभेने उजळून जात असे. बाहेरचा व आतला पैस त्याने भरून जात असे. मने प्रकाशाने भरून जात. ‘हृदय आमार प्रकाश होलो, अनंत आकाशे’ असा प्रत्यय येई. तो आवाज संजीवक होता व बाई संजीवनी. आपले शांतवन होत आहे ते या आवाजामुळे अशी स्पष्ट जाणीव कोणाला होत नसे. सर्व काही होई ते नेणिवेच्या पातळीवरच. मलासुद्धा त्याचे स्वरूप बुद्धीने आता कळते आहे. पण त्या आवाजाने ओल्या जखमांवर फुंकर घातली जाई, हा तर माझाही अनुभव आहे. आणि हा अनुभव असा, की प्रत्येकाला तो स्वत:च्या खासगी वैयक्तिक पातळीवर येई व त्याचवेळी सामुदायिक पातळीवरही सर्वाना सर्वाचा होऊन येई. निष्कलंक, निरंजन अशा त्या आवाजाने अनंत अमूर्ततेचे पांघरुण सर्वाच्या मनांवर पडे.
सत्तेचाळीसच्या फाळणीच्या सुमारास लताबाई मुंबईत धडपडत होत्या. त्यावेळी चित्रपट व्यवसायात विस्थापितांची गर्दीच झालेली. भलेबुरे, सगळे नवे लोक तिथे आलेले. सर्वस्व गेल्यामुळे मूल्येही फाळणीच्या आगीत भस्म करून निर्मम झालेल्यांची तिथे गर्दी. कोण कोणाचे नाही. ‘डॉग इट्स डॉग’ असा माहौल. या भयकारक अरण्यात ही सोळा वर्षांची एकटी मुलगी किती प्राणपणाने झगडली असेल. काय पाहिले, भोगले नसेल तिने. कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. पण कुटुंबाच्या जबाबदारीची हिची जाणीव इतकी प्रबळ, की इथेही एकाग्रपणे काम करता करता ती सगळ्या भारताचा प्राणस्वर झाली.
मी लताबाईंचे गाणे प्रथम ऐकले तेव्हा साताठ वर्षांचाच होतो, आणि ते गाणे होते- ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ हे त्यांचे भावगीत. हे १९४७ साल असेल. तो पण एक गमतीदार अनुभव आहे. बाईंनी आपली संगीताची अभिरुची कशी घडवली, त्यांच्याही नकळत, त्याची खूणच इथे पटते. आमच्या घरी संगीताचेच वातावरण होते. घरी फोनोग्राफही होता. पण वडिलांची सांगीतिक आवड कर्मठ होती. ते फक्त पक्के गाणे ऐकत व आम्हीही तेच ऐकले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. चित्रपट संगीत सोडाच, पण ठुमरी, दादरा असे उपशास्त्रीय संगीतही त्यांना चालत नसे. ते डेकेडण्ड आहे असे त्यांना वाटे. त्यामुळे ज्या रेकॉर्ड्स घरात होत्या त्या सगळ्या नामवंत ख्यालगायकांच्या. केसरबाई त्यात मूर्धन्यस्थानी. शिवाय ओंकारनाथ ठाकूर, वझेबुवा, फैयाज खाँ, अब्दुल करीम खाँ. सतत तेच कानी पडे. याला अपवाद फक्त बालगंधर्व व मास्टर दीनानाथ यांच्या नाटय़पदांच्या रेकॉर्ड्सचा. हे दोघे चालत. पण फक्त हे दोघेच. अशात एकदा माझा थोरला भाऊ नागपूरला शिकत होता. त्याने एका सुटीत लताबाईंच्या ‘तुज स्वप्नी पाहिले’ या गाण्याची रेकॉर्ड आणली. ती चोरून ऐकावी लागे. दादा घरात नसताना ती लावायची. एकदा असेच ते घरी नसताना आम्ही फोनोग्राफच्या भोवती कोंडाळे करून ही रेकॉर्ड ऐकत होतो. एकदा, दोनदा, तीनदा. अवीट गोडीचा स्वर्गीय आवाज. समाधान होईना. ‘अंजिरी पडदा महिवरी धरिला’ या ओळीत ‘पडदा’नंतर बाईंचा आवाज पडद्यासारखा कसा सळसळत खाली येतो याचे कौतुक भाऊ करीत होता. तेवढय़ात त्याने वळून पाहिले तर दारात दादा! आमचे तर होशच उडाले. प्रथमच दादा म्हणाले, ‘‘चालू दे.’’ ते गाणे पूर्ण ऐकल्यावर दादा म्हणाले, ‘‘कोण रे ही मुलगी?’’ भाऊ पुटपुटला, ‘‘लता मंगेशकर. मास्टर दीनानाथांची मुलगी.’’ वडील क्षणभराने म्हणाले, ‘‘तरीच!’’ मग थांबून पुन्हा म्हणाले, ‘‘हिच्या प्लेटी (रेकॉर्ड्सना ते ‘प्लेट’ म्हणत.) आणत जा.’’ आणि गेले आपल्या खोलीत. मग काय.. त्या एका क्षणात भिंतच ढासळली आणि घर मग पुढे लतामय होऊन गेले.
