‘पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘अग्रवालने कोणाला..’

Uddhav Thackeray Group Slams Pune Police: पुण्यातील कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी झालेल्या पोर्शे कारच्या अपघातामध्ये दोन तरुणांना प्राण गमवावे लागल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चेत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र असं असतानाच आता ठाकरे गटाने पुण्याचे पोलीस आयुक्त अणितेश गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ‘अमितेश गुप्ता हे भाजपासाठी काम करतात तसेच भाजपा आणि पोलीस आयुक्तांनी आरोपीच्या सुटकेसाठी कंबर कसली आहे,’ असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त या प्रकरणी उलटसुलट भूमिका घेऊन…

“पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून ‘सेवा’ बजावली व नंतर नागपूरकरांनी त्यांना पुण्याची वतनदारी बहाल केली. त्या वतनदारीस जागून श्रीमान गुप्ता हे भाजपास ‘दान’ देणाऱ्या बिल्डरांना, गुंड टोळ्यांना पाठीशी घालत आहेत. बिल्डर विशाल अग्रवालच्या मद्यधुंद पोराने पुण्यातील कल्याणी नगरात बेदरकारपणे दोन तरुण जिवांचा बळी घेतला. त्या क्षणापासून पुण्याचे पोलीस आयुक्त या प्रकरणी उलटसुलट भूमिका घेऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ही हेराफेरी उघड केली आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांची सेवा भाजप किंवा बिल्डरांसाठी समर्पित केली असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण पुण्याच्या रस्त्यावर दोन तरुण जीव तडफडून मेले त्याबद्दल आयुक्तांचे मन द्रवले नाही व कायद्याचा पोकळ दंडुका ते आपटत राहिले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

आरोपींच्या सुटकेसाठी भाजपने व पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे

“पुण्यात एकंदरीत घाशीराम कोतवालाचेच राज्य पुन्हा अवतरले असून सरकारने त्या घाशीरामी कारभाराची सूत्रे तेथील पोलीस आयुक्तांना दिलेली स्पष्ट दिसतात. बिल्डर अग्रवाल याचा पूर्वेतिहास आता समोर आला आहे. तो पाहता राजकारणी, गुंड टोळ्या, प्रशासनातील भ्रष्ट लोक व पोलिसांच्या मदतीनेच त्याने आपले आर्थिक साम्राज्य वाढवले. ‘चंदा दो, धंदा लो’ हा भाजपचा नवा मंत्र आहेच. अग्रवालने आतापर्यंत कोणाला किती चंदा दिला व त्यामुळे पुण्यातील अनेक टिंगे-व-टिंगरे अग्रवालच्या बचावासाठी कसे निर्लज्जपणे पुढे सरसावले आहेत ते आता दिसत आहे. पुण्यात पोर्शे कारने झालेल्या अपघाताबाबत ‘चर्चासत्र’ झडत आहेत. अनेक कायदेपंडित, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकारी यावर मंच गाजवीत असले तरी या प्रकरणातील आरोपींच्या सुटकेसाठी भाजपने व पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे,” असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांना घरी पाठवण्यासाठी…

“मिंधे सरकारातील काही उद्योगी मंत्र्यांचे पुण्यात बिल्डरी कार्य असून त्यांना अग्रवाल व त्याच्या पोराचा कळवळा आला आहे. पुण्यात येऊन या बिल्डरांना कसे वाचवता येईल व सध्या सुधारगृहात पाठवलेल्या साडेसतरा वर्षांच्या खुनी पोराची सुटका करून त्याला वाजत गाजत ‘पोर्शे’ गाडीतून घरी आणण्याचे या उद्योगी मंत्र्यांनी मनावर घेतले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सखोल चौकशीचे वगैरे दिलेले आदेश ही बनवाबनवी आहे. अग्रवालला मदत करा व बाहेर काढा, असे आतले आदेश आहेत व पुण्याचे पोलीस आयुक्त तेच करीत आहेत. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना घरी पाठवण्यासाठी आंदोलन छेडायला हवे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा :  Mughal History: अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

