दिवाळीनंतर राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर एक ते दीड महिना महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होती. त्या वेळीही वसतिगृहे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर करोनाच्या तिसऱ्या लाटेत महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहांची समस्या भेडसावली नाही. मात्र, आता एक फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा महाविद्यालये सुरू केल्याने इच्छा असूनही वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येऊ शकत नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी पुण्या-मुंबईमध्ये शिक्षण घेतात. उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी नाशिकमध्ये शिकतात. कोकणातील विद्यार्थी मुंबई-पुण्यात शिकतात. या सर्व ठिकाणची वसतिगृहे बंद असल्याने या मुला-मुलींनी राहायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असल्याने शहरातील सदनिकांचे गगनाला भिडणारे भाडे परवडत नसल्याने अजूनही हजारो विद्यार्थी मूळ गावीच आहेत. अशातच महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांना हजर राहण्यास सांगत असल्याने विद्यार्थ्यांनी शहरात येऊन राहण्यासाठी हजारो रुपये कुठून आणायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुण्यात आले होते. वसतिगृहे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी आतापर्यंत दोन-तीन वेळा केली आहे. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी कुणाची वाट पाहात आहात, असा संतप्त सवाल विद्यार्थी संघटना उपस्थित करत असून, तातडीने वसतिगृहे सुरू करण्याचे आदेश महाविद्यालयांना मिळावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. पुढील दोन दिवसांमध्ये वसतिगृहांचा आदेश मिळाला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
तातडीने वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी आम्ही करणार आहोत. याबाबत निर्णय न झाल्यास विद्यार्थी संघटनांना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
– कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना
वसतिगृहांच्या निर्णयावर सातत्याने मंत्री, स्थानिक अधिकारी, विद्यापीठ प्रशासन यांच्याकडून टोलवाटोलवी सुरू आहे. येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय झाला नाही, तर वसतिगृहांची कुलूपे तोडून विद्यार्थी राहायला सुरुवात करतील.
– कुलदीप आंबेकर, स्टुडंट हेल्पिंग हँड