उपरोक्त भावगीत आता जवळजवळ कोणाला माहीतही नाही. त्यांची अनेक जुनी हिंदी व मराठी गाणी अलीकडच्या दोन पिढय़ांना माहीतच नाहीत. १९६० च्या आसपास विविध भारती आली. त्यावर वाजणारी गाणीच त्यांना माहीत आहेत. आणि विविध भारतीजवळचा संग्रह भिकार आहे. त्यांच्याजवळ १९४८ ते १९५४-५५ या काळातली गाणीच नाहीत. त्यांचे ज्ञान निवेदकांनाही नाही. मला फार हळहळ वाटते याची. १९४८ ते १९५५ या काळातले बाईंचे जे काम आहे, त्यांच्या आवाजाचा जो अनाघ्रात पोत त्यावेळच्या त्यांच्या आवाजाला आहे, तो नवीन पिढी हरवून बसली आहे. तिला तो माहीतही नाही. मी जीव तोडून त्यांना सांगतो, ‘‘अरे, तुम्ही ऐकलेच काय? ही ही गाणी ऐका म्हणजे परतत्वस्पर्श म्हणजे काय ते तुम्हाला कळेल. आईबापांसाठी झुरणाऱ्या एकाकी मुलांपासून ते आयुष्यातल्या आपदाविपदांनी मोडलेल्या माणसांपर्यंत सगळ्यांच्या जीवनावर सावली धरण्याची दैवी शक्ती या आवाजात कशी होती, ते तुम्हाला अनुभवता येईल.’’
गेली कित्येक वर्षे ‘महल’मधल्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतापासून लताबाई प्रकाशात आल्या असे लिहिले, बोलले जाते. ते निखळ अडाणीपणाचे आहे व असे बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. बाई ‘प्रकाशात आल्या’ म्हणजे काय? सूर्य प्रकाशात येतो का? बाई आल्या, गायल्या आणि त्यांनी जग जिंकले, हेच खरे आहे. ‘आयेगा आनेवाला’ १९५०च्या आसपासचे. पण त्याआधीही ‘जिद्दी’मधले ‘चंदा रे जा रे जा रे’ (१९४८) हे गाणे, ‘बरसात’मधली त्यांची सगळी गाणी, ‘पतंगा’, ‘जादू’, ‘अंदाज’, ‘दुलारी’, ‘नगीना’, ‘बाजार’, ‘समाधी’ (सर्व १९४८ ते ५०च्या दरम्यान) या चित्रपटांमधली गाणी नाक्यानाक्यांवर, दिशादिशांमधून सतत दरवळत असत. त्यानंतर ‘झांजर’ व ‘घुंघरू’या सिनेमांतली गाणी. ही तर कोणाला माहीतच नाहीत. ‘काली काली रतियाँ’, ‘बदनाम हो रहा है, तेरे इश्क का फसाना’ ही ‘घुंघरू’मधली गाणी, ‘ऐ प्यार तेरी दुनिया से हम’ हे ‘झांजर’मधले गाणे, ‘उठाये जा उनके सितम’(‘अंदाज’), ‘दो दिन के लिए मेहमान यहाँ’ (‘बादल’), ‘वो पास आ रहे है’(‘समाधी’).. अशी किती गाणी अम्लान देवचाफ्यासारखी आहेत. आणि काय तो आवाज! एकाच वेळी नितळ मुलायम, पण त्याचवेळी त्याच्या फेकीतही अशी काही ताकद- लेझरबीमसारखा तो एकाग्र, शक्तिशाली आवाज. समोर शिळा धरली तर ती छिन्न होईल अशी ती ताकद. ‘बदनाम हो रहा है’ हे ‘घुंघरू’मधले गाणे एवढय़ासाठी ऐकावे. शिवाय मुख्य गाण्याआधी त्यांनी गायिलेले शेर. ‘सुरमई रात है, सितारे है’ हा ‘सुबह का इंतजार’ या गाण्याआधीचा शेर (‘जोरु का भाई’), ‘आयी थी रात जो तमन्ना लिए हुए’ हा ‘सितारों की महफिल सजी तुम न आये’ या गाण्याआधीचा शेर (‘उडनखटोला’), ‘जो मैं जानती प्रीत किए दुख होय’ हा ‘मुझे भूल गये सावरीया’ या गाण्याआधीचा शेर (‘बैजूबावरा’). त्यात काय आहे ते सांगता येऊ नये, सुगंधाचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडावेत असे म्हटलेले हे शेर. मी तर एकेकदा शेर ऐकूनच तृप्त होतो, गाणे ऐकतच नाही पुढचे.. अशी त्यांची महत्ता. हे शेर जसेच्या तसे म्हणून दाखवणाऱ्या अनेक गायिका हल्ली आपण ऐकतो; पण प्रतिभेचे काय कराल? ‘झांजर’मधल्या ‘ऐ प्यार तेरी दुनिया से हम’च्या आधीचा शेर तर विद्धच करतो. काय पॉवर! ऐकल्यानंतर दिवसभर मौन होतो आपण.
आठवायला बसलो की बाईंची शंभर गाणी एकदम आठवतात. केवढे धन आपल्याला देऊन गेल्या या बाई! माझ्या बालपणापासूनच त्या माझ्याबरोबर आहेतच, पुढेही राहतील, माझ्यानंतरही राहतील, आणि माझ्याप्रमाणेच सर्व तृषार्तासाठी राहतील. तंत्रज्ञानाचे उपकार आहेत आपल्यावर ते एवढय़ासाठी. हा आवाज सर्वदा, सगळीकडे कायम असेल. त्याचे आपल्यावर छत्र असेल व अधिकारही. ‘स्वामी मी सदोदित, सहज मी सतत, सर्व मी सर्वगत, सर्वातीत मी’ या ओवीतच त्यांच्या गाण्याची थोरवी सांगता आली तर येईल.
संगीताचे हे एक आहे. ते तुमच्या जुन्या जखमा उकलते व त्याचवेळी त्या जखमांवर स्नेहसिंचन करते, त्या बऱ्याही करते. दु:खाच्याही लाख परी आहेत. माणसागणिक प्रत्येक दु:खाची प्रत, जात वेगळी. त्या सर्वाना लताबाईंच्या आवाजाचा आधार वाटतो. ज्या दु:खांना नाव देता येत नाही, ज्यांना वाचा नाही, ज्यांना ओळख नाही अशी सर्व दु:खे या आवाजाच्या कुशीत शिरतात.
मला फैजसाहिबांची एक गजल आठवते. त्यांनी वेगळ्या संदर्भात ती लिहिली. पण त्याहून व्यापक संदर्भ देऊन ती पाहता येते. सर्व दु:खे लताबाईंच्यापाशी ही प्रार्थना करीत असतात. ती गजल अशी..
‘मेरा दर्द नग्म्मा-ए-बेसदा
मेरी ज़ात ज़र्रा-ए-बेनिशाँ’
(माझं दु:ख म्हणजे नि:शब्द गाणं.
माझं जगणं क्षुद्र- ज्याला काही पडाव नाही.)
‘मेरे दर्द को जो ज़ुबाँ मिले
मुझे अपना नाम-ओ-निशाँ मिले’
(माझ्या दु:खाला स्वर मिळो. मला माझी ओळख मिळो. माझ्या दु:खाला नाव मिळो.)
‘मेरी ज़ात को जो निशाँ मिले
मुझे राज़्ा-ए-नज्म्म-ए-जहाँ मिले’
(माझ्या जगण्याला दिशा मिळाली तर या जगाचं गूढ मला समजेल.)
‘मेरी खामुशी को बयाँ मिले
मुझे अपना नाम-ओ-निशाँ मिले’
(माझ्या मौनाला वाचा मिळो. मला माझा पडाव मिळो.)
‘मुझे क़ायनात की सर्वरी
मुझे दौलत-ए-दो जहाँ मिले’
(मला या सृष्टीचे ज्ञान मिळो.
मला दोन्ही जगातले ज्ञान मिळो.)
‘मेरा दर्द नग्म्मा-ए-बेसदा
मेरी ज़ात ज़र्रा-ए-बेनिशाँ’
यापेक्षा अधिक चांगले मला काही लिहिता येणार नाही. लताबाईंवर एक ललित लेख मी मौजेत लिहिला होता. त्यातला काही अंश या लेखाबरोबरच जोडत आहे. हा लेख काही मी त्यांना पाठवलाबिठवला नाही. माझी एवढी हिंमत नाही. माझ्या उभ्या आयुष्यात बाई व मी तीनदा अमोरासमोर आलो. कोणीतरी आमची ओळख करून दिली. तीनही वेळा माझी वाचा गेली होती व माझे डोळे त्यांचे पाय शोधत होते.
The post विशेष लेख : अमृताचा घनू.. appeared first on Loksatta.