हर्बल वनस्पतीने आणि बारामतीच्या वनस्पतीने संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असं देखील कंबोज म्हणाले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद आता शिगेला पोहचल्याचं दिसत आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे भाजपा व शिवसेनेतील वातावरण आता चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आज संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
“हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं त्यांच संतुलन बिघडल ही भिती चांगली आहे. किरीट सोमय्या आता संजय राऊतांच्या स्वप्नात येतात.” असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
मोहित कंबोज यांनी सांगितलं की, “१६ फेब्रुवारी रोजी संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेतात आणि अनेक आरोप लावतात. १७ फेब्रुवारी रोजी जेव्हा मीडिया संजय राऊत यांना प्रश्न विचारते, तेव्हा म्हणतात कोणत आहे किरीट सोमय्या? मला त्यांच्याबाबत कधी प्रश्न विचारायचा नाही. १८ फेब्रुवारी रोजी संजय राऊत ट्वीट करून किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा आरोप करतात. १९ फेब्रुवारी रोजी जेव्हा सकाळी विचारलं जातं, जेव्हा आरोपाला उत्तर किरीट सोमय्यांकडून दिलं जातं, तेव्हा संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल अपशब्द उच्चारतात आणि मीडियाला धमकवतात की मला किरीट सोमय्या यांच्याबद्दल नाही विचारायचं. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांबद्दल अनेक अपशब्द बोलतात आणि नंतर किरीट सोमय्यांबद्दल ट्वीट करतात. संध्याकाळी म्हणतात किरीट सोमय्यांबद्दल काहीच बोलायचं नाही, पत्रकाराने विचारलं तर त्याला बोट दाखवून धमकावलं जातं. २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सकाळी किरीट सोमय्यांवर ते आरोप करत ट्वीट करतात.”
तसेच, “मला वाटतं संजय राऊत यांच्या स्वप्नात किरीट सोमय्या येतात आणि किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांची झोप उडवली आहे. ज्या प्रकारे ते एकदिवस काही बोलतात दुसऱ्यादिवशी वेगळं काही बोलतात. संजय राऊत यांचं बारामतीची हर्बल वनस्पती घेऊन, मानसिक संतूलन बिघडलं आहे. हे भिती चांगली आहे, किरीट सोमय्यांचा यांची भिती संजय राऊतांना खूपच चांगली आहे. माझं असं मत आहे की आता पुढे काय काय घडत ते पाहा.” असंही मोहित कंबोज यांनी बोलून दाखवलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.