सामाजिक जाणिवेचा उद्योगपती हरपल्याची भावना
पुणे : मध्यमवर्गीयांना दुचाकीच्या स्वप्नावर स्वार करणारे ‘चेतक’चे निर्माते आणि सरकारलाही परखडपणे चार शब्द सुनावण्याची प्राज्ञा असलेले ज्येष्ठ उद्योगपती, बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राहुलकुमार कमलनयन बजाज (वय ८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून बजाज हृदयविकाराने आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र वयोमानामुळे उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली होती. शनिवारी दुपारी २.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे राजीव आणि संजीव हे पुत्र आणि सुनयना केजरीवाल ही कन्या असा परिवार आहे. बजाज यांच्या पार्थिवावर आज, रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाहननिर्मिती क्षेत्रात बजाज उद्योगसमूहाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात राहुल बजाज यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी १९६५ साली आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. १९६८ मध्ये ते बजाज ऑटोमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू झाले होते. वयाच्या तिसाव्या वर्षी हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळविला.
कोलकात्यातील एका मारवाडी उद्योजकाच्या कुटुंबात १० जून १९३८ रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. वडील कमलनयन यांच्याकडून त्यांना उद्योगाचा वारसा मिळाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधि विद्याशाखेमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमबीए) घेतली होती.
बजाज उद्योगसमूहाला वाहन उद्योगात अव्वल स्थानी नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट. आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक पुरस्काराने बजाज यांचा गौरव करण्यात आला होता.
राहुल बजाज उद्योगविश्वात उल्लेखनीय योगदान दिले. व्यवसायापलीकडे, त्यांना समाजसेवेचीही आवड होती. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान दानशूर उद्योगपती
उद्योजक म्हणजे फक्त पैसा कमावणारे या समजाला छेद देत राहुलकुमार बजाज यांनी आपल्या दानशूरतेची प्रचीती अनेकदा दिली होती. समाजोपयोगी कामे करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी वेळोवेळी भरघोस अर्थसाह्य केले. पाच वर्षांपूर्वी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बजाज यांनी नागपूर विद्यापीठाला १५ कोटी रुपयांची देणगी दिली होती.
मुलींचे वसतिगृह व्हावे म्हणून..
उत्तम गुणवत्ता असलेल्या खेडय़ातील मुली पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) प्रवेश परीक्षेत यश संपादन करतात. मात्र एकटय़ा मुलीला शिक्षणासाठी पुण्यामध्ये पाठवणे सुरक्षित वाटत नाही. म्हणून पालक त्यांना पाठवण्यास राजी नसत. मुलींचे वसतिगृह बांधणे आवश्यक असल्याचे बजाज यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ ५० कोटी रुपये दिले होते, अशी आठवण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितली.
मनामनांत.. राहुल बजाज यांनी इटालियन व्हेस्पाला ‘चेतक’ या
भारतीय रूपात सादर केले. बजाजची चेतक दुचाकी खरेदी करणे हे त्यावेळी भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या वाहनखरेदीच्या स्वप्नाचे प्रतीक बनली होती. तिच्या जाहिरातीची ‘हमारा बजाज’ या लोकप्रिय धूनने मध्यमवर्गीयांच्या दुचाकीखरेदीच्या स्वप्नाला भावनिक साद घातली होती.
The post राहुल बजाज कालवश; सामाजिक जाणिवेचा उद्योगपती हरपल्याची भावना appeared first on Loksatta.