…तोपर्यंत मृतांना न्याय मिळणार नाही

“पुण्याचे आयुक्त हे फडणवीस टोळीचे हस्तक असून त्यांच्याकडून या खुनांचा तपास सरळपणे होणार नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त रोज नवी माहिती समोर आणत आहेत. त्यामुळे आमदार धंगेकर म्हणतात तेच खरे आहे. पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर या प्रकरणातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले गेले. मृत अनिश व अश्विनी या दोन जिवांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या ‘खुना’चे डील करण्याचा प्रयत्न सुरू आहे व त्यामुळेच तपासात अक्षम्य चुका करायच्या व प्रकरण पद्धतशीर, कायदेशीर मार्गाने दाबायचे असेच पुणे आयुक्तांचे धोरण होते. तूर्त जनमताच्या रेट्यामुळे त्यास ब्रेक लागला आहे. या प्रकरणाची समांतर चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ नेमणे गरजेचे आहे. ज्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दारू पिऊन दोन तरुण जिवांचा खून केला तो अल्पवयीन वगैरे अजिबात नाही. त्याचे वय साडेसतरा इतके आहे. म्हणजे तो चांगला सज्ञान आहे. त्याच्यावर प्रौढ म्हणूनच खटला चालायला हवा व ‘निर्भया’ प्रकरणात तेच घडले आहे. पण जोपर्यंत फडणवीस यांचा हस्तक पोलीस आयुक्तपदी बसला आहे तोपर्यंत मृतांना न्याय मिळणार नाही,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

बिल्डरांच्या रक्षणासाठी टोळ्या निर्माण केल्या

“धंगेकर यांनी आयुक्तांवर केलेले आरोप गंभीर आहेत. बिल्डरांच्या पाकिटावर आयुक्त काम करतात हा त्यांचा आरोप दुर्लक्षित करता येणार नाही. धंगेकर हे आमदार आहेत व इतर आमदारांप्रमाणे विकत घेतले जातील अशा वर्गात मोडणारे नाहीत. भाजप व अजित पवारांचे सर्व घाशीराम या प्रश्नी तोंड शिवून बसले असताना धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले व एका बेवड्या श्रीमंताने केलेले दोन खून सहज पचवले जाऊ नयेत म्हणून ते उभे ठाकले आहेत. पुण्याला वाळवी लागली आहे व अजित पवारांसारखे लोक त्या वाळवीचे किडे आहेत. पुण्यात बिल्डरांचे राज्य त्यांनीच निर्माण केले. बेकायदेशीर जमीन व्यवहार करणाऱयांना राजकीय संरक्षण दिले. गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांना ‘मोक्का’सारख्या कारवाईतून वाचवले. अग्रवालसारख्या बिल्डरांच्या रक्षणासाठी ‘टिंगे’ आणि ‘टिंगरे’ टोळ्या निर्माण केल्या व त्याकामी पोलीस यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता हे त्याच यंत्रणेचा एक भाग असून ते या वाळवीचे चौकीदार व वसुलीप्रमुख आहेत काय अशी शंका नव्हे, आता खात्रीच पटली,” असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा :  पुणेः टीचर केस ओढतात, गालगुच्ची घेतात...; 3 वर्षांच्या मुलीने वाचला तक्रारींची पाढा अन् बापाला धक्काच बसला

आपल्या लोकांची प्रकरणे मिटवून टाका हे भाजपचे धोरण

“पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांची नागपुरातील कारकीर्द ही वादग्रस्त होती. फडणवीस वगैरे लोकांच्या समांतर राज्याचा विनम्र सेवक म्हणूनच त्यांनी चाकरी केली. कायद्याचे राज्य ही संकल्पना त्यांना मान्य नाही. सरकारच्या राजकीय विरोधकांच्या नाड्या आवळायच्या, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी लोकांना उत्तेजन द्यायचे यात त्यांचा हातखंडा नागपुरात दिसला. पुण्यात येताच त्यांनी खुन्यांनाच आधार देण्याचे काम केले. आमदार धंगेकरांच्या जागरूकतेमुळे ‘टिंगे-टिंगरे’ टोळी, सरकारचे घाशीराम व पोलीस आयुक्तांचे कारस्थान उधळून लावले आहे. दोन खुनांचा विषय या लोकांना सहज मिटवता आला नाही. आपल्या लोकांची प्रकरणे मिटवून टाका हे भाजपचे धोरण पुण्यात चालले नाही. रस्त्यावर दोन खून झाले. खुनाला वाचा फुटली आहे. घाशीरामांनी हे लक्षात ठेवावे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर …

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …